तीन दशकांपूर्वी एका चोरी प्रकरणाने सौदी अरेबिया आणि थायलंडचे संबंध विकोपाला गेले. याच कारणाने मागील वर्षापर्यंत दोन्ही देशांमध्ये कोणतेही द्विपक्षीय राजनैतिक किंवा व्यापारविषयक संबंध अस्तित्वात नव्हते. सौदी अरेबियाने थायलंडसोबतचे सर्व व्यापारी करार रद्दबातल ठरवत थायलंडला जाणारी विमानंही बंद केली. यानंतर थायलंडला मोठा आर्थिक फटका बसला. मात्र, आता सौदी राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांनी मागील आठवड्यात थायलंडच्या पंतप्रधानांची बँकॉकमध्ये भेट घेतली. तसेच दोन्ही देशातील राजनैतिक आणि व्यापारविषयक संबंध सुधारण्याच्या करारावर स्वाक्षरी केली. या प्रयत्नांना मागील वर्षी सुरुवात झाली आहे. या निमित्ताने सौदी अरेबिया आणि थायलंडचे संबंध बिघडवणारी ती ‘हाय प्रोफाईल’ चोरी नेमकी काय आहे? त्याचा दोन्ही देशांच्या संबंधावर परिणाम का झाला? मागील ३० वर्षे नेमकं काय घडलं? याचा हा आढावा…

सौदी अरेबिया आणि थायलंडच्या संबंधांमध्ये मिठाचा खडा टाकणारी प्रसिद्ध चोरी ‘ब्लू डायमंड चोरी’ म्हणून ओळखली जाते. याच चोरीनंतर अनेक खुनाच्या घटना घडल्या आणि त्यानंतर आजपर्यंत या चोरीतील मौल्यवान ब्लू डायमंड हिरा बेपत्ता आहे. सौदी राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांनी थायलंडला भेट दिल्यानंतर ३० वर्षांपूर्वीचं हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आहे.

Israel-Iran Conflict
इराणला प्रत्युत्तर देऊ नका! जागतिक नेत्यांचे इस्रायलला आवाहन
jallianwala bagh 105 years
जालियनवाला बाग हत्याकांड : १०५ वर्षांपूर्वीच्या रक्तरंजित इतिहासाचे स्मरण! नक्की काय घडले त्या दिवशी?
In redevelopment of flat holders Redevelopment Senior
पुनर्विकासातील ज्येष्ठ!
Benjamin Basumatary sleeping on cash
नोटांच्या ढिगाऱ्यावर झोपलेल्या नेत्याचा फोटो व्हायरल; भाजपाच्या मित्रपक्षाने म्हटले…

‘ब्लू डायमंड चोरी’ प्रकरण काय आहे?

१९८९ मध्ये सौदीचे राजा फाहद यांचे पुत्र फैजल बिन फाहद यांच्या महालातून एका थाय कामगाराने मौल्यवान दागिन्यांची चोरी केली होती. क्रिंगकराई टेकमंग (Kriangkrai Techamong) नावाच्या या कामगाराने तब्बल १६३ कोटी ६० लाख २७ हजार रुपयांचे (२० मिलियन अमेरिकन डॉलर) दागिने चोरले होते. यात ५० कॅरेटच्या एका दुर्मिळ ब्लू डायमंडाचाही समावेश होता. विशेष म्हणजे चोरीच्या इतक्या वर्षांनंतर आजही हा हिरा बेपत्ता आहे.

बीबीसीच्या एका वृत्तानुसार, चोरी करणारा थाय कामगार हा खास होता. त्याने शाही कुटुंबाचा विश्वास संपादन केल्यानंतर त्याला शाही बेडरुममध्ये प्रवेशाची परवानगी होती. एका संध्याकाळी याच थाय कामगाराने राजपुत्र फाहद तिजोऱ्या बंद करायचे विसरले असताना शाही बेडरुममध्ये प्रवेश केला आणि राजपुत्राचे मौल्यवान दागिने चोरले. या कामगाराने काही दागिने व्हॅक्युम क्लिनर बॅगमध्ये ठेवले, तर काही दागिने डक्ट टेपचा वापर करून त्याने आपल्या शरीराला चिकटवले.

