अन्वय सावंत
इंग्लंडविरुद्धच्या बहुचर्चित पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होण्यापूर्वीच भारताला मोठा धक्का बसला आहे. भारताचा तारांकित फलंदाज विराट कोहली ‘वैयक्तिक कारणास्तव’ इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांना मुकणार आहे. कोहलीने गेल्या काही काळात सातत्याने सामने खेळलेले नाहीत. त्याने स्वत:हून काही सामन्यांतून माघार घेतली आहे. तो सलग सामने खेळत नसल्याने भारतासमोर संघनिवडीचा पेच निर्माण होत आहे. कोहलीने स्वत:हून सामन्यांना मुकण्याची उदाहरणे कोणती आणि त्याची जागा घेण्यासाठी भारताकडे कोणते पर्याय उपलब्ध आहेत, याचा आढावा.

भारत-इंग्लंड मालिका महत्त्वाची का मानली जात आहे?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला २५ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. ही मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) कार्यक्रमाचा भाग आहे. त्यामुळे या मालिकेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यातच इंग्लंडच्या कसोटी संघाने बेन स्टोक्सचे नेतृत्व आणि ब्रेंडन मॅककलमच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही काळात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. स्टोक्सची कर्णधारपदी निवड झाल्यापासून इंग्लंडने १९ पैकी १३ कसोटी सामने जिंकले आहेत. २०२२मध्ये इंग्लंडने पाकिस्तानात जाऊन तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत निर्भेळ यश संपादन केले होते. त्यामुळे ते भारतासमोरही कडवे आव्हान उपस्थित करतील अशी अपेक्षा वर्तवण्यात यश आहे. अशात कोहली पहिल्या दोन कसोटींना मुकणे हा भारतासाठी नक्कीच मोठा धक्का आहे.

MS Dhoni Only Given Limited Batting In CSK Trainer Explains Why
MS धोनीला शेवटच्याच षटकांमध्ये फलंदाजी देण्याचं कारण अखेरीस आलं समोर; प्रशिक्षक म्हणाले, “त्याचे शॉट्स..”
Confirmed Rohit Sharma does not stay with Mumbai Indians team in Mumbai
रोहित शर्माने सांगितलं मुंबई इंडियन्सच्या संघासह न राहण्याचं कारण; म्हणाला, “आता माझ्या हातात तर..”
IPL 2024 Chennai Super Kings vs Gujarat Titans Match Updates in Marathi
IPL 2024: CSK vs GT सामना जडेजासाठी ठरला खास, सीएसकेच्या चाहत्यांनी ८ मिनिटे जागेवर उभं राहत दिली मानवंदना, काय आहे कारण?
IPL 2024 Royal Challengers Bengaluru vs Punjab Kings Match Updates in Marathi
IPL 2024 RCB vs PBKS: विराटला मैदानात भेटण्यासाठी सुरक्षारक्षकांचा डोळा चुकवून पोहोचला चाहता, पाया पडून मारली मिठी; व्हीडिओ व्हायरल

हेही वाचा >>> विश्लेषण : युगांडा येथे पार पडलेली ‘अलिप्ततावादी चळवळ परिषद’ नेमकी काय आहे? ती सुरू करण्यामागचा उद्देश काय होता?

कोहलीने माघार घेण्याबाबत ‘बीसीसीआय’कडून काय सांगण्यात आले?

‘‘विराट कोहलीने वैयक्तिक कारणास्तव इंग्लंडविरुद्ध पहिल्या दोन कसोटी सामन्यांना मुकण्यास परवानगी देण्याची ‘बीसीसीआय’कडे विनंती केली होती. विराटने कर्णधार रोहित शर्मा, संघ व्यवस्थापन, निवड समिती यांच्याशीही संवाद साधला. देशाचे प्रतिनिधित्व करणे आपल्यासाठी सर्वांत महत्त्वाचे असल्याचे त्याने अधोरेखित केले आहे. मात्र, काही वेळा अशी वैयक्तिक परिस्थिती उद्भवते की तुम्हाला तिथेच लक्ष केंद्रित करावे लागते. तुम्हाला प्रत्यक्ष तिथे उपस्थित राहावे लागते,’’ असे ‘बीसीसीआय’चे सचिव जय शहा प्रसिद्धीपत्रकात म्हणाले. तसेच कोहलीने माघार घेण्यामागे नक्की काय वैयक्तिक कारण आहे, याबाबत चाहते आणि माध्यमांनी कोणतेही तर्क लावू नयेत असे आवाहनही शहा यांनी केले.

कोहलीने स्वत:हून सामन्यांना मुकण्याची यापूर्वीची कोणती उदाहरणे आहेत?

