गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असताना मुंबईतून कोकणात जाणाऱ्यांसाठी वाहतुकीचा एक अतिजलद पर्याय लवकरच उपलब्ध होणार आहे. हा पर्याय आहे जलवाहतुकीतील रो रो सेवेचा. महाराष्ट्र सागरी मंडळाने मुंबई ते कोकण प्रवास केवळ सहा तासांत करता यावा यासाठी मुंबई ते विजयदुर्ग, मालवण जलमार्गावर रो रो सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या दृष्टीने कामे सुरू असून गणेशोत्सवाच्या दोन ते तीन दिवस आधी ही सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. ही सेवा नेमकी काय आहे याचा हा आढावा…
गणेशोत्सवात इतर पर्याय कसरतीचे

गणेशोत्सवासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने मुंबईतील मूळ कोकणी माणूस कोकणात जातो. गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात जाणाऱ्यांची संख्या इतकी मोठी असते की, रस्ते वा रेल्वे मार्गे जाणाऱ्या सर्वांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. या काळात कोकण रेल्वेकडून अतिरिक्त रेल्वे गाड्या सोडल्या जातात, फेऱ्या वाढवल्या जातात. तर एसटी गाड्यांची संख्या व फेऱ्या वाढवल्या जातात. मात्र तरीही ही व्यवस्था कमी पडते, प्रवाशांना कसरत करत कोकण गाठावे लागते. त्यात मुंबई-गोवा महामार्गाचे काम १८ वर्षांपासून रखडल्याने, आहे त्या रस्त्यांवर पावसात खड्डे पडत असल्याने ८ ते १० तासांच्या रस्ते प्रवासासाठी प्रवाशांना १४ तास वा त्यापेक्षाही अधिक वेळ वाया घालवावा लागतो. मुंबई-गोवा महामार्गाबरोबरच कोल्हापूर-गगनबावडा महामार्गावरही या काळात वाहनांची मोठी गर्दी असते. तेव्हा मुंबई ते कोकण असा कसरतीचा प्रवास सुकर करण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने आता अतिजलद प्रवासाचा एक पर्याय मुंबईकरांसाठी-कोकण वासीयांसाठी आणला आहे. हा आहे रो रो सेवेचा पर्याय.

रो रो सेवा म्हणजे काय?

रो रो म्हणजे रोल ऑन-रोल ऑफ सेवा. हा जलवाहतुकीचा एक प्रकार आहे असून अतिजलद प्रवासाचाही एक चांगला पर्याय आहे. रो रो सेवेअंर्गत मोठ्या जहाजांवर चारचाकी वाहनांना चढवता आणि उतरवता येते. यासाठी जहाजावर रॅम्पची सोय केलेली असते. या जलवाहतुकीमुळे रस्ते वाहतुकीवरील ताण कमी होतो, इंधन आणि वेळेची बचत होत. तर प्रवासही आरामदायी होतो. सध्या मुंबईतील भाऊचा धक्का ते मांडवा रो रो सेवेला उत्तम प्रतिसाद मिळतो. मुंबई ते गोवा अशीही रो रो सेवा चालते. तेव्हा मुंबई ते विजयदुर्ग, मालवण अशी रो रो सेवा सुरू करण्याचा विचार महाराष्ट्र सागरी मंडळाने पुढे आणला आणि आता ही सेवा सुरू करण्यासाठीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

मुंबई ते विजयदुर्ग रो रो सेवा नेमकी कशी?

महाराष्ट्र सागरी मंडळाने मुंबई ते विजयदुर्ग, मालवण अशी रो रो सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मुंबईतील माझगाव ते विजयदुर्ग अशी ही रो रो सेवा असणार आहे. भाऊचा धक्का ते मांडवा रो रो सेवा मागील कित्येक वर्षांपासून ज्या एम टू एम कंपनीच्या माध्यमातून चालवली जात आहे, त्याच कंपनीकडून मुंबई ते विजयदुर्ग रो रो सेवा चालवली जाणार आहे. एम टू एमची एक बोट मुंबई ते विजयदुर्ग अशी चालेल. दोन मजली या बोटीची क्षमता ४०० ते ५०० प्रवासी तर ५० ते ६० वाहने अशी असणार आहे. ही सेवा सुरू करण्यासाठी माझगाव येथे आवश्यक ती कामे सुरू आहेत. विजयदुर्ग येथे एक प्रवासी जेट्टी आहे. तर आता रो रो सेवेसाठी या प्रवासी जेट्टीचे अत्याधुनिक रो रो सेवा जेट्टीत रूपांतर करण्यात येणार आहे. तरंगते तराफे लावण्यात येत आहे. ही कामे येत्या पाच-सहा दिवसांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. ही सेवा सुरू झाल्यास मुंबई ते मालवण, मुंबई ते रत्नागिरी प्रवास अतिजलद होणार आहे.

मुंबई ते मालवण प्रवास सहा तास केव्हापासून?

मुंबई ते विजयदुर्ग रो रो सेवेद्वारे मुंबई ते रत्नागिरी अंतर तीन तासांत तर मुंबई ते मालवण अंतर केवळ सहा तासांत पार करता येणार आहे. रेल्वे वा रस्ते मार्गाने हे अंतर पार करण्यासाठी १० ते १२ तास लागतात. त्यातही गणेशोत्सवात मुंबई ते कोकण प्रवासासाठी १८ ते २४ तासही लागतात. रो रो सेवा गणेशोत्सवादरम्यान सुरू व्हावी यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाकडून युद्धपातळीवर काम सुरू आहे. दोन-तीन दिवस चाचणी घेत त्यानंतर गणेशोत्सवाच्या दोन ते तीन दिवस आधी मुंबई ते विजयदुर्ग रो रो सेवा सेवेत दाखल करण्याचेही सागरी मंडळाचे नियोजन आहे.

अतिजलद प्रवासासाठी किती तिकीट?

एम टू एम रो रो सेवेची मुंबई ते विजयदुर्ग आणि विजयदुर्ग ते मुंबई अशी दिवसाला एक-एक फेरी होणार आहे. तेव्हा विजयदुर्ग ते मुंबई आणि मुंबई ते विजयदुर्ग असा रो रो प्रवास करण्यासाठी प्रवाशांना किमान १००० रुपये आणि वाहनांना १००० ते २००० रुपये असे तिकीट दर असतील अशी चर्चा आहे. मात्र अद्याप या सेवेचे दर निश्चित करण्यात आले नसल्याचे सागरी मंडळाने स्पष्ट केले आहे. ही सेवा सुरू होण्याच्या दोन दिवस आधी दर जाहीर करत त्यानंतर तात्काळ आरक्षणास सुरुवात करण्यात येणार आहे.