– मंगल हनवते 

मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने ८ जून २०१४ हा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरला. ‘लोकल’ ही मुंबईची पहिली तर ‘बेस्ट’ ही दुसरी जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते. पण या दिवशी तिसरी जीवनवाहिनी म्हणून ‘मेट्रो१’ची (वर्सोवा…अंधेरी… घाटकोपर) भर पडली. लोकलची गर्दी नाही, धक्काबुक्की नाही. सुकर प्रवासाची सुविधा मुंबईकरांसाठी उपलब्ध झाली. मेट्रो १ ला मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र सध्या मुंबईत मेट्रो १ ही एकच मार्गिका कार्यरत आहे. आता तब्बल आठ वर्षांनंतर मुंबईतील वाहतूक सेवेत दोन नव्या मेट्रो मार्गिका दाखल होणार आहेत. मेट्रो २ अ (दहिसर ते डी एन नगर) आणि मेट्रो ७ (दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व) मेट्रो मार्गिकेतील पहिला टप्पा येत्या महिन्याभरात वाहतूक सेवेत दाखल होणार आहे. पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होणार असून प्रवास वेगवान होणार आहे.

Konkan Railway, fine,
कोकण रेल्वेत दर दिवशी विनातिकीट प्रवाशांकडून नऊ लाख रुपये दंड वसूल
railway pravasi sanghatana expressed anger for running ghatkopar cstm local without home platform
‘होम प्लॅटफॉर्म’ नसताना घाटकोपर-सीएसएमटी लोकल चालवणे गंभीर, लोकलचा विस्तार करण्याचे प्रवासी संघटनेचे मत
coastal road, mumbai, girder,
मुंबई : वादळी वाऱ्यामुळे सागरी किनारा मार्गाचा दुसरा गर्डर बसवण्याचे काम लांबणीवर
nagpur chinchbhavan railway flyover marathi news
नागपूरचा चिंचभवन रेल्वे उड्डाणपूल ठरतोय अपघातप्रवण स्थळ, सुसाट वाहनांमुळे धोका वाढला; क्रॉसिंगमुळे…
railway collected rs 542685 from ticketless passengers at nagpur station
फुकट्या प्रवाशांना मोठा दणका…..रेल्वेच्या व्युहरचनेमुळे……
uran height barrier marathi news, uran panvel st bus marathi news
उरण: अखेर उंचीरोधक हटविल्याने चार गावांतील नागरिकांना दिलासा, वाहतूक विभागाच्या अधिसूचनेनंतर उंचीरोधक हटविण्याची कार्यवाही
Unauthorized sale of food,
महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये अनाधिकृतपणे खाद्यपदार्थ विक्री, सहा विक्रेत्यांना अटक
461 crore property Tax arrears to Metro One
मुंबई : ‘मेट्रो वन’कडे ४६१ कोटींचा थकीत मालमत्ता कर

मेट्रो प्रकल्प कसा आहे?

मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात आंतरराष्ट्रीय दर्जाची तसेच वेगवान वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मेट्रो प्रकल्प आणला. तब्बल ३३७ किमीचे मेट्रोचे जाळे विणण्याचा निर्णय घेऊन १४ मेट्रो मार्गिकांची आखणी केली. मुंबईच्या टोकापासून ते ठाणे, नवी मुंबईच्या टोकाला मेट्रोने जोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार मेट्रो १ (वर्सोवा…अंधेरी… घाटकोपर) मेट्रो मार्गिका सर्वप्रथम पूर्ण करून ८ जून २०१४ ला ही मार्गिका सेवेत दाखल करण्यात आली. त्यानंतर मेट्रो ३ (कुलाबा…वांद्रे…सीप्झ), मेट्रो २अ, ७ मार्गिका हाती घेण्यात आल्या. कारशेड आणि इतर कारणामुळे मेट्रो ३ रखडली आहे. पण मेट्रो २ अ आणि ७ चा पहिला टप्पा मात्र आता महिन्याभरात वाहतूक सेवेत दाखल होणार आहे. संपूर्ण मार्गिका येत्या काही महिन्यात पूर्ण होईल. त्याच वेळी २ ब, ४,५,६,९ मार्गिकेची कामे सुरू असून लवकरच मेट्रो १०,११ आणि १२ च्या कामालाही सुरूवात होणार आहे. उर्वरित मेट्रो मार्गिकेच्या कामाला सुरुवात करण्याच्या दृष्टीनेही एमएमआरडीएकडून नियोजन सुरू आहे.

मेट्रो २ अ आणि ७ मार्गिकेची वैशिष्ट्ये काय?

