Kolkata doctor’s murder: कोलकात्याच्या आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येमुळे पश्चिम बंगालमध्ये महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पीडितेच्या पालकांनी या प्रकरणातील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या दुटप्पीभूमिकेबद्दल आणि होत असलेलं आंदोलन दडपल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. या हत्या प्रकरणात योग्य न्याय मिळण्याकरिता संपूर्ण देशभरात निदर्शने झाली. ३१ वर्षीय पीडितेच्या पालकांनी या प्रकरणात ममता बॅनर्जींच्या दुटप्पी भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली, तसेच राज्य सरकारकडून भरपाई देखील नाकारली आहे.

‘मुख्यमंत्र्यांवर नाराज’

मुलीची निर्घृण हत्या करणाऱ्याला शिक्षा व्हावी आणि या प्रकरणात योग्य तो न्याय मिळावा यासाठी सुरू असलेली निदर्शने दडपल्याचा आणि हे प्रकरण लवकरात लवकर बंद करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पीडितेच्या पालकांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर केला आहे. “आम्ही मुख्यमंत्र्यांच्या कार्यवाहीवर समाधानी नाही. आम्ही मुख्यमंत्र्यांवर नाराज आहोत. आम्ही कोणतीही भरपाई घेण्यास नकार दिला आहे,” पीडितेच्या वडिलांनी एएनआयला सांगितले आणि चौकशीनंतर काहीच निष्पन्न न झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. “चौकशीनंतर काहीही समोर आलेलं नाही. आशा आहे की आम्हाला योग्य तो न्याय मिळेल.” पीडितेची आई पुढे म्हणाली, “मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी सांगितले होते की, गुन्हेगाराला लवकरात लवकर अटक केली जाईल, परंतु अद्याप काहीही झाले नाही.” डेक्कन हेराल्डने दिलेल्या वृत्तानुसार मृत पीडितेच्या आईने राज्यातील रहिवाश्याना उद्देशून सांगितले की, ममता बॅनर्जींच्या ‘कन्याश्री आणि लक्ष्मी योजना’ या दिखाऊ आहेत, ज्यांना या योजनांचा लाभ घ्यायचा आहे, त्यांनी लाभ घेण्यापूर्वी खात्री करून घ्या तुमच्या घरातली लक्ष्मी खरंच सुरक्षित आहे का?

अधिक वाचा: चीनमधील ‘प्रेग्नेंट कार’चे Videos व्हायरल; ‘मेड-इन-चायना कार गर्भवती का होत आहेत? नेमकं प्रकरणं काय आहे?

दुटप्पी भूमिका का?

रविवारी कोलकाता येथे पत्रकारांशी बोलताना पीडितेचे वडील म्हणाले, “मुख्यमंत्री माझ्या मुलीला न्याय मिळावा या मागणीसाठी रस्त्यावर उतरल्या आहेत आणि न्यायाबद्दल बोलत आहेत. आणि त्याचवेळी मात्र त्या जनक्षोभ दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. ही दुटप्पी भूमिका कशासाठी? त्यांना लोकांची भीती वाटते का? आमच्याकडे प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे हवी आहेत.” या प्रकरणातील दोषींना फाशीच्या शिक्षेची मागणी करत या आठवड्यात बॅनर्जी यांनी पुढाकार घेत रॅली काढली होती. “जे उघड आणि पुढे येऊन आंदोलन करत आहेत, त्यांचा आवाज मुख्यमंत्र्यांनी दाबला आहे. त्या स्वत: निषेधार्थ रस्त्यावर उतरत असताना, इतरांनी निषेध करू नये यासाठी व्यवस्था करत आहे,” पीडितेच्या वडील म्हणाले.
“मुख्यमंत्री न्याय देण्याबद्दल बोलत आहेत, मात्र न्याय मागणाऱ्या सर्वसामान्यांना तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. जेव्हा त्यांना (ममता बॅनर्जी) स्वतःला न्याय हवा असतो तेव्हा त्या रस्त्यावर उतरतात आणि आता त्या जनतेला मात्र थांबवत आहेत,” असं ते पुढे म्हणाले.

