देशभरात सध्या आसाम सरकारच्या एका कारवाईची चर्चा आहे. या कारवाईत आसाममध्ये एकूण ४ हजार ७४ गुन्हे दाखल झाले आहेत. या सर्व गुन्ह्यांमध्ये एकूण २ हजार ४४ नवरदेव, त्यांच्या कुटुंबातील सदस्य, भटजी आणि काझी यांना अटक करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आसाम सरकारची ही कारवाई नेमकी काय आहे? ४ हजाराहून अधिक गुन्हे आणि २ हजारहून अधिक जणांना अटक का झाली? याचा हा आढावा…
आसाम सरकारने राज्यात बालविवाहाविरोधात कठोर धोरण अवलंबलं आहे. या धोरणांतर्गतच ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. मागील अनेक दिवसांपासून आसाममध्ये बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्न सुरू होते. आता सरकारने बालविवाह करणाऱ्या आणि हे विवाह लावणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईला सुरुवात केली.
राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणानुसार, आसाम हे देशातील असं राज्य आहे जेथे सर्वाधिक माता मृत्यू आणि बालमृत्यू होतात. या मृत्यूंमागील एक प्रमुख कारण म्हणजे बालविवाह आहे. गंभीर म्हणजे आसाममधील ३१ टक्के लग्नांमध्ये मुलगा किंवा मुलगी अल्पवयीन असते. म्हणजेच अशा लग्नांमध्ये मुलीचं वय १८ वर्षांपेक्षा कमी आणि मुलांचे वय २१ वर्षांपेक्षा कमी आहे.
हेही वाचा : विश्लेषण : ईशान्येतील भाजपचा चेहरा किरेन रिजिजूंचे महत्त्व का व कसे वाढले?
बालविवाहाविरोधातील आसाम सरकारच्या या मोहिमेत पॉक्सो कायद्यानुसार आतापर्यंत ४,०७४ गुन्हे दाखल झाले आहेत. यात नवरदेव, त्याच्या कुटुंबातील सदस्य लग्न लावणारे भटजी किंवा काझी अशा एकूण २,०४४ जणांना अटक करण्यात आली आहे. बालविवाहात मुलीचे वय १४ ते १८ वर्षे असते. असा बालविवाह करणार्या व्यक्तीविरोधात बालविवाह प्रतिबंध कायदा (२००६) नुसार गुन्हा दाखल केला जातो. लग्न करणाऱ्या मुलाचे वय १४ वर्षांहून कमी असल्यास त्याला बालसुधारगृहात पाठवले जाते.
आसाम सरकारच्या मंत्रिमंडळाने गेल्या महिन्यात राज्यातील बालविवाह प्रथेविरोधात कारवाईचा ठराव मंजूर केला होता. यामध्ये १४ वर्षांखालील मुलींशी विवाह करणाऱ्यांविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ट्वीट करून या मोहिमेबाबत माहिती दिली होती. त्यात त्यांनी आसाम पोलिसांना या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले.
हेही वाचा : “पती तुरुंगात गेल्यावर त्या मुलींची…” बालविवाहाविरोधातल्या कारवाईवरून ओवैसींचा आसाम सरकारवर हल्लाबोल
आसाममधील सर्वाधिक ३७४ गुन्हे धुबरी येथे दाखल झाले आहेत. या प्रकरणांमध्ये एकूण १२६ लोकांना अटक करण्यात आली आहे. दुसऱ्या क्रमांकावर होजई जिल्ह्याचा समावेश आहे. तेथे २५५ गुन्हे दाखल झाले आणि ९६ जणांना अटक करण्यात आली. तिसरा क्रमांकावर मोरीगावचा क्रमांक लागतो. तेथे २२४ गुन्हे दाखल झाले आणि ९४ जणांना अटक करण्यात आली. चौथा क्रमांक उदलगिरीचा लागतो. तेथे २१३ एफआयआर दाखल झाल्या आणि ५८ लोकांना अटक करण्यात आली. कोक्राझार जिल्हा पाचव्या क्रमांकावर आहे. तेथे २०४ गुन्हे दाखल झाले आणि ९४ जणांना अटक करण्यात आली.