कोहलीने २०२१मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान पितृत्वाची रजा घेतली होती. तो केवळ पहिला कसोटी सामना खेळला आणि त्यानंतर तो मायदेशी परतला. त्याच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेने नेतृत्वाची धुरा सांभाळताना भारताला ऐतिहासिक कसोटी मालिका विजय मिळवून दिला होता. त्यानंतर कोहली सातत्याने क्रिकेट खेळला. मात्र, गेल्या वर्षी एकदिवसीय विश्वचषकानंतर कोहलीला विश्रांती देण्यात आली. तो दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० मालिकेत खेळला नाही. मात्र, हा निर्णय निवड समितीचा होता. त्यानंतरच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी त्याचा भारतीय संघात समावेश होता. परंतु, मालिकेला सुरुवात होण्यास काही दिवस शिल्लक असताना कोहलीने वैयक्तिक कारणास्तव संघापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला होता. कुटुंबासोबत थोडा वेळ घालवल्यानंतर तो पहिल्या कसोटीच्या एक दिवसापूर्वी भारतीय संघात पुन्हा दाखल झाला. त्याने पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात ७६ धावांची खेळीही केली, पण भारताला त्या सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. भारताने पुढील कसोटी जिंकत मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली. 

हेही वाचा >>> विश्लेषण : ‘एआरएम चिप’ नेमकी काय आहे? या चिपमुळे विंडोज लॅपटॉपमध्ये क्रांतिकारक बदल घडून येतील?

त्यानंतर भारतीय संघ मायदेशात अफगाणिस्तानविरुद्ध ट्वेन्टी-२० मालिका खेळला. या मालिकेतील पहिल्या सामन्याला कोहली मुकला आणि पुन्हा त्याने वैयक्तिक कारणच दिले. हा सामना ११ जानेवारीला झाला आणि त्याच दिवशी कोहलीच्या मुलीचा वाढदिवस होता. याच कारणास्तव कोहलीने पहिल्या सामन्यातून माघार घेतली असावी अशी चर्चा झाली होती. आता त्याने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटींतून माघार घेतल्याने पुन्हा त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

कोहलीच्या माघारीचा भारताला फटका बसेल का?

कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमरा यांसारख्या तारांकित खेळाडूंना अन्य खेळाडूंपेक्षा वेगळी वागणूक मिळणार हे अपेक्षितच आहे. ते कितपत योग्य आहे, हा वेगळा मुद्दा. मात्र, कोहली आता इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांना मुकणार असल्याचा भारताला नक्कीच फटका बसू शकेल. भारतीय कसोटी संघाच्या मधल्या फळीत सध्या अनुभवी फलंदाजांची कमतरता आहे. चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेसारखे फलंदाज आता भारतीय संघाचा भाग नाहीत. त्यामुळे कोहलीच्या अनुपस्थितीत इंग्लंडविरुद्ध पहिल्या सामन्यात शुभमन गिल तिसऱ्या, श्रेयस अय्यर चौथ्या आणि केएल राहुल पाचव्या क्रमांकावर खेळण्याची दाट शक्यता आहे. गिल आणि श्रेयस यांना कसोटी क्रिकेटमध्ये फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. राहुलने गेल्या दोन सामन्यांपासूनच मधल्या फळीत खेळण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कोहलीचा अनुभव भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा होता.

कोहलीची जागा घेण्यासाठी भारताकडे कोणते पर्याय उपलब्ध?

इंग्लंडविरुद्ध पहिल्या दोन कसोटींसाठी कोहलीच्या जागी मुंबईकर सर्फराज खान आणि मध्य प्रदेशचा रजत पाटीदार यांच्यापैकी एकाला भारतीय चमूत स्थान मिळण्याची शक्यता आहे. पाटीदारने नुकत्याच झालेल्या इंग्लंड लायन्सविरुद्धच्या पहिल्या अनौपचारिक कसोटी सामन्यात भारत-अ संघाचे प्रतिनिधित्व करताना १५१ धावांची खेळी केली होती. दुसरीकडे, सर्फराजने याच सामन्याच्या दुसऱ्या डावात अर्धशतक साकारले होते. सर्फराजने गेल्या काही रणजी हंगामांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये त्याने आतापर्यंत ६८.२०च्या सरासरीने धावा केल्या आहेत. तसेच पुजाराचा पर्यायही निवड समितीसमोर आहे. पुजाराने सध्या सुरू असलेल्या रणजी करंडकातील पाच डावांत सर्वाधिक ४४४ धावा केल्या आहेत. यात एका द्विशतकाचा समावेश आहे. मात्र, आता भारतीय निवड समितीने पुन्हा मागे वळून पाहणार की नव्या चेहऱ्यांना संधी देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.