भालजी पेंढारकर, लता मंगेशकर आणि जयप्रभा स्टुडिओ… कोल्हापूरकरांच्या मनाला भावणारे तीन समान घटक. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर जयप्रभा स्टुडिओमध्ये त्यांचे स्मारक करण्याची मागणी होत आहे, त्याच वेळी चित्रपट कलाकारांनी स्टुडिओचे जतन करून चित्रीकरण केले जावे अशीही मागणी पुढे येऊ लागली आहे. उर्वरित भागाची खरेदी केलेल्या भागीदारांनी स्टुडिओची जागा हवी असेल तर शासनाने पर्यायी जागा द्यावी अशी मागणी केली आहे. अशा विविध अंगांनी स्टुडिओ सध्या चर्चेत आहे.

जयप्रभा स्टुडिओचा वारसा

मराठी चित्रपटाचे माहेरघर ही कोल्हापूरची ओळख आहे. बाबुराव पेंटर यांनी मूकपटांच्या जमान्यात चित्रपटांची निर्मिती केली होती. प्रभात कंपनीनेही येथे बस्तान बसवले होते. ‘प्रभात’ने पुण्यात स्थलांतर केले. तेव्हा कोल्हापुरात चित्रीकरणाची उणीव भासू लागली. तेव्हा छत्रपती राजाराम महाराज यांनी ‘कोल्हापूर सिनेटोन’ची, तर त्यांच्या भगिनी आक्कासाहेब महाराज यांनी ‘शालिनी सिनेटोन’ची उभारणी केली. राजाश्रयामुळे कोल्हापूरची चित्रपटसृष्टी बहरत गेली.

भालजी आणि जयप्रभा स्टुडिओ यांचा काय संबंध?

कोल्हापूर सिनेटोन या स्टुडिओमध्ये भालजी पेंढारकर यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती केली. राजाराम महाराजांच्या काळात कोल्हापूर सिनेटोन भालजींना विकण्यात आला. त्यानंतर भालजींनी त्याचे ‘जयप्रभा स्टुडिओ’ असे नामकरण केले. हा स्टुडिओ त्यांची कर्मभूमी बनला. पुढे हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘शो मॅन’ म्हणून ओळखल्या गेलेल्या राज कपूर यांच्या चेहऱ्याला चित्रीकरणासाठी रंगभूषेचा पहिला रंग येथेच लागला. या स्टुडिओने अनेक चढ-उतार पाहिले. मात्र महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर स्टुडिओची जाळपोळ होऊन मोठे नुकसान झाले. पुढे आर्थिक डोलारा सांभाळणे अडचणीचे झाले. बँकेचे कर्ज वाढत गेले. ते भागवण्यासाठी भालजींनी स्टुडिओ आणि परिसराची जागा आणि पन्हाळा येथील बंगला लता मंगेशकर यांना विकला होता.

मंगेशकरांनी काय प्रयत्न केले?

लता मंगेशकर यांनी जयप्रभा स्टुडिओ चालवण्याचा सुरुवातीच्या काळात प्रयत्न केला. पुढे त्या व्यावसायिक कारणांमुळे मुंबईत गुंतून पडल्याने स्टुडिओकडे साहजिकच दुर्लक्ष झाले. स्टुडिओ उत्तमरीत्या चालवला जावा, यासाठी चित्रपट महामंडळ, चित्रकर्मी यांनी व्यवहार्य प्रस्ताव द्यावा असे त्यांनी २२ वर्षांपूर्वी बोलून दाखवले होते. मात्र त्यासाठी कोणी पुढे आले नाही. स्टुडिओ परिसरात कलाकार, तंत्रज्ञ यांची निवासव्यवस्था असावी यासाठी जागेच्या वापराचा हेतू कृषीऐवजी अकृषी असा बदलण्यात आला. मंगेशकरांनी वीस वर्षांपूर्वी १४ एकरपैकी ११ एकर जागा खाजगी विकासकाला २० वर्षांपूर्वी विकली. तेव्हा त्यास विरोध झाला आणि त्यानिमित्ताने स्थानिक राजकारण सुरू झाले. स्टुडिओचा उर्वरित परिसर वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट केला गेला. ही बाब पुढे करून स्टुडिओ परिसर विकता येणार नाही असा मुद्दा निर्माण झाला. प्रकरण न्यायप्रविष्ट झाले. दरम्यान दोन वर्षांपूर्वी श्री महालक्ष्मी स्टुडिओज भागीदारी फर्मने उर्वरित जागा रीतसर खरेदी केली असल्याचे नुकतेच समोर आले आहे.

लता मंगेशकर स्मारकाचा मुद्दा काय?

लता मंगेशकर यांचे निधन झाल्यानंतर जयप्रभा स्टुडिओमध्येच त्यांचे स्मारक करण्याची मागणी होत आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी त्यासाठी राज्य शासनाकडे प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे. कोल्हापूर शहर व जिल्हा कृती समितीसह अन्य काही संस्थांनीही अशीच मागणी केली आहे. स्टुडिओच्या खरेदीचा मुद्दा पुढे आल्यावर अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे पदाधिकारी व कलाकार यांनी स्टुडिओमध्ये चित्रीकरण केले जावे, त्याचे जतन केले जावे अशी मागणी करून बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे. एकीकडे स्मारक आणि दुसरीकडे जतन अशा दोन कारणांसाठी जयप्रभा स्टुडिओ पुन्हा चर्चेत आला आहे. स्टुडिओच्या खरेदीत शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या दोन मुलांचा समावेश असल्याने त्याला राजकीय किनार आहे. श्री महालक्ष्मी स्टुडिओज भागीदारी फर्ममधील भागीदारांचे लता मंगेशकर यांच्याशी अनेक वर्षे व्यावसायिक संबंध आहेत. कायदेशीर बाबीची पूर्तता करून दहा वर्षांपूर्वी खरेदी व्यवहार झाला होता. अलीकडे त्याची रीतसर खरेदी झाली आहे. पुरातन वास्तुला धोका न पोचवता संगीत, कला, नाट्य क्षेत्राच्या दृष्टीने विकसित करण्याचा भागीदारी संस्थेचा उद्देश आहे. तरीही जयप्रभा स्टुडिओ विकला जाणार, तो पाडला जाणार असा अपप्रचार करून आपली बदनामी केली जात आहे, असे क्षीरसागर यांचे म्हणणे आहे. या जागेचा समावेश कोल्हापूर महापालिकेने वारसास्थळात केल्याने व्यावसायिक बांधकाम करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. लताबाईंचे स्मारक करण्याला आपला पाठिंबा आहे. मात्र त्यासाठी स्टुडिओऐवजी नगर विकास विभागाने पर्यायी जागा द्यावी, अशी मागणी त्यांनी मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. जयप्रभा स्टुडिओ हे खरोखरीच कलाप्रेमींसाठी एवढे महत्त्वाचे स्थळ असेल, तर ते यापूर्वीही त्याच क्षमतेने पुढे कसे आले नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जयप्रभा बंद झाल्यानंतर कोल्हापुरात अन्य कोठेही चित्रीकरणाची व्यवस्था असावी, यासाठी प्रयत्न कसे झाले नाहीत आणि जणू हा एकच स्टुडिओ असल्याचे दाखवत पुन्हा आंदोलनाचा पवित्रा घेणे कितपत योग्य, असाही प्रश्न पुढे येत आहे. सध्या तरी स्टुडिओचे प्रकरण सत्र न्यायालयात प्रलंबित आहे, हीच वस्तुस्थिती आहे.

dayanand.lipare@expressindia.com