रज़्मनामा हा पर्शियन भाषेतील युद्ध विषयक ग्रंथ आहे. या ग्रंथाची नाळ थेट भारतीय भूमीशी जोडलेली आहे. रज़्मनामा हा महाभारताचा पर्शियन भाषेतील पहिला अनुवाद आहे. हा अनुवाद अकबराच्या कालखंडात १५८२ मध्ये करण्यात आला. अकबराच्या दरबारातील इतिहासकार अब्दुल क़ादिर बदायूंनी याने याबद्दल मुन्तखाब-उत-तवारीखमध्ये नमूद केले आहे. रज़्मनामा या ग्रंथाचे चार खंड आहेत. हे चार खंड रचनाबद्ध करण्यासाठी चार वर्षांचा कालखंड लागला. संस्कृत विद्वान, पर्शियन अनुवादक आणि कारागीर यांनी एकत्रितरित्या या भव्य खंडाची निर्मिती केली. यात सुमारे एक लाख संस्कृत श्लोकांच्या अनुवादाचा समावेश आहे.

आणखी वाचा: महाभारत खरंच घडले होते का? काय सांगतात पुरातत्त्वीय पुरावे?

Dram Hridayangam picture and biography of village culturea
नाट्यरंग: ‘मुक्काम पोस्ट आडगाव’; ग्रामसंस्कृतीचं हृदयंगम चित्र आणि चरित्र
Why frequent allegations of political infiltration in Sahitya Akademi
विश्लेषण: साहित्य अकादमीत राजकीय घुसखोरीचा आरोप वारंवार का?
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips
यूपीएससीची तयारी :  भूगोल (भाग २)
gondwana supercontinent overview interesting facts about gondwana supercontinent
भूगोलाचा इतिहास : गोंडवाना के भुईया मा..

अकबराने महाभारतच का निवडले?

अकबराने महाभारत हे महाकाव्य निवडण्यामागे एक महत्त्वाचे कारण होते, महाभारत हे हिंदू धर्मातील सर्वात प्रसिद्ध महाकाव्य आहे. यात अनेक प्रकारच्या कथा, रोजच्या आयुष्याला लागू पडणारी नैतिक शिकवण, तसेच  धर्म आणि विज्ञान यांच्याशी संबंधित ज्ञान आहे. याशिवाय अकबराला त्याच्या राज्यात एकता टिकवून ठेवण्यासाठी, गैर मुस्लीम प्रजाजनांवर राज्य करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा वाटला, असे बदायूंनी नमूद करतो. महाभारताचे फारसी भाषेत भाषांतर करण्यामागे राजकीय कारण आहे. त्याची प्रजा बहुभाषिक असूनही अकबराला त्याच्या साम्राज्यासाठी एक समान भाषा हवी होती. त्याचे प्राधान्य पर्शियन भाषेला (फ़ारसी भाषा) होते, जी मुघल दरबारातील साहित्यिक भाषादेखील होती. जगभरात रज़्मनामांच्या अनेक प्रती आहेत. जयपूर सिटी पॅलेस म्युझियममध्ये अकबराचा मूळ रज़्मनामा आहे. ही मूळ प्रत १७४० साली ४०२४ अकबरी रुपयांना विकत घेण्यात आली होती. दुर्दैवाने, कौटुंबिक वादामुळे १९८६ पासून सर्वोच्च न्यायालयाने रज़्मनामाची प्रत बाहेर घेऊन जाण्यासाठी बंदी घातली आहे. 

अब्दुल क़ादिर बदायूंनी (सौजन्य: विकिपीडिया)

रज़्मनामा कसे आकारास आले?

बदायूंनीच्या ‘मुंताखाब अल- तवारीख’मधील एका उताऱ्यानुसार, अकबराने आपल्या दरबारातील विद्वान लोकांना बोलावले आणि त्यांना महाभारताचे भाषांतर करण्याचा आदेश दिला. मुस्लीम धर्मतज्ज्ञ नकीब खान यांना मजकूर समजावून सांगण्यात त्यांनी अनेक रात्री घालवल्या. 

अकबराच्या दरबारात महाभारताचे भाषांतर मुख्य तीन टप्प्यांमध्ये पार पडले. पहिल्या टप्प्यात हिंदू विद्वानांनी प्रत्येक श्लोकाचा अर्थ स्पष्ट केला, दुसऱ्या टप्प्यात मुस्लीम धर्म अभ्यासक नकीब खान यांनी फारसीमध्ये मसुदा तयार केला. तिसऱ्या टप्प्यात फैजीने (अबू अल-फ़ैज़ इब्न) गद्य किंवा पद्यात सुधारणा घडवून आणली. फारसी भाषेत “रज़्म” म्हणजे “युद्ध” आणि “नामा” म्हणजे “कथा”. म्हणजेच रज़्मनामा या नावाचा अर्थ युद्धाची कथा असा आहे. देव मिश्रा, शतावधन, मधुसूदन मिश्रा, चतुर्भुजा आणि शेख भवन अशा अनेक विद्वान ब्राह्मणांनी संस्कृत मधून हिंदी भाषांतराला मदत केल्याचे ऐतिहासिक दस्तऐवजांमध्ये नमूद करण्यात आले आहे. 

