देवेश गोंडाणे

‘महाज्योती’च्या स्थापनेने इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग या घटकातील विद्यार्थ्यांना कधी नव्हे ते आपल्या उज्ज्वल भविष्याविषयी आशेचा किरण दिसू लागला. मात्र, संस्था स्थापनेपासूनच तज्ज्ञ मंडळींची कमतरता, अंतर्गत वाद, राजकारण आणि प्रशिक्षण व साहित्य खरेदीला लागलेली भ्रष्टाचाराची कीड यामुळे ही संस्था कायम वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.

‘महाज्योती’चा उद्देश काय?

‘बार्टी’च्या धर्तीवर राज्यात २०१६मध्ये ‘सारथी’ची स्थापना करण्यात आली. मात्र, यामध्ये केवळ मराठा आणि कुणबी या दोनच प्रवर्गांचा समावेश असल्याने इतर मागासवर्गियांसाठीही अशी संस्था असावी अशी मागणी काही संघटनांकडून करण्यात आली. त्यामुळे पुढे ‘सारथी’च्या धर्तीवर ‘व्ही भारती’ या नावाने इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग या घटकांसाठी संस्था स्थापन करण्यात आली. फेब्रुवारी २०१९ पासून संस्थेचे काम सुरू झाले. पुढे ‘महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था’ (महाज्योती) असे नाव देण्यात आले. ऑगस्ट २०२०मध्ये यासाठी संचालक मंडळ गठित करण्यात आले. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकास, संशोधन, रोजगाराभिमुखता वृद्धी, कौशल्य विकास, स्वयंरोजगार, ग्रामीण विकास, शेती विकास, व्यक्तिमत्त्व विकास, स्पर्धात्मकता विकास, सामाजिक ऐक्य व सलोखा आदी क्षेत्रांमध्ये काम करणे ही संस्थेची उद्दिष्टे आहेत.

प्रशिक्षण कार्यक्रमांचा गोंधळ काय?

‘महाज्योती’मध्ये प्रशिक्षण कार्यक्रमांची सुरुवात पोलीस प्रशिक्षणाने करण्यात आली. पहिल्या टप्प्यात पाच हजार विद्यार्थ्यांना ते देण्यात आले, मात्र, ऑनलाईन माध्यमातून असल्याने केवळ शंभरच विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणाचा लाभ घेतल्याचा आरोप आहे. दुसरा गोंधळ आहे तो जेईई प्रशिक्षणाचा. हा उपक्रम करोना काळातला त्यामुळे ऑनलाईनच. यासाठी आवश्यक असणारे साहित्य मात्र वर्षभरानंतर पुरवण्यात आल्याने अपेक्षित निकालापर्यंत संस्थेला पोहोचता आले नाही. अशीच अवस्था केंद्रीय लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या प्रशिक्षण कार्यक्रमांचीही आहे. करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे सर्व शाळा, महाविद्यालये सुरू झाली असतानाही ‘महाज्योती’ने आपले प्रशिक्षण कार्यक्रम मात्र ऑनलाईन सुरू ठेवल्याने यूपीएससीच्या ८५३ तर एमपीएससीच्या १५०० विद्यार्थ्यांना त्याचा हवा तसा लाभ घेता आला नाही.

टॅब्लेट व इतर साहित्य वाटपावर आक्षेप काय?

‘महाज्योती’ने पोलीस प्रशिक्षणार्थींना नागपूरातील एका प्रकाशन संस्थेची पुस्तके अभ्यासाला दिली. कुठल्याही दर्जेदार संस्था या पुस्तकांचा वापर करत नसताना, अशा संस्थेला हे कंत्राट देऊन संस्था प्रशासनाने आपल्या अकार्यक्षमतेचा पुरावा दिला. तर टॅब्लेट वाटपामध्येही असाच घोळ घालण्यात आला. विद्यार्थ्यांची बारावीची परीक्षा सुरू होण्याच्या काळात त्याचे वाटप करण्यात आले. त्यामुळे ऑनलाईन वर्गासाठी या टॅब्लेटचा वापरच करता आला नाही. प्रशिक्षण कार्यक्रम आखताना संस्थेच्या अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याने वारंवार दिसून आले. यूपीएससीच्या प्रशिक्षणासाठी १२ जुलैला प्रवेशपूर्व परीक्षा घेण्यात आली. मात्र, अद्यापही त्याचा निकाल नाही. निकाल जाहीर झाल्यावर १५०० विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करून त्यांचे प्रशिक्षण सुरू होण्यास सप्टेंबर उजाडेल. यूपीएससीची परीक्षा २८ मे २०२३ला आहे. त्यामुळे केवळ आठ महिन्यांच्या शिकवणीवर यूपीएससीसारख्या परीक्षेला कसे सामोरे जावे, असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर आहे.  

‘महाज्योती’मध्ये प्रवर्गांचा वाद काय?

सारथीमध्ये मराठा आणि कुणबी या दोन घटकांचा समावेश आहे. तर ‘महाज्योती’मध्येही ओबीसींमधील कुणबी घटकाचा समावेश असल्याने या एका प्रवर्गाला दोन्ही संस्थांमध्ये लाभ घेता येतो. त्यामुळे ‘महाज्योती’ही ओबीसी विद्यार्थ्यांसाठी असल्याने सारथीमधून कुणबी घटकाला वगळून त्यांचा समावेश केवळ ‘महाज्योती’मध्ये ठेवावा अशी मागणी होत आहे. यासाठी ‘महाज्योती’च्या निधीमध्ये आवश्यक ती वाढ करावी आणि कुणबी समाजाला दोन्हीकडे लाभ देण्याचा गोंधळ संपवावा अशी मागणी सातत्याने केली जाते.

संशोधन अधिछात्रवृत्तीमध्ये गोंधळ काय?

संस्थेच्या वतीने संशोधनाला चालना देण्यासाठी पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अधिछात्रवृत्तीची योजना सुरू करण्यात आली. मात्र, या लाभार्थींना पीएच.डी. नोंदणीपासून अधिछात्रवृत्ती लागू करण्यास संस्थेचा नकार आहे. बार्टी आणि सारथीमध्ये पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी संबंधित विद्यापीठात नोंदणी केल्यापासून अधिछात्रवृत्ती लागू केली जाते. मात्र, ‘महाज्योती’ने या नियमाला बगल देत त्यांच्याकडे नोंदणी झाल्याच्या दिनांकापासून अधिछात्रवृत्ती देण्याचा निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांचे सात ते आठ महिन्यांच्या अधिछात्रवृत्तीचे नुकसान होणार आहे.

व्यावसायिक वैमानिक प्रशिक्षणाचे काय झाले?

संस्थेने विद्यार्थ्यांना व्यावसायिक वैमानिक प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, ते अजून सुरू झाले नाही. या क्लबमध्ये विमान व अन्य सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे येथून प्रशिक्षित होऊन एकही तुकडी बाहेर निघालेली नाही. व्यावसायिक वैमानिक प्रशिक्षणासाठी राज्यातील हजारो इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्ज केले असून दीड वर्षांपासून त्यांचे अर्ज पडून आहेत.

महाज्योतीवर भटके, विमुक्त नाराज आहेत का?

महाज्योतीची स्थापना ही इतर मागासवर्गासह विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग या घटकांसाठी झाली. मात्र, येथील संचालक मंडळावर केवळ ओबीसी घटकांचीच नियुक्ती करण्यात आली. तीन वर्षांत संस्थेने भटक्या जमाती, विमुक्तीसाठी जातीपूरक प्रशिक्षण आवश्यक असतानाही तशी कुठलीही योजना सुरू केली नाही. त्यामुळे महाज्योती केवळ एकाच वर्गाच्या भल्यासाठी सुरू झाली आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो.

तज्ज्ञ अधिकाऱ्यांची वानवा?

संस्था सुरू होऊन तीन वर्षे झाली तरी पूर्णवेळ व्यवस्थापकीय संचालकांचे पद भरले गेले नाही. इतर विविध पदांच्या भरतीसाठी वर्षभराआधी जाहिरात देऊनही ही भरती पुढे सरकली नाही. येथील प्रकल्प व्यवस्थापक तज्ज्ञ नसल्याने अनेक योजना सुरू होताच बारगळल्या.