कुटुंबाची दिशाभूल केली

पीडितेच्या पालकांनी सांगितले की, ९ ऑगस्टला सकाळी फोनवर सांगण्यात आले की, त्यांच्या मुलीने ती नोकरी करत असलेल्या रुग्णालयात आत्महत्या केली आहे. पीडितेच्या आईने न्यूज१८ला मुलाखत देताना सांगितले की, “प्रथम आम्हाला हॉस्पिटलमधून फोन आला की, तुमची मुलगी आजारी आहे, नंतर कॉल डिस्कनेक्ट झाला. त्यानंतर मी फोन करून काय झाले असे विचारले असता त्यांनी मला रुग्णालयात येण्यास सांगितले. जेव्हा आम्ही पुन्हा कॉल केला तेव्हा कॉलरने स्वतःची ओळख असिस्टंट सुपर अशी करून देत सांगितले की, तुमच्या मुलीने आत्महत्या केली आहे,” या गुन्ह्यात एकापेक्षा जास्त जणांचा सहभाग असण्याच्या शक्यतेबाबत एनडीटीव्हीला मुलाखत देताना पीडितेच्या वडिलांनी सांगितले की, “आम्ही सुरुवातीपासूनच म्हणत आहोत. आम्ही ज्या लोकांशी बोललो ते सर्व, अगदी MBBS डॉक्टर सुद्धा हे मान्य करतात की हे कृत्य एका व्यक्तीचं नाही. या संपूर्ण प्रकरणाचा सर्वात दुःखद भाग म्हणजे, मुलीच्या सुरक्षेसाठी जबाबदार असलेले लोक ते कर्तव्य पार पाडण्यात अयशस्वी ठरले आहेत. “पालक या नात्याने, जेव्हा आमचे मूल रस्त्यावर असते तेव्हा आम्हाला काळजी वाटते, पण जेव्हा ती तिच्या कामाच्या ठिकाणी पोहोचते तेव्हा ही काळजी नसायची. पूर्वी आम्ही तिला शाळेत सोडायचो. ती गेटच्या आत गेली की, आम्हाला हायस वाटायचं. आता ती मोठी झाली होती. रस्त्यांची अडचण होतीच, म्हणून आम्ही तिला एक कार देखील घेऊन दिली,” त्यांनी वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

‘केस बंद करा’

पीडितेच्या वडिलांनी दावा केला की, इतर मृतदेह रांगेत असतानाही त्यांच्या मुलीच्या मृतदेहावर आधी अंत्यसंस्कार करण्यात आले. “स्मशानभूमीत तीन मृतदेह होते पण त्यांच्या आधी आमच्या मुलीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आमची एकुलती एक मुलगी गमावल्यानंतर आम्ही अतिशय अस्वस्थ मनस्थितीत होतो. त्यामुळे आम्ही त्यावेळी विचार करू शकलो नाही किंवा त्या पद्धतीने वागू शकलो नाही,” असे त्यांनी ‘टाईम्स ऑफ इंडिया’ला सांगितले. “त्यांनी फक्त शक्य तितक्या लवकर केस बंद करण्याचा प्रयत्न केला. शक्य तितक्या लवकर शवविच्छेदन करून मृतदेह बाहेर काढण्याचा त्यांचा प्रयत्न होता,” असे कोलकाता पोलीस आयुक्तांचा संदर्भ देत पीडितेची आई म्हणाली. कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआयने केस ताब्यात घेण्यापूर्वी स्थानिक पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी ज्या पद्धतीने केली, त्यावर पीडितेच्या वडिलांनीही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार “चौकशीतून काहीही निष्पन्न झाले नाही… (चेस्ट मेडिसिन) विभाग किंवा महाविद्यालयाने आम्हाला सहकार्य केले नाही. माझ्या मुलीच्या हत्येसाठी संपूर्ण विभाग जबाबदार आहे… आम्हाला संशय आहे की, विभागातील काही लोक या गुन्ह्यात सामील आहेत,” असं पिडीतेचे वडील म्हणाले. ‘इकनॉमिक टाईम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, वडिलांनी दावा केला की सेमिनार रूममध्ये तिची हत्या झाली की. नाही याबद्दल त्यांना शंका आहे. “माझ्या मुलीची सेमिनार रूममध्ये हत्या करण्यात आली का याबद्दल मला शंका आहे. जेव्हा तिच्या आईशी तिचं शेवटचे बोलणं झालं तेव्हा तिने सांगितलं की, ते सेमिनार हॉलमध्ये ११.१५ ला जेवायला जात आहे,” असं ते म्हणाले, ती दररोज तिची डायरी लिहीत होती, ती डायरीही जप्त करण्यात आली आहे. “जप्तीची यादी तयार केली जात असताना मी हजर होतो. पोलिसांनी माझ्या मुलीच्या बॅगेतून काही रिपोर्ट्स आणि औषधे काढली. ते हे प्रकरण वळविण्याचा प्रयत्न करत होते. ते मला म्हणाले, ‘तुमची मुलगी आजारी होती, तिच्याकडे खूप औषधे होती. अनेक रिपोर्ट्स आहेत,” असं पीडितेच्या वडिलांनी सांगितले.

