अहमदाबाद विमान अपघाताने संपूर्ण देशाला हादरवले. या विमानातून एकूण २४२ प्रवासी प्रवास करत होते, मात्र अपघातात २४१ जणांचा मृत्यू झाला आणि केवळ एका प्रवाश्याचा जीव वाचला. विश्वास कुमार रमेश असे या एकमेव जीवित व्यक्तीचे नाव आहे. इतक्या मोठ्या अपघातातून एकमात्र व्यक्तीचा जीव वाचल्याने सर्वांना आश्चर्य वाटत आहे. मुख्य म्हणजे रमेश विश्वकुमार हे 11 A या सीटवर बसले होते, त्यामुळे अनेक जण या सीटला ‘चमत्कारिक सीट’ असेही नाव देत आहेत. परंतु, या सीटला चमत्कारिक म्हणणंही अतिशयोक्ती ठरणार नाही. १९९८ मध्येदेखील याच सीट क्रमांकावरील प्रवासी विमान अपघातातून वाचला होता. थाई गायक रुआंगसाक जेम्स लॉयचुसाक असे या व्यक्तीचे नाव आहे.

जवळजवळ २७ वर्षांनंतर, रुआंगसाक जेम्स लॉयचुसाक याने अहमदाबाद विमान अपघाताचे वृत्त पाहिले, तेव्हा त्याच्या लक्षात आले की, या अपघातातून एक व्यक्ती बचवली आणि ती व्यक्ती 11 A या सीट नंबरवर बसली होती, तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्का बसला. “भारतात विमान अपघातातून वाचलेली एकमेव व्यक्ती माझ्यासारख्याच सीट क्रमांक 11 A वर बसली होती, याने मी गोंधळात पडलो आहे”, असे लॉयचुसाक याने फेसबुकवर लिहिले. तो आता ४७ वर्षांचा आहे. काही दिवसांपूर्वी अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान उड्डाणानंतर कोसळले आणि त्यात केवळ एक व्यक्ती बचावला, त्यामुळे आता १९९८ मधील लॉयचुसाकच्या जिवंत वाचण्याची कहाणी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. २७ वर्षांपूर्वी नक्की काय घडले होते? खरंच 11 A सुरक्षित सीट नंबर आहे का? त्याविषयी जाणून घ्या.

सीट 11 A मुळे मिळाले दुसरे आयुष्य

  • डिसेंबर १९९८ मध्ये थाई गायक रुआंगसाक लॉयचुसाक थाई एअरवेजच्या फ्लाईट TG261 मध्ये बँकॉकहून सुरत थानीला जात होता.
  • त्यावेळी विमानाचे इंजिन बंद पडले आणि विमान दलदलीत कोसळले.
  • विमानातील १४६ जणांपैकी फक्त ४५ जण या अपघातातून बचावले.
  • त्यात 11 A या सीट क्रमांकावर बसलेला लॉयचुसाक याचादेखील समावेश होता.
  • तो कसा बसा ढिगाऱ्यातून बाहेर पडण्यात यशस्वी झाला.
  • त्याला जखमी अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले.
  • त्या दिवसाचा बोर्डिंग पास त्याच्याकडे नाही. मात्र, त्यावेळच्या वर्तमानपत्रातील बातम्यांमध्ये त्याचा सीट क्रमांक : 11 A नोंदवण्यात आला होता.
  • लॉयचुसाक याने या चमत्काराला दुसरे आयुष्य म्हटले आहे.
१९९८ मध्येदेखील याच सीट क्रमांकावरील प्रवासी विमान अपघातातून वाचला होता. (छायाचित्र-इनस्टाग्राम/इंडियन एक्सप्रेस)

त्याने ‘द डेली मेल’ला सांगितले, “अपघातानंतर तब्बल १० वर्षे मला उड्डाण करणे अवघड गेले. हवेचा प्रवाह सामान्य असला तरी मला श्वास घेण्यास त्रास होत असे. मी प्रत्येकाशी बोलणे टाळायचो आणि नेहमी खिडकीबाहेर पाहायचो. जर मला बाहेर काळे ढग किंवा वादळ दिसले तर मला भीती वाटायची आणि मी नरकात असल्याचा भास व्हायचा. त्या भयावह आठवणी मी कधी विसरू शकत नाही, असेही तो म्हणाले. तो पुढे म्हणाला, “ज्या दलदलीत विमान कोसळले होते त्यातील आवाज, वास आणि पाण्याची चव मला अजूनही आठवते.” त्याने सांगितले, जेव्हा त्याला जून २०२५ मध्ये एअर इंडियाच्या अपघातात वाचलेला एकमेव व्यक्ती 11 A वर बसला होता, अशी माहिती मिळाली तेव्हा त्याला थंडी वाजू लागली.

विश्वास कुमार रमेशसाठी 11 A सीट कशी ठरली संकटमोचक

अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या अपघातात ४० वर्षीय विश्वास कुमार रमेश हे एकमेव बचावलेले व्यक्ती आहेत. तेदेखील 11 A या सीटवरच बसले होते. रुग्णालयाच्या बेडवरून बोलताना रमेश यांनी त्या क्षणाची आठवण केली आणि ते कसे बचावले याविषयी सांगितले. त्यांनी डीडी न्यूजला सांगितले, “मला माहीत नाही की मी कसा बचावलो. काही काळासाठी मला वाटले की मीही मरणार आहे. पण, जेव्हा मी माझे डोळे उघडले तेव्हा मी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मला दिसले की गेट तुटलेले आहे आणि त्यातून निघण्यासाठी एक लहान जागा आहे. मी त्यातून बाहेर पडलो.

