टेस्ला भारतात कार उत्पादन सुरू करणार होती. अर्थात मेक इन इंडिया चा उद्देश त्याने सफल झाला असता. परंतु आजघडीला मेक इन इंडिया विचार थोडा बाजूला सारूया, मुंबईतील बीकेसी येथे उघडण्यात आलेल्या टेस्लाच्या कारदालनात चीनहून दाखल झालेली टेस्ला मॉडेल वाय कार भारतातील खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यांवर चालवता येईल का, असा प्रश्न उपस्थित होतो.

फुल सेल्फ ड्रायव्हिंगबाबत टेस्लाचे म्हणणे काय?

फुल सेल्फ ड्रायव्हिंग आणि त्याच्याशी निगडित ऑटोपायलट सेफगार्ड्सवरील अवलंबित्व हे कारवरील प्रयोग व त्यानुसार आलेल्या अनुभवांच्या आधारे लाखो किलोमीटर अंतर पार केल्यानंतरच सिद्ध होऊ शकेल. शिवाय, काही बाबतीत नियामक संस्थांची मान्यतेसाठी भविष्यातील मोठा काळ जाऊ शकतो. जसजशी सेल्फ ड्रायव्हिंग यंत्रणा विकसित होत जाईल, तशा सॉफ्टवेअरची पुरवणी कंपनीमार्फत केली जाईल, असे टेस्लामधील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

१६७ मिमी ग्राउंड क्लिअरन्स कितपत सोयीस्कर?

कारमधील सॉफ्टवेअरची गोष्ट विचार करण्याजोगी आहेच. टेस्ला मॉडेल वायच्या हार्डवेअर, अर्थात या कारच्या बांधणीबाबतच बोलायचे झाल्यास १९ इंची चाकांशिवाय कारचा ग्राउंड क्लिअरन्स भारतातील खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यांसाठी पुरेसा आहे का, याबाबत लक्ष दिले गेलेले नाही. इतर देशांत विकल्या गेलेल्या टेस्ला मॉडेल वाय कारचा ग्राउंड क्लिअरन्स हा १६७ मिलिमीटर इतका आहे. पण ४.७९७ मीटर लांब कारसाठी भारतातील रस्त्यांचा विचार केल्यास १६७ मिलिमीटर ग्राउंड क्लिअरन्स फारच अपुरा आहे.

मुंबईतील तप्त स्थितीचा ताप

टेस्ला मॉडेल वाय कारमधील इतर यंत्रणाही भारतीय स्थितीशी जुळवून घेणारी आहे का, याची चाचपणी करण्यात आलेली नाही. विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या टेस्ला मॉडेल वाय कारची मागील आसने उष्ण करणारी यंत्रणा बसविण्यात येणार होती. या यंत्रणेची तशी मुंबईत नक्कीच आवश्यकता नाही. या कारमधील पुढील आसने उष्ण व थंड करण्याची यंत्रणा आहे. शिवाय कारच्या अनावृत्त (अंतर्गत कव्हरशिवाय) सनरूफद्वारे मुंबईतील तळपत्या सूर्याचा कसा सामना केला जाईल, हीसुद्धा विचार करण्याजोगी गोष्ट आहे.

१६ डीसी सुपरचार्जर मुंबईत पुरेसे पडतील का?

टेस्ला कंपनी मुंबईत १६ डीसी सुपरचार्जर (डायरेक्ट करंट) बसविण्याच्या विचारात आहे. परंतु कंपनी देशात सीमित प्रमाणात कार विकणार असली तरी चार्जरची संख्या पुरेशी नाही. विशेष म्हणजे, कंपनी कारसोबत होम चार्जर (एसी-अल्टरनेट करंट) देणार आहे. याचा अर्थ, कंपनीचे भारतातील पणन व्यवस्थापन थेट ग्राहकांशी संबंधित असेल. ती फ्रँचाईझीच्या माध्यमातून विकली जाणार नाही

अमेरिकेत जुनी, चीनमध्ये उतरणीला…

भारतात प्रवेश करतानाची गोष्ट सांगायची तर टेस्लाच्या प्रमुख बाजारपेठांपैकी एक असलेल्या चीनमध्ये कारच्या वार्षिक खपात १८ टक्क्यांनी घट झाली आहे. तर बीवायडीच्या कारविक्रीचा आलेख चढणीला आहे. टेस्लाच्या या घसरणीमागील महत्त्वाचे कारण म्हणजे, कंपनीने गेल्या काळात कारमध्ये नव्या तंज्ञत्रानाचे समावेशन केलेले नाही. अर्थात कंपनीला ताज्या दमाची कार बाजारात आणता आलेली नाही. टेस्ला आपल्या जुन्याच कार विकत असल्याचा अमेरिकेतील ग्राहकांचा आक्षेप आहे. अर्थात टेस्लाचे संस्थापक इलॉन मस्क यांच्या राजकीय सख्यसंबंधाचाही या साऱ्या पडझडीमागे हात आहे.

भारतीय वाहन उद्योगकर्त्यांचा आक्षेप काय?

