हृषिकेश देशपांडे
आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपने चारशे जागांचे उद्दिष्ट ठेवले आहे, त्यात कसर राहू नये म्हणून सारे प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीत नितीशकुमार यांचा संयुक्त जनता दल किंवा उत्तर प्रदेशात जयंत चौधरी यांच्या राष्ट्रीय लोकदलाचा प्रवेश हा त्याचाच परिपाक म्हणावा लागेल. आता महाराष्ट्रात निष्ठावंत काँग्रेस कुटुंबातील अशोक चव्हाण यांचा भाजपप्रवेश हा त्याच रणनीतीचा भाग आहे. एखाद्या व्यक्तीचा उपयोग किती, यापेक्षा विरोधकांचे मनोधैर्य खच्ची करणे हाच यात हेतू दिसतो. एखादा मोठा नेता आला की, त्याचे समर्थकही येतात. त्यामुळे मतांची बेरीज जरूर होते, त्यापेक्षा विरोधकांचा धक्का देत, जे कुंपणावरचे मतदार आहेत त्यांच्यात संभ्रम निर्माण करून अधिकाधिक जागा मिळवण्याचा भाजपचा हा प्रयत्न आहे. ६५ वर्षीय अशोक चव्हाण यांना काँग्रेसने मुख्यमंत्रीपदापासून सारे काही दिले, तरीही त्यांनी भाजपमध्ये का प्रवेश केला, असे प्रश्न विचारले जात आहेत. अर्थात चव्हाण यांनीही पक्षाचे प्रामाणिकपणे काम केल्याचे नमूद केले.

मराठवाड्यातील स्थान

मराठवाड्यात लोकसभेच्या ८ तर विधानसभेच्या ४० च्यावर जागा आहेत. लोकसभेच्या २ वगळता सध्या ६ जागा महायुतीकडे ताब्यात आहेत. अगदी अशोक चव्हाण यांनाही गेल्या लोकसभा निवडणुकीत फटका बसला. तरीही भाजपने त्यांच्यासाठी पायघड्या का घातल्या, यात जुन्या कार्यकर्त्यांचे काय, असे मुद्दे आहेत. काही सर्वेक्षणांनुसार, आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला महाविकास आघाडी जोरदार टक्कर देईल असा अंदाज वर्तवला जातोय. कदाचित यामुळेच भाजप श्रेष्ठी विरोधातील प्रमुख मोहरे फोडण्याच्या प्रयत्नात दिसतात. अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाने नांदेड, हिंगोली येथे महायुतीला लाभ होईल. मात्र या जागा सध्या महायुतीकडेच आहेत. तरीही धोका नको हा चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाचा हेतू असावा. अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपद भूषवल्याने मराठवाड्याबाहेरही काही आमदार त्यांचे नेतृत्व मानतात. त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो. मराठा आंदोलनाचा प्रभाव मराठवाड्यात अधिक आहे. अशोक चव्हाण यांच्यासारखा मराठा नेता आल्याने एक संदेश जाऊ शकतो. याखेरीज वर्षाअखेरीस होणारी विधानसभा निवडणूकही भाजपच्या डोळ्यापुढे आहे. सध्याचे भाजप नेतृत्व दीर्घकालीन लाभावर लक्ष ठेऊन धोरण ठरवते. मराठवाड्यात परभणी, हिंगोली, नांदेडमध्ये भाजपचा तितकासा प्रभाव नाही. अशोक चव्हाण यांच्या प्रवेशाने तेथे भाजप बळकट होईल अशी अपेक्षा आहे.