बोईंग ७८७-८ ड्रीमलाइनरच्या सीटिंग लेआउटचे विश्लेषण करणाऱ्या एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, रमेशची सीट 11 A ही इकॉनॉमी सेक्शनच्या समोर, बिझनेस क्लासच्या अगदी मागे आणि डाव्या बाजूच्या आपत्कालीन एक्झिटजवळ होती. ही जागाच रमेश यांचा जीव वाचवण्यासाठी महत्त्वाची ठरली. इमारतीच्या खालच्या मजल्यावर विमान कोसळले. विमानाच्या पुढील भागाला आग लागली असताना, त्याच्या फ्यूजलेजचा काही भाग तुलनेने शाबूत राहिला. त्या छोट्याश्या वेळेत विश्वकुमार यांना वाचण्याची संधी मिळाली असावी. अपघातस्थळाजवळ घेतलेल्या फुटेजमध्ये रमेश जखमी आणि लंगडत चालत असल्याचे दिसून येते. रमेश भारतात लहानाचा मोठा झाला असून नंतर ब्रिटनला गेला. तो त्यांचा भाऊ अजयबरोबर प्रवास करत होता, मात्र दुर्दैवाने या अपघातातून तो वाचू शकला नाही.

सर्वांना नको असलेली 11 A सीट कशी ठरली संकटमोचक?

वारंवार प्रवास करणाऱ्यांमध्ये बहुतांश जण 11 A सीट बुक करणे टाळतात. अमेरिकन एअरलाइन्सच्या फ्लाइट अटेंडंटनी एकदा ‘द सन’ला सांगितले होते की, 11 A आणि 11 AF ही सर्वात जास्त तक्रार येणाऱ्या सीटपैकी एक आहेत. 11 A आणि 11 AF या सीट केबिनच्या मध्यभागी असतात, त्यामुळे प्रवाशांना अनेकदा उतरण्यासाठी जास्त वेळ वाट पहावी लागते. परंतु, प्रवाशांसाठी सर्वात निराशाजनक बाब म्हणजे काही बोईंग ७३७ सह अनेक विमानांमध्ये, 11 A सीटजवळ खिडकीच नसते. अंतर्गत वायरिंग, एअर डक्ट किंवा विमानाच्या डिझाइनमुळे या सीटजवळ खिडकी नसते. 9 A ते 12 A सीटच्याबाबतीतही हेच घडते. विमान वाहतूक तज्ज्ञांनी म्हटले आहे की, 11 A ही सर्व विमानांमध्ये आपत्कालीन एक्झिटच्या शेजारी असलेली सीट असू शकत नाही. “प्रत्येक अपघात वेगळा असतो आणि सीटच्या स्थानावर आधारित जगण्याची शक्यता सांगणे पूर्णपणे अशक्य आहे,” असे रॉयटर्सच्या एका वृत्तात अमेरिकेतील कंपनी चेफ्लाइट सेफ्टी फाउंडेशनचे संचालक मिशेल फॉक्स यांनी सांगितले.

विश्वास कुमार रमेश याने स्वतः सांगितले की, विमान ज्या इमारतीत कोसळले त्या इमारतीमुळे विरुद्ध बाजूचा बाहेर पडण्याचा मार्ग पूर्णपणे बंद झाला होता. आपत्कालीन दरवाजाजवळील त्याच्या सीटमुळे त्याला बाहेर पडण्यासाठी वेळ मिळाला. “या विशिष्ट परिस्थितीत, प्रवासी आपत्कालीन दरवाजाच्या बाजूला बसलेला असल्याने, त्या दिवशी ही जागा सर्वात सुरक्षित होती,” असे सिडनीमधील एव्हलॉ एव्हिएशन कन्सल्टिंगचे अध्यक्ष रॉन बार्श म्हणाले. पुढे ते म्हणाले, “परंतु, नेहमीच 11 A सीट सुरक्षित असते असे म्हटले जाऊ शकत नाही. मॉडेल आणि कॅरियरनुसार एअरलाइनचे आतील भाग बदलतात आणि त्यामुळेच सर्वात सुरक्षित जागा सांगणे अशक्य होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘रॉयटर्स’ने आपल्या वृत्तात पॉप्युलर मेकॅनिक्सच्या २००७ च्या अभ्यासाची माहिती दिली आहे. त्यात असे आढळून आले की, मागच्या बाजूला बसलेले प्रवासी वाचण्याची शक्यता सांख्यिकीयदृष्ट्या जास्त होती. आपत्कालीन दरवाज्याजवळ बसणेदेखील नेहमीच सुरक्षित नसते. काही अपघातानंतर हे दरवाजे जाम होऊ शकतात. काही आपघतातच यातून बाहेर पडण्याची संधी मिळू शकते आणि विश्वकुमार व् रुआंगसाक जेम्स लॉयचुसाकला हीच संधी मिळाली.