गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेले अयोध्येतील राम मंदिर अखेरीस पूर्णत्वास येत आहे. मंदिराच्या तळमजल्याचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले असून या वर्षी ऑक्टोबर महिन्यात तळमजल्याचे काम पूर्ण होऊ शकते, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मंदिर प्राधिकरणाने सोमवारी (दि. १२ जून) दिलेल्या प्रतिक्रियेनुसार मंदिराचे पूरक बांधकामदेखील वेगाने पूर्ण होत आहे. ट्रस्टच्या वरिष्ठांनी राम मंदिराच्या तळमजल्यावरील कामाची पाहणी केली आहे. या वेळी मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्राही उपस्थित होते, अशी माहिती मंदिर प्राधिकरणाने पीटीआयशी बोलताना दिली. मंदिरांचे बांधकाम करण्याचे काम कुणाला देण्यात आले आहे आणि आता मंदिर कसे दिसते याबाबत घेतलेला हा आढावा.

राम मंदिराचे बांधकाम कोण करीत आहे?

बांधकाम कंपनी लार्सन आणि टुब्रो (Larsen & Toubro) कंपनीकडे राम मंदिराच्या निर्माणाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. ज्यासाठी १८०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. मिंट वेबसाइटने दिलेल्या बातमीनुसार टाटा कन्सल्टिंग इंजिनीअर्स यांचीही व्यवस्थापक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. ऑगस्ट २०२० मध्ये उत्तर प्रदेशच्या अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन झाल्यानंतर बांधकाम करण्यास सुरुवात झाली. हिंदुस्तान टाइम्सने ऑक्टोबर २०२२ मध्ये दिलेल्या बातमीनुसार, त्या वेळी मंदिराचे ५० टक्के काम पूर्ण झाले होते. श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्राचे सरचिटणीस चंपत राय यांनी त्या वेळी सांगितले होते की, ट्रस्टकडून मंदिर निर्माणाच्या कामावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

हे वाचा >> अयोध्येतील नव्या राममूर्तीच्या अभिषेकासाठी मोदींना निमंत्रण

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काही दिवसांपूर्वी त्रिपुरामधील जाहीर सभेत सांगितले की, राम मंदिराचे बांधकाम प्रगतिपथावर असून १ जानेवारी २०२४ रोजी मंदिर खुले केले जाईल.

सोने-चांदी वापरून तीन मजली मंदिराचे निर्माण

तीन मजली राम मंदिराची लांबी ३८० फूट, रुंदी २५० फूट आणि उंची १६१ फूट एवढी आहे, अशी माहिती प्राधिकरणाने दिली. गर्भगृहाव्यतिरिक्त मंदिर परिसरात पाच मंडप असणार आहेत. गूढ मंडप, रंग मंडप, नृत्य मंडप, प्रार्थना मंडप आणि कीर्तन मंडप अशी इतर पाच दालने असल्याची माहिती पीटीआयने दिली आहे. पाचही मंडपांच्या घुमटाची रुंदी ३४ फूट आणि लांबी ३२ फूट आहे. तसेच जमिनीपासूनची उंची ६९ फूट ते १११ फूट एवढी आहे. राजस्थानमधील बन्सी पहाडपूर येथील शिला वापरून मंदिराचे बांधकाम करण्यात येत आहे.

एनडीटीव्हीने दिलेल्या माहितीनुसार मंदिराच्या तळमजल्यावर एकूण १६० स्तंभ आहेत. पहिल्या मजल्यावर १३२ आणि दुसऱ्या मजल्यावर ७४ स्तंभ असणार आहेत. राजस्थानमधून आणलेल्या चार लाख विटा आणि मार्बलपासून मंदिराचे बांधकाम होत आहे.

हे वाचा >> Ram Temple in Ayodhya: …आता तयारी प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची; दोन मोठ्या शाळीग्राम शिळा अयोध्येत पोहोचल्या!

गाभाऱ्यातील दरवाजांना सोने-चांदीचे नक्षीकाम

गाभाऱ्यातील दरवाजा आणि खिडक्यांवर सोन्या-चांदींचे नक्षीकाम करण्यात येणार आहे. बालरूपातील रामाची मूर्ती असणार आहे. गाभाऱ्यातील मकरांना संगमरवरचा वापर खांब, भिंती आणि छतासाठी करण्यात आलेला आहे. गाभाऱ्यात एकूण जागा ४०३.३४ स्क्वेअर फूट एवढी असणार आहे, अशी माहिती ‘न्यूज १८’ ने दिली आहे. प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, मंदिरात एकूण ३९२ खांब आहेत. मंदिराची सुरक्षितता आणि हवामान बदलाचे आव्हान लक्षात घेऊन एवढे खांब उभारण्यात आलेले आहेत. मंदिराचा एकूण परिसर ८.६४ एकर आहे.

सागवानी लाकडाचा वापर करून ४६ दरवाजे तयार करण्यात आलेले आहेत. तसेच मंदिरात श्री रामाच्या दोन मूर्त्या आहेत. एक मूर्ती बालस्वरूपातील असेल. तर दुसरी मूर्ती श्रीरामाच्या भव्य स्वरूपाचे दर्शन देणारी असेल, अशी माहिती ‘टाइम्स नाऊ’ वृत्तवाहिनीने दिली. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने एप्रिलमध्ये दिलेल्या बातमीनुसार कर्नाटकातून आणलेल्या क्रिष्णा शिलेपासून (काळा दगड) पाच फूट उंच बालवयातील रामाची मूर्ती तयार केली जाणार आहे.

आणखी वाचा >> अयोध्या राम मंदिरासाठी चंद्रपुरातील १८०० क्यूबिक मीटर सागवान लाकूड पाठवणार

विश्व हिंदू परिषदेचे नेते राय यांनी ऑक्टोबर २०२२ मध्ये माहिती दिली की, २०२४ च्या मकरसंक्रातीला श्री रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाऊ शकते. ‘न्यूज १८’ च्या माहितीनुसार मंदिराला आतून आणि बाहेरून आधुनिक विद्युत रोषणाई केली जाणार आहे. ‘टाइम्स नाऊ’ने दिलेल्या बातमीनुसार सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांच्याही मोठ्या मूर्त्या मंदिर परिसरात स्थापित करण्यात येणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच मंदिर परिसरात भाविकांसाठी सुविधा केंद्र, संग्रहालय, संशोधन केंद्र आणि सभागृहाची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच पुजाऱ्यांसाठी निवासस्थान, प्रशासकीय इमारत आणि गुरांचा गोठाही मंदिर परिसरात उभारण्यात येणार आहे.