हेही वाचा… आदर्श घोटाळ्याचं काय झालं? भाजपा प्रवेशानंतर अशोक चव्हाण म्हणाले, “हा राजकीय…”

तपास यंत्रणांच्या दबावाचा आरोप

केंद्रीय तपास यंत्रणांच्या दबावाने अशोक चव्हाण यांनी पक्ष सोडल्याचा आरोप प्रामुख्याने काँग्रेसमधून होत आहे. विरोधात बसून राजकारण करणे कठीण आहे असे वक्तव्य या पक्षांतरावर काँग्रेसने दिले. ज्या भाजपने अशोक चव्हाण यांच्यावर मुख्यमंत्री असताना भाजपने अनेक आरोप केले, तसेच तुरुंगात डांबण्याची भाषा होती. याखेरीज नांदेडमध्येही भाजपच्या अनेक जुन्या कार्यकर्त्यांनी अशोक चव्हाण यांच्याशी वारंवार दोन हात केले. त्यांना आता त्यांचे नेतृत्व स्वीकारण्याची वेळ आली आहे. मात्र भाजपच्या पक्षशिस्तीपुढे हे कार्यकर्ते जाहीर वाच्यता करणार नाहीत. मात्र ही अस्वस्थता या कार्यकर्त्यांमध्ये राहणारच. केवळ उदात्त हेतूसाठी जे येतील त्यांना आपण घेत आहोत असा बचाव या कार्यकर्त्यांना करावा लागेल. मात्र स्थानिक निवडणुकांमध्ये या नव्या कार्यकर्त्यांना कसे सामावून घेणार, असा भाजपपुढे प्रश्न आहे. गेल्या पाच वर्षांत मोठ्या प्रमाणात इतर पक्षांतून कार्यकर्ते आले आहेत. त्यानंतर पालिकांच्या निवडणुका झाल्या नाहीत. त्यामुळे उमेदवारीसाठी भाजपकडे जुने विरुद्ध नवे असा संघर्ष होऊ शकतो. यामुळे एकीकडे नव्यांना प्रवेश देताना जुन्यांना भाजपला दिलासा द्यावा लागेल.

हेही वाचा… ‘भाजपा फोडाफोडी करुन जिंकते’, काँग्रेसच्या आरोपावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “तिथली पुण्याई सोडून नेते..”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आणखी फूट शक्य?

अशोक चव्हाण यांच्यानंतर काँग्रेसमधील काही आमदार फुटण्याची चर्चा सुरू झाली. आपला निर्णय व्यक्तिगत असल्याचे सांगत पक्षप्रवेशावेळी अधिक भाष्य करण्याचे त्यांनी टाळले. मात्र राज्यातील अनेक आमदारांशी चव्हाण यांचे व्यक्तिगत संबंध आहेत. त्यातच भाजपची केंद्राबरोबरच राज्यात सत्ता असल्याने आणखी फूट पाडण्याचा प्रयत्न होईल. सध्याच्या काळात वैचारिक निष्ठेपेक्षा झटपट पुढे जाण्याची स्पर्धा आहे. त्यातही सत्तेच्या जवळ राहिल्याने मतदारसंघात फायदे मिळतात हा विचारही बळावतो. भाजपनेही यापुढील काळात जनाधार असलेल्या नेत्यांचे पक्षात स्वागत असल्याचे जाहीर केले. यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी आणखी पक्षप्रवेश होणार हे उघड आहे. मिलिंद देवरा, बाबा सिद्दिकी आणि अशोक चव्हाण अशा वर्षानुवर्षे काँग्रेसमध्ये राहिलेल्या व्यक्तींनी पक्ष सोडल्याने विरोधकांच्या निवडणुकीतील भवितव्याची चर्चा सुरू झाली. अर्थात व्यक्तीपेक्षा काँग्रेस विचारांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. त्याला बरोबर घेऊन काँग्रेसला नव्या व्यक्तींना उमेदवारी द्यावी लागेल. तर पक्षाला उभारी मिळेल अन्यथा फुटीचे लोण वाढत जाऊन विरोधकांचे मनोधैर्य खच्ची होण्याचा धोका अशा पक्षांतरामधून अधिक आहे.
hrishikesh.deshpande@expressindia.com