राजीनामा हवाय

२०१२ च्या दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडिता निर्भयाच्या आईने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी करताना म्हटले आहे की, पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने झाल्यानंतर परिस्थिती हाताळण्यात त्या ‘अयशस्वी’ ठरल्या. पीटीआयशी बोलताना, त्यांनी निषेध व्यक्त करून “लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न” केल्याबद्दल ममता बॅनर्जींवर टीका केली. “दोषींवर कारवाई करण्याऐवजी ममता बॅनर्जी जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत,” असं त्या म्हणाल्या, “त्या स्वतः एक महिला आहेत. त्यांनी राज्याच्या प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडत दोषींवर कठोर कारवाई करायला हवी होती. त्यांनी राजीनामा द्यावा कारण त्या परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्या आहेत. जोपर्यंत केंद्र आणि राज्य सरकार बलात्कार करणाऱ्यांना न्यायालयाकडून त्वरीत शिक्षा व्हावी यासाठी गंभीर पावलं उचलत नाहीत, तोपर्यंत देशाच्या विविध भागांमध्ये असे क्रूर प्रकार रोज होतच राहतील. त्या पुढे म्हणाल्या “जेव्हा कोलकात्याच्या वैद्यकीय महाविद्यालयात मुली सुरक्षित नाहीत आणि त्यांच्या विरोधात असा रानटीपणा केला जातो, तेव्हा देशातील इतर महिलांच्या सुरक्षेची स्थिती किती गंभीर आहे ते समजू शकते”. भारतीय जनता पार्टीने (भाजपा) बुधवारी देखील ममता बॅनर्जी यांचा तत्काळ राजीनामा मागितला आणि या प्रकरणात पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. एका पत्रकार परिषदेत भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया म्हणाले की, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी मुख्यमंत्री असताना महिलांना सुरक्षित वाटत नाही. ते म्हणाले की, हे प्रकरण सुरुवातीला कसे चुकीचे हाताळले गेले यावरून राज्यातील गंभीर परिस्थिती दिसून येते.

अधिक वाचा: ‘मान्सून वधू’: पाकिस्तानमध्ये पावसाच्या भीतीने बालविवाह का होत आहेत?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तपास

पीडित ही दुसऱ्या वर्षाची पोस्ट ग्रॅड होती, ३६ तासांच्या शिफ्टमध्ये काम केल्यावर थोडावेळ झोप घेण्यासाठी ती संध्याकाळी एकटीच रिकाम्या सेमिनार रूममध्ये गेली होती. विशेष म्हणजे रुग्णालयात ऑन-कॉल रूम नाही. दुसऱ्या दिवशी, ९ ऑगस्ट रोजी सकाळी तिचा अर्धवट कपडे असलेला मृतदेह तेथे सापडला, तिच्या शरीरावर अनेक जखमा होत्या. प्राथमिक संशयित संजय रॉय हा कोलकाता पोलिसांचा स्वयंसेवक आहे, जो नागरी सेवक म्हणून काम करत होता आणि त्याला आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या पोलिस चौकीत तैनात असताना प्रत्येक विभागात प्रवेश देण्यात आला होता. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, सीसीटीव्ही फुटेजमध्ये जे दृश्य आढळून आले, त्यानुसार ज्या इमारतीत प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा खून झाला त्या इमारतीत त्याने प्रवेश केला होता आणि हाच त्याचा अटकेचा आधार होता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये पीडितेच्या मृतदेहाशेजारी एक ब्लूटूथ हेडसेट सापडला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा हेडसेट त्याच्या मानेवर दिसत आहे. किंबहुना त्याच्या फोन कॉल्सचीही चौकशी होत आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केल्यानंतर रॉयने गुन्ह्याची कबुली दिली. रिपोर्ट्सनुसार, “तुम्हाला हवे असल्यास मला फाशी द्या,” असे त्याने बेफिकीरपणे पोलिसांना सांगितले होते. या प्रकरणाच्या संदर्भात सीबीआयचे तपास अधिकारी, रुग्णालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष यांचे कॉल लॉग आणि संभाषण तपासत आहेत. न्यूज18 दिलेल्या बातमीनुसार, आजपर्यंत, सीबीआयने कोलकाता पोलिसांच्या दोन अधिकाऱ्यांसह २० हून अधिक लोकांची चौकशी केली आहे. केंद्रीय तपास एजन्सीच्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, घोष यांची घटनेच्या आधी आणि नंतरच्या दोन्ही फोन कॉल्सबद्दल चौकशी करण्यात आली आहे. अद्याप तरी या प्रकरणात आरोपीपर्यंत पोहोचण्याची सुस्पष्ट दिशा सापडलेली नाही.