आणखी वाचा: विश्लेषण: रामायण एक अन्वयार्थ अनेक!

रज़्मनामाची  किती हस्तलिखिते उपलब्ध आहेत?

रज़्मनामाची चार सचित्र मुघल हस्तलिखिते उपलब्ध आहेत, त्यातील पहिली प्रत १५८४ ते १५८६ या दरम्यान तयार करण्यात आली. आता ही प्रत जयपूरमध्ये असून त्यातील १४७ लघुचित्रे थॉमस होल्बेन हेंडले यांनी १८८४ साली पुनःप्रकाशित केली. नंतरच्या कालखंडात तयार करण्यात आलेल्या प्रतीची पृष्ठे भारत, युरोप, अमेरिकेतील संग्रहालयांमध्ये विखुरलेली आहेत. तिसरे हस्तलिखित १६०५ मध्ये तयार करण्यात आले, ते ‘बिर्ला हस्तलिखित’ म्हणून ओळखले जाते, सध्या कोलकाता येथील बिर्ला अकादमी ऑफ आर्ट अ‍ॅण्ड कल्चरमध्ये आहे. चौथे हस्तलिखित १६१६-१६१७ मध्ये तयार करण्यात आले. पहिल्या प्रतीमध्ये मुशफिक या मुघल दरबारातील कलाकाराने साकारलेली लघुचित्रे असून अबुल फझल याने प्रस्तावना लिहिलेली आहे. या प्रतीच्या फोलिओ ११ मध्ये अबुल फझलने १५८८ हे वर्ष नमूद केले आहे. व्यास ऋषींनी महाभारताची रचना केली तर कवी अबुल फझल याला पर्शियन महाकाव्याचे प्रमुख लेखक म्हणून श्रेय दिले जाते. हा अकबराच्या दरबारातील नवरत्नांपैकी एक होता. या प्रतिसाठी दौलताबादचा कागद वापरण्यात आलेला आहे. दुसरी प्रत १५९८ ते १५९९ दरम्यान पूर्ण झाली. पहिल्या प्रतीच्या तुलनेत, दुसरी प्रत अधिक विस्तृत आहे, ज्यामध्ये १६१ चित्रे आहेत. 

अबुल फझल (सौजन्य: विकिपीडिया)

मकतब खाना

हा ग्रंथ  ‘मकतब खाना’च्या अनुवादकांनी रचनाबद्ध केला.  मकतब खाना म्हणजे  ‘भाषांतराचे घर’ असा आहे. १५७४ च्या सुमारास फतेहपूर सिक्री येथे मुघल सम्राट अकबराने हे स्थापन केले होते. मकतब खाना हा अनुवाद आणि नोंदी ठेवण्यासाठी वापरात होता. मकतब खानाने रामायण आणि राजतरंगिणी (काश्मीरच्या राजांचा इतिहास) सारख्या इतर महत्त्वाच्या संस्कृत ग्रंथांचे फारसीमध्ये भाषांतर केले.

हिंदू आणि मुस्लीम विद्वान महाभारताच्या अनुवादावर चर्चा करताना
(सौजन्य: विकिपीडिया)

आणखी वाचा: अंकुशपुराण : अस्सल महाराष्ट्रीय रामायण आहे तरी काय?

थोडक्यात सांगायचे तर, रज़्मनामा हे हिंदू महाकाव्य महाभारताचे पर्शियन भाषांतर होते. हे एक “युद्धाचे पुस्तक” आहे जे अकबराच्या कारकिर्दीत मकतब खानाच्या अनेक अनुवादकांनी तयार केले होते. आधुनिक काळातील इतिहासकार आणि विद्वानांना तीन दशकांहून अधिक काळ रज़्मनामा उपलब्ध झाले नाही. त्याच्या दुर्मिळतेमागे कौटुंबिक कलहाचा आणि राजघराण्यातील विविध दाव्यांची पार्श्वभूमी आहे. त्यामुळेच न्यायालयाकडून त्यावर बंदी घालण्यात आली आहे. विद्वानांना केवळ मजकुराच्या प्रतींवर अवलंबून राहावे लागते. १६९० पासून जयपूर सिटी पॅलेस म्युझियममध्ये रज़्मनामाची प्रत ठेवण्यात आली होती. या हस्तलिखिताची सध्याची स्थिती इतिहासकारांमध्ये चिंतेचा विषय आहे. इतिहासकार आणि कला तज्ज्ञांसाठी ते कधी उपलब्ध होईल हे सध्या कोणीही सांगू शकत नाही. तोपर्यंत  बिर्ला अकादमी ऑफ आर्ट अ‍ॅण्ड कल्चर, कोलकाता येथे रज़्मनामाच्या पूर्ण प्रतीच्या माध्यमातून भूतकाळाची काही झलक मिळू शकते.