Indian diplomat Kshitij Tyagi UN speech दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानने आपल्याच देशातील एका गावावर लष्करी कारवाई करत सहा बॉम्ब टाकले. खैबर पख्तूनख्वा येथे हा हल्ला करण्यात आला, ज्यात अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. या घटनेवर भारतीय अधिकाऱ्याने मंगळवारी (२३ सप्टेंबर) संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत (UNHRC) पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले आहे, त्यामुळे पुन्हा एकदा भारतीय राजनैतिक अधिकारी क्षितीज त्यागी चर्चेत आले आहेत. त्यांनी अनेकदा यूएन परिषदेत पाकिस्तानला फटकारले आहे. कोण आहेत क्षितीज त्यागी? UNHRC मध्ये काय घडले? जाणून घेऊयात…
भारतीय अधिकाऱ्याची पाकिस्तानवर टीका
पाकिस्तानवर कठोर टीका करताना क्षितीज त्यागी यांनी पाकिस्तानवर स्वतःच्याच लोकांवर बॉम्ब टाकल्याचा आणि भारताविरुद्ध निराधार आणि चिथावणीखोर विधाने करत या मंचाचा गैरवापर केल्याचा आरोप केला. या महिन्याच्या सुरुवातीलाही त्यागी यांनी सगळ्यांचे लक्ष वेधले होते. त्यावेळी त्यांनी स्वित्झर्लंडला परखड प्रत्युत्तर देत, त्यांना देशातील वंशभेद आणि परकीयांबद्दलची भीती यांसारख्या अंतर्गत समस्यांवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला होता.

कोण आहेत क्षितीज त्यागी?
- क्षितीज त्यागी हे २०१२ च्या बॅचचे भारतीय विदेश सेवा संस्थान (IFS) अधिकारी आहेत.
- त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, खरगपूर (IIT Kharagpur) मधून मेकॅनिकल इंजिनियरिंगची पदवी प्राप्त केली आहे.
- त्यानंतर त्यांनी याच संस्थेतून थर्मल एनर्जी आणि एन्व्हायर्नमेंटल इंजिनियरिंगमध्ये एमटेक केले आहे.
- त्यांच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, त्यांनी २००७ ते २०१० पर्यंत म्हणजे जवळपास तीन वर्षे, ‘जोन्स लँग लासेल’ नावाच्या रिअल-इस्टेट कंपनीत बिझनेस ॲनॅलिस्ट म्हणून काम केले. २०१० मध्ये त्यांनी वैज्ञानिक म्हणून नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयात (Ministry of New and Renewable Energy) प्रवेश केला आणि या पदावर ते दोन वर्षांहून अधिक काळ कार्यरत होते.
त्यागी यांनी २०१२ मध्ये अत्यंत स्पर्धात्मक असलेली केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षा उत्तीर्ण केली आणि देशभरातून १४८ वा क्रमांक पटकावला होता. दोन वर्षांनंतर त्यांनी मुत्सद्देगिरीच्या (Diplomacy) क्षेत्रात पाऊल ठेवले. त्यांनी सुरुवातीला पोर्तुगालमधील लिस्बन येथील भारतीय दूतावासात ‘थर्ड सेक्रेटरी’ म्हणून काम केले. ‘मिंट’च्या वृत्तानुसार, २०१४ मध्ये एका मुलाखतीत त्यागी म्हणाले होते, “मला कॉर्पोरेटच्या मापदंडांच्या पलीकडे जाऊन लोकांसाठी काम कारायचे होते, त्यांचे जीवन सार्थ ठरावे यासाठी काम करायचे होते.”

२०१५ मध्ये त्यांची ब्राझील येथे ‘सेकंड सेक्रेटरी’ म्हणून नियुक्ती झाली आणि २०१८ मध्ये त्यांना इजिप्तमधील कैरो येथे ‘फर्स्ट सेक्रेटरी’ म्हणून पदोन्नती मिळाली. जानेवारी २०२४ मध्ये त्यागी यांनी संयुक्त राष्ट्रांमधील भारताच्या ‘Permanent Mission of India to the United Nations’ मध्ये ‘फर्स्ट सेक्रेटरी’ म्हणून काम सुरू केले. याच वर्षाच्या जानेवारीमध्ये त्यांची मिशनमध्ये ‘कौन्सिलर’ म्हणून नियुक्ती झाली.
क्षितीज त्यागींचा पाकिस्तानवर हल्लाबोल
भारतीय राजनैतिक अधिकारी क्षितीज त्यागी यांनी मंगळवारी UNHRC च्या ६० व्या सत्रात पाकिस्तानची निंदा केली. UNHRC सत्राच्या ‘अजेंडा आयटम 4’ दरम्यान बोलताना त्यांनी पाकिस्तानचे मुद्दे भारताविरुद्ध निराधार आणि चिथावणीखोर असल्याचे म्हटले. ते म्हणाले, “आमच्या भूभागावर डोळा ठेवण्याऐवजी त्यांनी त्यांच्या बेकायदा पद्धतीने ताब्यात असलेला भारतीय भूभाग रिकामा करावा आणि ‘लाईफ सपोर्ट’वर असलेल्या अर्थव्यवस्थेला वाचवण्यावर, लष्करी वर्चस्वाखाली दबलेल्या राजकारणावर आणि छळामुळे डागाळलेल्या मानवी हक्कांच्या नोंदीवर लक्ष केंद्रित करावे. दहशतवाद निर्यात करण्यात, संयुक्त राष्ट्र-प्रतिबंधित दहशतवाद्यांना आश्रय देण्यात आणि स्वतःच्याच लोकांवर बॉम्ब टाकण्यातून त्यांना वेळ मिळाल्यास ते हे करतील,” असेही क्षितीज त्यागी म्हणाले.
क्षितीज त्यागींची इतर उल्लेखनीय वक्तव्ये
या महिन्याच्या सुरुवातीला त्यागी यांचा UNHRC मधील एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये ते पाकिस्तानवर टीका करताना दिसले की, जागतिक सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या दहशतवादी नेटवर्कला वित्तपुरवठा आणि आश्रय देणाऱ्या दहशतवादी पुरस्कृत देशाकडून भारताला कोणत्याही धड्याची गरज नाही. त्यागी म्हणाले, “आम्हाला पुन्हा एकदा अशा एका देशाच्या चिथावणीला उत्तर देण्यास भाग पाडले जात आहे, ज्याच्या स्वतःच्या नेतृत्वाने अलीकडेच आपल्या देशाला ‘कचरा वाहून नेणारा ट्रक’ (Dump truck) म्हटले होते.
ते म्हणाले, “आम्हाला दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्याकडून कोणत्याही धड्याची गरज नाही; अल्पसंख्यांकांचा छळ करणाऱ्याकडून आणि स्वतःची विश्वासार्हता गमावलेल्या राज्याकडून कोणत्याही सल्ल्याची गरज नाही.” त्यागी यांनी UNHRC च्या ६० व्या सत्राच्या ५ व्या बैठकीत स्वित्झर्लंडवरही हल्ला चढवला आणि त्यांच्या भारतावरील टिप्पणीला आश्चर्यकारक, उथळ आणि अपुरी माहिती असलेले म्हटले. त्यागी यांनी स्वित्झर्लंडला त्यांच्या स्वतःच्या अंतर्गत समस्यांवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. जसे की वंशभेद, भेदभाव आणि परकीयांबद्दलची भीती.
भारताची विविधता आणि लोकशाही आदर्शांवर जोर देत त्यागी म्हणाले, “जगातील सर्वात मोठी, सर्वात वैविध्यपूर्ण लोकशाही म्हणून भारत या चिंता दूर करण्यासाठी स्वित्झर्लंडला मदत करण्यास तयार आहे.” स्वित्झर्लंडने संयुक्त राष्ट्रांमध्ये असे म्हटले होते की, “भारतात आम्ही सरकारला अल्पसंख्यांकांचे संरक्षण करण्यासाठी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य व माध्यमांचे स्वातंत्र्य (freedom of the media) या अधिकारांचे समर्थन करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचे आवाहन करतो.” त्यानंतर त्यागींनी हे कठोर प्रत्युत्तर दिले.
फेब्रुवारीमध्येही त्यागी यांनी पाकिस्तानवर टीका करताना त्याला ‘अपयशी राष्ट्र’ म्हटले होते. क्षितीज त्यागी यांनी पाकिस्तानला कडक शब्दांत सुनावत म्हटले की, “पाकिस्तानचे नेते आणि प्रतिनिधी त्यांच्या लष्करी दहशतवाद्यांनी दिलेला खोटेपणा पसरवत आहेत हे पाहून खेद वाटतो. आंतरराष्ट्रीय मदतींवर टिकून राहणाऱ्या एका अपयशी राष्ट्राकडून या परिषदेचा वेळ वाया घालवणे चुकीचे आहे. जिनिव्हा येथे UN मानवाधिकार परिषदेच्या ५८ व्या नियमित सत्राला संबोधित करताना पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरचा (J&K) मुद्दा जागतिक मंचावर उपस्थित केल्यावर त्यागींनी त्याला फटकारले. त्यागी यांनी ठामपणे सांगितले की, जम्मू आणि काश्मीर (J&K) आणि लडाख भारताचा अविभाज्य आणि कायमस्वरूपी भाग आहेत आणि नेहमीच राहतील.