आरोपी थायलंडच्या कामगाराने चोरीनंतर हे सर्व मौल्यवान दागिने एका मोठ्या कार्गो डिलिव्हरीच्या माध्यमातून थायलंडला पाठवले. तसेच चोरी उघड होण्याच्या वेळी सौदी अरेबियातून फरार झाला. असं असलं तर दुसऱ्या देशातून येणाऱ्या कार्गो डिलिव्हरी सहजपणे थायलंडमध्ये प्रवेश करणार नाही हे आरोपीला माहिती होतं. त्यामुळेच त्याने विनाअडथळा आपली चोरीची लूट थायलंडमध्ये पोहचवण्यासाठी एक शक्कल लढवली. त्याने कार्गोत पोर्नोग्राफिक साहित्य असल्याचं सांगत ते तपासलं जाऊ नये असं म्हटलं आणि सोबत एका पॅकेटमध्ये पैसे ठेवले. ही रक्कम मोठी होती आणि त्यामुळेच कस्टम अधिकाऱ्यांना लाच देण्याचा त्याचा प्लॅन यशस्वी झाला.

या चोरी प्रकरणातील आरोपी कामगार अनेक दिवस फरार राहिला, मात्र अखेर थायलंड पोलिसांनी जानेवारी १९९० मध्ये त्याला थायलंडमधील त्याच्या घरी आला असताना अटक केली. थायलंड पोलिसांना सौदी अरेबियाकडून माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणी आरोपी कामगाराला सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. मात्र, त्याने पोलिसांना सहकार्य करत गुन्ह्याची कबुली दिल्याने त्याला तीन वर्षातच तुरुंगातून सोडण्यात आलं.

या प्रकरणात पोलिसांनी चोरीच्या मुद्देमालापैकी बहुतांश दागिने जप्त केले. काही दागिने आरोपीने बँकाँकमधील एका व्यापाऱ्याला विकले होते. असं असलं तरी सौदी अरेबियाने जप्त केलेल्या दागिण्यांपैकी अनेक दागिने खोटे असल्याचं म्हटलं. यानंतर या प्रकरणाने हिंसक रुप धारण केलं आणि थायलंडमध्ये अनेकांचे खून झाले. फेब्रुवारी १९९० मध्ये बँकॉकमध्ये सौदी दुतावासातील तीन अधिकाऱ्यांचा खून झाला. यानंतर काही आठवड्यात सौदीच्या शाही कुटुंबाचा निकटवर्ती असलेला एक व्यावसायिक बँकॉक बेपत्ता झाला. त्याचीही हत्या झाल्याचं संशय व्यक्त करण्यात आला.

यानंतर सौदी अरेबियाने कठोर भूमिका घेत थायलंडसोबतचे सर्व संबंध संपुष्टात आणले. यानंतर सौदीत असलेल्या हजारो थायलंड कामगारांवर बेरोजगार होण्याची वेळ आली. सौदी अरेबियाने यानंतर थायलंडच्या कामगारांना व्हिसा देणंही बंद केलं. तसेच सौदीच्या नागरिकांनी बँकॉकला भेट देऊ नये, असंही सांगण्यात आलं.

थायलंडमधील हत्याकांडामागे कोण?

सौदी अरेबियाच्या दबावानंतर थायलंड तपास यंत्रणांनी या हत्याकांडाचा तपास केला. यात अनेक धक्कादायक खुलासे झाले. या सर्व हत्याकाडांचा मास्टरमाईंड पोलीस प्रमुख चालोर केर्डथेस हाच निघाला. या पोलीस प्रमुखानेच सौदीच्या शाही कुटुंबातील हे दागिने हडप केले. त्याने १९९४ मध्ये बँकॉकमधील डिलरला विकलेले दागिने मिळवण्यासाठी डिलरची पत्नी आणि मुलाचाही खून केला. हे प्रकरण उघड झाल्यानंतर थायलंड सर्वोच्च न्यायालयाने आरोपी पोलीस प्रमुखाला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. नंतर ही शिक्षा कमी करून २० वर्षांचा तुरुंगवासात रुपांतरीत झाली.

हेही वाचा : विश्लेषण : नुपूर शर्मा वाद अन् आखाती देश… भारतासाठी हे देश एवढे ‘मौल्यवान’ का?

या सर्व घडामोडींनंतर आता जानेवारी २०२२ मध्ये थायलंडच्या पंतप्रधानांनी सौदी अरेबियात जाऊन राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांची भेट घेतली. तसेच १९८९-९० मध्ये झालेल्या घटनांविषयी दिलगिरी व्यक्त केली. यानंतर दोन्ही देशांमधील संबंध सुधारताना दिसत आहेत. स्वतः मोहम्मद बिन सलमान यांनी थायलंडला भेट दिल्याने हे संबंध सुधारण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे.