माऊंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वांत उंच शिखर आहे. या शिखरावर अनेक गूढ घटना घडतात. यातील काही घटनांची मानवाला माहिती आहे. तर काही घटना नेमक्या का घडतात, याचा सुगावा अद्याप शास्त्रज्ञांनाही लागलेला नाही. या शिखरावर अनेक हिमनद्या आहेत. या हिमनद्यांतून रात्री गूढ आवाज ऐकायला येतो. हा आवाज नेमका कशाचा आहे, हा प्रश्न गिर्यारोहकांना मागील अनेक दिवसांपासून पडला होता. दरम्यान, या प्रश्नाचे उत्तर शास्त्रज्ञांनी शोधले आहे. याच पार्श्वभूमीवर हिमनद्यांतून गूढ आवाज का येतो? हा शोध कोणी लावला? हे जाणून घेऊ या…

माऊंट एव्हरेस्टवर सूर्य मावळल्यावर गूढ आवाज का येतो?

माऊंट एव्हरेस्टवर रात्री गूढ आवाज का येतो, या प्रश्नाचे उत्तर ग्लेशियोलॉजिस्ट एव्हगेनी पोडोल्स्की यांच्या चमूने शोधले आहे. २०१८ साली पोडोल्स्की यांच्या टीमने नेपाळमधील हिमालयाच्या ट्राकार्डिंग-ट्रांबाऊ या भागातील हिमनद्यांमध्ये होणाऱ्या घडामोडींची नोंद केली. त्यानंतर हा गूढ आवाज नेमका कोठून येतोय, हा शोध लावण्यास या टीमला यश आले. तशी माहिती Earth.comने दिली आहे. पर्वतांच्या उंचावरील हिमनद्यांमध्ये काही तरी तुटण्याचा आणि मोडण्याचा आवाज येतो. संध्याकाळ झाल्यानंतर तापमानात मोठी घट होते. त्यामुळे हिमनद्यांमधील बर्फ तुटतो. परिणामी या हिमनद्यांमधून आवाज येतो, असा निष्कर्ष ग्लेशियोलॉजिस्ट एव्हगेनी पोडोल्स्की यांच्या टीमने काढला आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण : कोहली-गंभीरमध्ये पुन्हा मैदानावरच जुंपली! नक्की काय घडले? दोघांमधील इतिहास काय?

रात्री बर्फ एकमेकांवर आदळल्याचा येतो आवाज

या निष्कर्षापर्यंत येण्यासाठी पोडोल्स्की यांच्या चमूने माऊंट एव्हरेस्टवरील हिमनद्यांच्या परिसरात साधारण तीन आठवडे घालवले. सुरुवातीला त्यांना हा आवाज कोठून आणि का येत आहे? याची कल्पना नव्हती. मात्र पर्वतावरून खाली आल्यानंतर पोडोल्स्की यांच्या चमूने सेसिमोग्राफिक माहितीचा अभ्यास केला. त्यानंतर तापमानात घट झाल्यामुळे हिमनद्यांमधील बर्फ तुटतो, त्यामुळे तेथे हा आवाज येतो, असे त्यांना समजले. गिर्यारोहक दावे हान यांनी आतापर्यंत १५ वेळा माऊंट एव्हरेस्ट सर केलेला आहे. त्यांनीदेखील रात्रीच्या वेळी बर्फ आणि दगड एकमेकांवर आदळल्याप्रमाणे विचित्र आवाज येतो, असे सांगितलेले आहे. या आवाजामुळे झोपणेदेखील मुश्कील होऊन बसते, असेही दावे हान यांनी सांगितलेले आहे.

रात्रीच्या गूढ आवाजाचे कारण नेमके कसे शोधण्यात आले?

डॉ. पोडोल्स्की यांची टीम एव्हरेस्टवर समुद्रसपाटीपासून साधारण तीन मैल उंचावर असलेल्या हिमनदीच्या परिसरात उतरली. याबाबत बोलताना “तशा सुंदर वातावरणात काम करण्याचा आमचा अनुभव खूपच चांगला होता. मुळात आम्ही एव्हरेस्ट शिखराचे कौतुक करीत करीतच दुपारी जेवायचो,” अशी प्रतिक्रिया पोडोल्स्की यांनी दिली. पोडोल्स्को जपानमधील होक्काइडो विद्यापीठाच्या आर्क्टिक रिसर्च सेंटरमध्ये काम करतात. हे संशोधक सकाळी टी-शर्टवर काम करायचे. मात्र रात्री येथे तापमान -१५ अंश सेल्सिअसपर्यंत खाली यायचे. या काळात रात्र झाली की हिमनद्यांमधून मोठा आवाज यायचा, असे त्यांना आढळले.

हेही वाचा >>> शरद पवारांच्या राजीनाम्याच्या निर्णयानंतर राष्ट्रवादी पक्षाच्या स्थापनेची चर्चा; १९९९ साली नेमके काय घडले होते?

या निरीक्षणानंतर रात्री होणारा तापमानातील बदल आणि हिमनद्यांतून येणारा आवाज याचा नेमका संबंध शोधण्यासाठी त्यांनी त्या भागातील कंपनांची नोंद केली. तसेच या कंपनांची हवा तसेच तेथील तापमानाशी तुलना केली. या निष्कर्षाचा अनेक ग्लेशियोलॉजिस्ट, हवामानतज्ज्ञांना फायदा होणार आहे. हिमालयामध्ये दुर्गम भागातील हिमनद्यांमध्ये नेमके काय आहे? त्या काम कसे करतात? हे समजून घेण्यासाठी या निष्कर्षाची मदत होणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हवामानबदलामुळे हिमनद्या वितळण्याच्या प्रमाणात वाढ

हिमालयातील हिमनद्या वितळण्याचा वेग वाढला आहे. याचा परिणाम दक्षिण आशियाई देशातील कोट्यवधी लोकांवर तसेच देशांच्या अर्थव्यवस्थेवर होत आहे. तुलनाच करायची झाल्यास मागील ४० वर्षांतील बर्फ वितळण्याचे प्रमाण हे सात शतकांच्या तुलनेच्या १० पट अधिक आहे. २०२१ साली ‘सायंटिफिक रिपोर्ट्स’ या जर्नलमध्ये एक अहवाल प्रकाशित झाला होता. या अहवालाप्रमाणे मागील काही शतकांत हिमालयातील हिमनद्यांचा ४० टक्के परिसर वितळला आहे. हा परिसर एकूण ३९० ते ५८६ क्यूबिक किलोमीटर एवढा आहे. हा वितळलेला बर्क जगातील समुद्रांची पातळी ०.९२ ते १.३८ मिलिमीटरपर्यंत वाढण्यासाठी पुरेसा आहे.