टेस्लाच्या कारचे पहिले सीमित विक्री दालन मुंबईत सुरू झाले हे भारताच्या दृष्टीने चांगलेच झाले म्हणता येईल. परंतु, अमेरिकेतील बड्या कंपनीची महागडी कार आणण्यासाठी देशाच्या धोरणकर्त्यांनी गेल्या वर्षीच्या सुरुवातीला रेटलेले नवे धोरण हे टेस्ला धोरणच असल्याचा सूर भारतीय वाहन उद्योगाने लावला होता. म्हणजेच टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ ) इलॉन मस्क यांना ज्या पद्धतीने या धोरणाचा अंमल हवा होता, त्याबरहुकूम सारे काही घडले असे म्हणावे लागेल. परंतु याघडीचा महत्त्वाचा प्रश्न असा आहे, की टेस्ला कारची भारतातील निर्मितीची उघडउघड हमी न घेता तिची आयात सुसाध्य करण्यात आली आहे का? चीनमधील शांघाय गिगाफॅक्टरीतून मॉडेल वाय कार टेस्ला आयात करणार असल्याने स्थिती अधिक दुस्तर होईल. एकतर भारतातील स्थितीला जुळवून घेणाऱ्या उत्पादनाविषयी कोणतेही मार्गदर्शन न घेता या गाड्या देशात आणल्या जातील आणि सध्यातरी कारचे भारतात उत्पादन सुरू करण्याचे टेस्लाचे कोणतेही नियोजन नसल्याचे गेल्या महिन्यात केंद्रीय अवजड उद्योगमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी म्हटले होते. शिवाय, भारतात उत्पादन घेण्याविषयी मस्क यांनी केंद्र सरकारला आवश्यक मागदर्शन केले आहे का, याबाबत काही स्पष्टता नाही, तरीही सरकारमधील सूत्रांच्या म्हणण्यानुसार त्या आघाडीवर काही झालेले नाही.

७० टक्के आयातशुल्क …

भारतातील रस्त्यांना साजेशी कार तयार करण्यासाठी तिच्यात आवश्यक बदल अर्थात कारचा आकार व तिची जमिनीपासूनची उंची (ग्राउंड क्लिअरन्स) कमीजास्त करण्यात आली आहे की नाही, याबाबत स्पष्टता नाही. टेस्लाची ही कार अन्य देशांमध्ये विकली जात आहे, तेथील स्थिती वेगळी आहे. त्या तुलनेत भारतातील बदलाचे आव्हान अधिक कठीण आहे. म्हणजेच टेस्लाच्या पूर्ण स्वयंचलित कार अर्थात फुल सेल्फ ड्रायव्हिंगचे (एफएसडी) उदाहरण घेता येईल. कारमधील या सुविधेसाठी टेस्ला ग्राहकांकडून अतिरिक्त सहा लाख रुपये घेतले जातील. म्हणजे, आधीच ७० टक्के आयातशुल्क देऊन ही कार ५९.६८ लाखांमध्ये भारतात आणण्यात आली आहे. म्हणजे अमेरिकेतील विक्री दालनातील किमतीच्या दुप्पट दराने ती भारतीयांना विकत घ्यावी लागणार आहे.

कठोर धोरणांचा आग्रह भारतात होईल का?   

भारतीय वाहतूक स्थितीत अर्थात येथील रस्त्यांवर टेस्ला मॉडेल वाय तिच्या फुल सेल्फ ड्रायव्हिंग वैशिष्ट्यासह धावू शकेल का, याची चाचणी कंपनीने घेतली आहे का व भारतीय ग्राहकांची विदा (डाटा) संचयित होण्यासाठीचे नेमके ठिकाण कोणते असेल, याबाबत कोणतीही स्पष्टता नाही.यासाठी चीनचेच उदाहरण देता येईल. एका देशातून दुसऱ्या देशात विदा हस्तांतरित करण्यासाठी आवश्यक परवानग्या आणि फुल सेल्फ ड्रायव्हिंगचे सॉफ्टवेअर कार्यान्वित करण्याबाबत चर्चेसाठी टेस्लाचे संस्थापक इलॉन मस्क यांनी बीजिंगला अनेकदा वाऱ्या केल्या होत्या. फुल सेल्फ ड्रायव्हिंग सॉफ्टवेअरसाठी मस्क यांनी चीनला चार वर्षांचा कालावधी देऊ केला आहे. मात्र, काही मर्यादित सुविधांचा स्वीकार करून या नोंदणीला चीन परवानगी देईल, असे सांगण्यात येत आहे. यात स्वयंचलित पद्धतीने एका मार्गिकेतून दुसऱ्या मार्गिकेत प्रवेश करण्यासाठी कारमध्ये असलेली यंत्रणा व पार्किंग साह्य यंत्रणा समाविष्ट असेल.

ग्राहकांची विदा सुरक्षा

चीनमधील टेस्ला कार ग्राहकांची विदा ही देशांतर्गत प्रणालीतच साठवली जात आहे. ही विदा अन्य कोणत्याही मार्गाने अन्य देशांत पाठवली जाऊ नये वा तिचा वापर केला जाऊ नये, यासाठी चीन सरकारच्या नियामक संस्थांनी नियम जारी केले आहेत. त्या साऱ्या नियमनात न अडकता चीनमधील टेस्लाच्या ग्राहकांची विदा अमेरिकेत नेऊ द्यावी, यासाठी मस्क यांना २०२१ पासून धीर धरवत नव्हता. भारतीय ग्राहकांविषयी टेस्लाचा काय विचार आहे व त्याला सरकार कसा प्रतिसाद देईल, याबाबत फारच अल्प माहिती आजवर माध्यमांजवळ उघड झाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अगदी अमेरिकेतसुद्धा २०२३ मध्ये टेस्ला कंपनीला त्यांच्या २० लाख कार वारंवार घडलेल्या अपघातांच्या कारणावरून माघारी घ्याव्या लागल्या होत्या. कारण कारमधील स्वयंचलित सुरक्षा (ऑटोपायलट सेफगार्ड्स) यंत्रणेची टेस्लाने पूर्ण हमी देण्यासाठी पुरेशा चाचण्या घेतल्या होत्या का, यासाठी चौकशी सुरू केली होती.