महाराष्ट्र विधानसभेची २०२४ ची निवडणूक जशी सहा प्रमुख पक्षांच्या साठमारीमुळे वैशिष्ट्यपूर्ण ठरली, तशीच एकाच घरातील व्यक्ती दोन पक्षांकडून उभे राहिल्याने रंजक बनली. सामान्य कार्यकर्ता केवळ प्रचारापुरताच राहिलाय. उमेदवारी मिळाली नाही तर थेट दुसऱ्या पक्षातून संधी मिळवायची हाच शिरस्ता बहुतेक नेत्यांचा दिसतोय. यात पक्षनिष्ठा किंवा शिस्त याला कुठेही स्थान नाही. परिणामी एकेका जिल्ह्यात एकाच कुटुंबातील व्यक्ती वेगवेगळ्या मतदारसंघातून भाग्य आजमावत आहेत.

उमेदवारी वाटपात नातलगशाही

महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) तसेच शिवसेना (उद्धव ठाकरे) तसेच महायुतीमधील भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या सहा प्रमुख पक्षांच्या उमेदवारी यादीवर नजर टाकल्यावर घराण्यांचा किती पगडा आहे हे स्पष्ट होते. याला कोणताच पक्ष अपवाद नाही. त्यामुळे एरवी एकमेकांच्या नावे टीका करणाऱ्या पक्षांमध्ये घराणेशाहीच्या बाबतीत तरी एकमत दिसते. शिस्तबद्ध तसेच वेगळेपण सांगणारा भाजपही याला अपवाद नाही.

हेही वाचा >>>समोसा कॉकस म्हणजे काय? अमेरिकेच्या निवडणुकीत का चर्चेत?

कुटुंबात पक्ष वेगळे

भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक हे भाजपकडून ऐरोली मतदारसंघातून रिंगणात आहेत. तर त्यांचे पुत्र संदीप हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून लढत आहेत. संदीप हे भाजपमध्ये होते. मात्र उमेदवारी देण्याचे वचन पक्षाने पाळले नाही असा आरोप करत त्यांनी भाजप आमदार मंदा म्हात्रे यांना आव्हान दिले. खासदार नारायण राणे यांचे एक पुत्र निलेश हे शिवसेना (एकनाथ शिंदे) यांच्या पक्षातून तर नितेश हे भाजपचे आमदार असून, ते पुन्हा कौल आजमावत आहेत. नंदुरबारमध्ये तर गावित कुटुंबातील व्यक्ती जिल्ह्यातील चारही मतदारसंघातून वेगवेळ्या पक्षातून भाग्य आजमावत आहेत. ६९ वर्षीय विजयकुमार गावित हे भाजपकडून नंदुरबार मतदारसंघातून पुन्हा रिंगणात आहेत. त्यांचे बंधू राजेंद्र यांनी शहाद्यातून काँग्रेसची उमेदवारी घेतली. तर नवापूर मतदारसंघात विजयकुमार यांचे धाकटे बंधू शरद अपक्ष म्हणून महाविकास आघाडी तसेच महायुतीला आव्हान देत आहेत. तर विजयकुमार गावित यांच्या कन्या व भाजपच्या माजी खासदार हिना गावित या अक्कलकुवा मतदारसंघातून अपक्ष म्हणून लढत आहेत. गडचिरोलीत अहेरी मतदारसंघात अत्राम कुटुंबातील सदस्य एकमेकांच्या विरोधात आहेत. अजित पवार यांच्या गटाकडून धर्मरावबाबा अत्राम लढत आहेत. त्यांना कन्या भाग्यश्री यांनी शरद पवार गटाकडून आव्हान दिले. तर भाजप बंडखोर अंबरिशराव अत्राम हेदेखील उमेदवार आहेत. बीडमध्ये क्षीरसागर घराण्यातही राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांतून दोघे उभे आहेत. मुंडे कुटुंबातून धनंजय मुंडे व पंकजा वेगवेगळ्या पक्षात असले तरी, त्यांचा जिल्ह्याच्या राजकारणावर पगडा आहे.

एका घरात अनेक पदे

राजकारणात घराणेशाही ही नवीन नाही. मात्र एकाच घरात अनेक पदे दिली जातात. बारामतीमध्ये पवार कुटुंबातच विधानसभेला लढाई आहे. अजित पवारांसमोर त्यांचे पुतणे युगेंद्र उभे आहेत. याशिवाय पवार घरात तीन खासदार आहेत. भाजपमध्ये राज्यसभा सदस्य अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया यांना भोकर मतदारसंघातून भाजपने विधानसभेला संधी दिली. तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नगरचे खासदार नीलेश लंके यांच्या पत्नी राणी यांना त्यांच्या पक्षाने विधानसभेला पारनेरमधून संधी दिली. मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार व त्यांचे बंधू विनोद हे दोघेही विधानसभेला उमेदवार आहेत.  शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे मुंबईतील खासदार रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा यांना जोगेश्वरी पूर्वमधून उमेदवारी मिळाली. रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना (एकनाथ शिंदे) गटाचे ज्येष्ठ नेते उदय सामंत व त्यांचे बंधू किरण हे दोघे रिंगणात आहेत. छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांच्या मुलालाही उमेदवारी मिळाली. याखेरीज नवाब मलिक व त्यांची कन्या सना या रिंगणात आहेत. काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांचा भाऊ काँग्रेसचा उमेदवार आहे. सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे राज्यसभा सदस्य नितीनकाका पाटील यांचे बंधू मकरंद हे वाईतून पुन्हा रिंगणात आहेत. ही यादी लांबलचक आहे. त्यातील काही जण उत्तम कार्यकर्ते आहेत. मात्र घराणेशाहीचा लाभ त्यांना मिळाला हे नाकारता येत नाही.

हेही वाचा >>>डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर आंध्र प्रदेशमधील या गावाला विकासाची अपेक्षा, गावात ट्रम्प यांच्या विजयाचा जल्लोष; कारण काय?

जिंकण्याची क्षमता हे कारण?

निवडणूक अतिखर्चीक झाली आहे. त्यात राजकीय पक्ष जिंकण्याच्या क्षमतेवर उमेदवारी देतात. अशा वेळी सामान्य कार्यकर्ते दुर्लक्षित राहतात. त्यातच विचारांपेक्षा व्यक्तिकेंद्री राजकारणामुळे मग जिल्ह्यातील मोठी घराणी, सहकार क्षेत्रात मोठ्या संस्था पाठीशी असल्याने अशा व्यक्तींचे फावते. कारण मागे कार्यकर्ते असल्याने निवडून येण्याची खात्री असते. मग पक्षाने डावलले तरी रातोरात पक्षनिष्ठा गुंडाळून बंड केले जाते. यातून घराणेशाहीला बळ मिळते. एखाद्या राजकीय कुटुंबातील कार्यकर्ता स्थानिक स्वराज्य संस्थांपासून जर एकेक पायरी चढत विधानसभेच्या उमेदवारीपर्यंत गेला तर ती बाब अलाहिदा, मात्र  घराण्याचा वलयाचा लाभ मिळून उमेदवारी मिळणे म्हणजे प्रामाणिक कार्यकर्त्यावर अन्याय आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

hrishikesh.deshpande@expressindia.com