मेट्रो २ अ मार्गिका दहिसर ते डी एन नगर अशी असून तिची लांबी १८.५८९ किमी अशी आहे. यात १७ मेट्रो स्थानकांचा समावेश आहे. मेट्रो १ सह मेट्रो ७ मार्गिकेशी ही मार्गिका जोडण्यात आलेली आहे. या मार्गिकेसाठी ६४१० कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे. मेट्रो ७ मार्गिका दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व अशी असून तिची लांबी १६.४७५ किमी आहे. यात १३ मेट्रो स्थानकांचा समावेश असून मेट्रो १, २ अ आणि ६ मार्गिकांशी ही मार्गिका जोडलेली आहे. या मार्गिकेसाठी ६२०८ कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे. मुंबई मेट्रो प्रकल्पासाठी बंगळुरू येथील एका कंपनीकडून ८४ गाड्यांची अर्थात ५७६ डब्यांंची  बांधणी केली जात आहे. यातील ११ गाड्या मेट्रो २ अ आणि ७ मार्गिकेतील पहिल्या टप्प्यासाठी वापरण्यात येणार आहेत. त्यानुसार आतापर्यंत काही गाड्या दाखल झाल्या असून त्यांची चाचणीही पूर्ण झाली आहे. देशी बनावटीच्या या गाड्यांचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या गाड्या स्वयंचलित आहेत. चालकाची गरज या गाडीसाठी लागणार नाही. पण मुंबईत पहिल्यांदाच अशा गाड्या धावणार असल्याने सुरुवातीला काही महिने मेट्रो चालक (मेट्रो ट्रेन पायलट) गाड्या चालविणार आहे. पुढे स्वयंचलित पद्धतीने गाडी चालविली जाणार असली तरीही गाडी मेट्रो चालकाच्या देखरेखीखालीच चालणार आहे. त्यामुळेच या पहिल्या टप्प्यासाठी तब्बल ९७ मेट्रो चालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात २१ महिला मेट्रो चालकांचा समावेश आहे. ताशी ८० किमी वेगाने धावणाऱ्या या गाड्यामध्ये प्रवाशांसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा असणार आहेत.

पहिला टप्पा कधी सुरू होणार?

मेट्रो २ अ चा डहाणूकरवाडी ते आरे आणि मेट्रो ७ चा दहिसर ते आरे असा पहिला टप्पा येत्या काही दिवसांत कार्यरत होणार आहे. या टप्प्याचे संपूर्ण काम पूर्ण झाले असून आता आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस) यांच्या पथकाकडून सुरक्षा चाचणी सुरू आहे. ही चाचणी पूर्ण होऊन सुरक्षा प्रमाणपत्र मिळाले की तात्काळ पहिला टप्पा मुंबईकरांसाठी खुला होणार आहे. यादृष्टीने एमएमआरडीएने सर्व तयारी पूर्ण केली आहे. प्रशिक्षित कर्मचारीवृंद सज्ज झाला असून वेळापत्रक आणि तिकीट दरही निश्चित करण्यात आले आहेत. १० ते ४० रुपये असे तिकीट दर या मार्गिकेसाठी असतील. पहाटे पाच ते रात्री साडेअकरा या वेळेत पहिल्या टप्प्यातील मेट्रो सेवा सुरू असेल. डहाणूकरवाडी स्थानकातून ५ वाजून ७ मिनिटांनी तर आरे मेट्रो स्थानकातून ५ वाजून ३० मिनिटांनी पहिली गाडी सुटणार आहे. शेवटची गाडी डहाणूकरवाडी येथून रात्री १० वाजून ३९ मिनिटांनी तर आरेतून रात्री ११ वाजून २२ मिनीटांनी सुटेल.

दहिसर ते आरे प्रवास सुकर आणि वेगवान?

दहिसर ते आरे (पश्चिम द्रुतगती मार्ग) हे अंतर रस्ते मार्गे पार करण्यासाठी दीड तास, गर्दीच्या वेळेस त्यापेक्षा अधिक काळ लागतो. वाहतूक कोंडीचा सामना करून हा प्रवास करावा लागतो. दहिसर ते अंधेरी रेल्वेने २८ मिनिटे लागतात. लोकलच्या गर्दीतून, धक्काबुक्की सहन करत, घामाघुम होत हा प्रवास करावा लागतो. पण आता वातानुकूलित गाडीचा हा प्रवास काही मिनिटात, सुकरपणे पार करता येणार आहे. मेट्रो २ अ आणि ७ मार्गिकेतील पहिल्या टप्प्यातील सेवेमुळे हे शक्य होणार आहे. मेट्रो प्रवास सुकर होणार आहेच, पण मेट्रो स्थानकापर्यंत येण्या-जाण्याचा प्रवासही सुकर कसा होईल यासाठीचाही विचार एमएमआरडीएने केला आहे. यासाठी ‘मल्टि मोडल इंटिग्रेशन’ योजना हाती घेण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पादचारी पूल, बेस्ट बस सुविधा, सायकल सुविधा, युलू बाईक अशा सुविधा पुरविण्यात येणार आहेत. एकूणच मेट्रो गाडी, मेट्रो स्थानक आणि मेट्रो स्थानकाबाहेरही अत्याधुनिक सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. त्यामुळे या नव्या मेट्रो मार्गिकेमुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. तर २०२६ पर्यंत आणखी चार, पाच मार्गिका सेवेत दाखल होणार असून त्यावेळी मेट्रो मुंबईची तिसरी जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाईल.