संरक्षण दलाने सोमवारी (२८ मार्च) संसदेत सीमेवर लढणाऱ्या जवानाचा मृत्यू झाल्यास त्याच्यासाठी भारतीय सैन्य दलात ‘शहीद’ (Martyr) असा शब्दप्रयोग केला जात नसल्याची माहिती दिली. त्यामुळेच जवानांच्या मृत्यूनंतर सर्रास वापरला जाणारा शब्द भारतीय सैन्य दलात का वापरला जात नाहिये याबद्दल चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्रालयाने मांडलेली भूमिका आणि भारतीय सैन्याने जारी केलेले आदेश यावरील हे विश्लेषण…

संरक्षण मंत्रालयाची शहीद शब्दप्रयोगावरील अलीकडची भूमिका काय?

तृणमुल काँग्रेसचे खासदार शंतनू सेन यांनी राज्यसभेत शहीद या शब्दप्रयोगावरून प्रश्न विचारला. कर्तव्यावर असताना देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या जवानांसाठी शहीद शब्दाचा वापर सरकारने थांबवला आहे का? असा सवाल सेन यांनी केला होता. याला संसदेत उत्तर देताना संरक्षण राज्यमंत्र्यांनी शहीद हा शब्द भारतीय सुरक्षा दलात वापरला जात नसल्याचं म्हटलं. मागील दशकापासून सरकारने शहीद हा अधिकृत मान्यता असलेला शब्दप्रयोग नसल्याची भूमिका घेतली आहे.

डिसेंबर २०१५ मध्ये गृहराज्यमंत्री किरोन रिजीजू यांनी भारतीय सुरक्षा दलात जवानाच्या मृत्यूनंतर शहीद हा शब्दप्रयोग केला जात नसल्याची माहिती लोकसभेत दिली होती. यात त्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दल आणि आसाम रायफल्सच्या जवानांसाठी देखील अशा शब्दप्रयोग होत नसल्याचं म्हटलं होतं. डिसेंबर २०२१ मध्ये केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी राज्यसभेत सांगितलं की शहीद असा कोणताही अधिकृत शब्दप्रयोग अस्तित्वात नाही.

शहीद शब्दप्रयोगाला नेमका काय आक्षेप?

शहीद (Martyr) या शब्दाला धार्मिक छटा असल्याचं सांगितलं जातं. इतिहासात धर्मासाठी बलिदान देणाऱ्यांना शहीद मानलं जात होतं. ख्रिश्चन आणि मुस्लीम धर्मात हा शब्दप्रयोग आढळतो. मुस्लीम धर्मात शहादत या शब्दाशी शहीदचा संबंध जोडला जातो. इंग्रजीतील मारटियर हा शब्द ग्रीकमधील मरतूर (martur) या शब्दाशी आहे. हाच संदर्भ देत केंद्र सरकारने या शब्दाला अधिकृत मान्यता नाकारली आहे. भारतीय सुरक्षा दलाचा कोणत्याही एका धर्माशी संबंध नाही आणि मृत्यू होणारे जवान त्यांचं बलिदान धर्मासाठी देत नसल्याचं सांगत सरकारने शहीद शब्दप्रयोग नाकारला आहे.

हेही वाचा : २३ मार्चला शहीद दिवस का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहीद शब्दप्रयोग थांबवण्यासाठी सरकारकडून काय उपाययोजना?

सरकारने जरी शहीद या शब्दाला अधिकृत मान्यता नसल्याचं म्हटलं असलं तरी सरकार आणि सैन्याच्या अनेक प्रेस रिलिजमध्ये या शब्दाचा वापर झाला आहे. त्यामुळे हा शब्द कायमच वापरात राहिला आहे. याच पार्श्वभूमीवर फेब्रुवारी २०२२ मध्ये सैन्याने शहीद हा शब्द प्रयोग करू नये म्हणून आदेशच काढला. तसेच पर्यायी शब्द सुचवताना राष्ट्रासाठी सर्वोच्च बलिदान, भारतीय सुरक्षा दलाचा शूर, वीरगती, वीरगतीप्राप्त, वीर असे शब्द सुचवले.