संजय जाधव

मागील काही काळापासून सातत्याने आरोग्य क्षेत्रातून वाढत्या प्रतिजैविक प्रतिरोधाची (अँटिबायोटिक्स रेझिस्टन्स) समस्या प्रकर्षाने मांडली जात आहे. यामागे प्रतिजैविकांचा होत असलेला अतिवापर कारणीभूत आहे. प्रतिजैविकांचा अतिवापर रोखण्याची मागणी जोर धरत असताना आता करोना संकटाच्या काळात डॉक्टरांकडून प्रतिजैविकांचा अतिवापर करण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित झाला आहे. अनेक रुग्णांना आवश्यकता नसतानाही प्रतिजैविके देण्यात आली. जगभरात सरासरी चारपैकी तीन करोना रुग्णांना प्रतिजैविके देण्यात आली. यामुळे आता प्रतिजैविक प्रतिरोधाची समस्या जगभरात जाणवू लागली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या संशोधनातून ही बाब समोर आली.

संशोधन नेमके काय?

जागतिक आरोग्य संघटनेने ६५ देशांतील चार लाख ५० हजार करोना रुग्णांच्या आरोग्य अहवालाची तपासणी केली. हे रुग्ण जानेवारी २०२० ते मार्च २०२३ या सुमारे तीन वर्षांच्या कालावधीत रुग्णालयात दाखल होते. करोना संकटाच्या काळात रुग्णालयात दाखल झालेल्या केवळ आठ टक्के रुग्णांना प्रतिजैविके देण्याची गरज होती. प्रत्यक्षात डॉक्टरांकडून जगभरात सरासरी ७५ टक्के रुग्णांना प्रतिजैविके देण्यात आली. पश्चिम प्रशांत विभागात ३३ टक्के रुग्णांना, तर आखाती आणि आफ्रिकी देशांमध्ये तब्बल ८३ टक्के रुग्णांना प्रतिजैविके देण्यात आली. युरोप आणि अमेरिकेत २०२० ते २०२२ या कालावधीत प्रतिजैविके देण्याचे प्रमाण हळूहळू कमी झाले. मात्र, आफ्रिकेत ते वाढले, असे जागतिक आरोग्य संघटनेला आढळून आले.

हेही वाचा >>> तापमानातील वाढीमुळे मतदानाचा टक्का घसरतोय? डेटा काय सांगतो?

सर्वाधिक वापर कोणासाठी?

प्रतिजैविकांचा सर्वाधिक वापर करोनाच्या गंभीर रुग्णांमध्ये झाला. जगभरात अशा ८१ टक्के रुग्णांना प्रतिजैविके देण्यात आली. मध्यम अथवा सौम्य त्रास असलेल्या करोना रुग्णांना प्रतिजैविके देण्याचे प्रमाण विभागनिहाय वेगळे असून, त्यात आफ्रिकेत सर्वाधिक ७९ टक्के रुग्णांना प्रतिजैविके देण्यात आली. विशेष म्हणजे प्रतिजैविके देण्यात आल्याने करोना रुग्णांच्या प्रकृतीत फरक पडला नाही. याउलट जिवाणूसंसर्ग नसलेल्या रुग्णांच्या आरोग्याला त्यामुळे अपाय झाला, असे संघटनेने नमूद केले आहे.

सद्य:स्थिती कशी आहे?

जागतिक आरोग्य संघटनेने प्रतिजैविकांचे वर्गीकरण ‘अवेअर’ असे केले असून, त्यात ‘ॲक्सेस’ (उपलब्धता), ‘वॉच’ (निरीक्षण), ‘रिझर्व्ह’ (राखीव) या गोष्टींचा समावेश आहे. प्रतिजैविक प्रतिरोध रोखण्यासाठी हे वर्गीकरण करण्यात आले आहे. सध्या प्रतिरोधाची क्षमता जास्त असलेल्या प्रतिजैविकांचा वापर जगभरात सर्रास केला जात आहे. याबाबत जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रतिजैविक प्रतिरोध विभागाच्या डॉ. सिल्व्हिया बर्टानोलियो यांनी महत्त्वाचे निरीक्षण नोंदविले आहे. एखाद्या रुग्णाला प्रतिजैविके देण्याची गरज असते त्या वेळी जोखमीपेक्षा फायदा अधिक असल्याचे तपासले जाते. मात्र, गरज नसताना रुग्णाला प्रतिजैविक दिल्यास कोणताही फायदा होत नाही. प्रतिजैविकांचा वापर रुग्णामध्ये प्रतिजैविक प्रतिरोध निर्माण करण्यास आणि त्याचा प्रसार करण्यास कारणीभूत ठरतो, असे त्यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा >>> देशाच्या अनेक भागांमध्ये भीषण उष्णतेची लाट; IMD कडून उष्णतेच्या लाटेचा अलर्ट कधी दिला जातो?

प्रतिरोध म्हणजे काय?

मानव, प्राणी आणि पिकांवर प्रतिजैविक, विषाणू प्रतिबंधक, बुरशी प्रतिबंधक औषधांचा वापर केला जातो. एखाद्या रोगाचा संसर्ग अथवा त्यास प्रतिबंध करण्यासाठी हा वापर केला जातो. मात्र, या औषधांना जिवाणू, विषाणू, बुरशी आणि परजीवी प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळे प्रतिजैविक प्रतिरोध निर्माण होतो. यामुळे संसर्गाला प्रतिबंध, तसेच उपचार करणे अवघड बनते. यामुळे संसर्गाची तीव्रता वाढून मृत्यू होतो. प्रतिजैविक प्रतिरोध हा २०१९ मध्ये जगभरात १२.७ लाख जणांच्या मृत्यूस थेट जबाबदार ठरला, तर ४९.५ लाख जणांच्या मृत्यूस कारण बनला, असे जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल सांगतो. याच वेळी प्रतिजैविक प्रतिरोधामुळे जगाच्या आरोग्य खर्चात २०५० पर्यंत अतिरिक्त एक लाख कोटी डॉलरची भर पडेल आणि २०३० पर्यंत एकूण देशांतर्गत उत्पादनाला (जीडीपी) दर वर्षी एक ते ३.४ लाख कोटी डॉलरचा फटका बसेल, असा जागतिक बँकेचा अंदाज आहे.

भविष्यात कोणती पावले?

जगभरात डॉक्टरांकडून रुग्णांना दिल्या जाणाऱ्या प्रतिजैविकांचे प्रमाण कमी करण्यावर भर दिला जाणार आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेची उच्चस्तरीय बैठक यंदा सप्टेंबर महिन्यात होणार असून, त्यात प्रतिजैविक प्रतिरोध हा मुख्य मुद्दा असेल. जागतिक पातळीवरील नेते एकत्र येऊन मानवी आरोग्य, प्राणी आरोग्य, कृषी उत्पादने आणि पर्यावरण या दृष्टीने प्रतिजैविक प्रतिरोधांच्या परिणामांवर चर्चा करणार आहेत. प्रतिजैविक प्रतिरोध निर्माण होणे आणि तो पसरणे या दोन्ही गोष्टींचा वेग कमी करण्याबाबत या बैठकीत आराखडा ठरविला जाईल. याचबरोबर जागतिक आरोग्य संघटना करोना रुग्णांवरील उपचारांबाबतच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये प्रतिजैविक वापराविषयी इशारा देणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

sanjay.jadhav@expressindia.com