Dopamine Detox रिल्स आणि मोबाईलपासून दूर राहिलं की खरंच मेंदू रीसेट होतो का? अगदी सहज म्हणून रिल्स पाहायला घेतल्या आणि तास- दीड तास कसा गेला कळलंच नाही… असं अनेकांचं अनेकदा होतं. नेमकी हीच समस्या सध्या जगभरात सर्वत्र वाढते आहे. रिल्स पाहाताना मिळणाऱ्या आनंदामुळे मेंदूतील डोपामिन स्रवू लागतं. आणि आणखी आनंद मिळवण्यासाठी म्हणून आपण एकावर एक रिल्स पाहात राहातो. यामुळे होतं काय की, आपल्या मेंदूला सतत डोपामिन स्रवत राहण्याची सवय लागते. पूर्वीसारखा साध्या गोष्टींमधून आनंद मिळेनासा होतो… सततच्या आनंदासाठी मन मोबाईलच्या दिशेने धाव घेतं आणि हातही मोबाईलच्याच दिशेने जातात. नेमकी हीच अडचण सध्या वाढते आहे आणि त्यावर जगाने शोधलेलं उत्तर म्हणजे डोपामिन डिटॉक्स! पण खरंच हा यावरचा उपाय आहे का, विज्ञान काय सांगतं?
…यासाठी मेंदू नाही!
डोपामिन डिटॉक्स सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला ट्रेण्ड आहे. खरं तर सध्याच्या मोबाईल आणि रिल्सच्या जमान्यात सतत स्रवणारे डोपामिन आणि त्यामुळे मेंदूला मिळणारी अतिउत्तेजना कमी करण्याची गरज आहे. कारण अनंत काळ स्क्रोलिंग करत राहावं आणि डोपामिनही स्रवत राहावं, यासाठी मेंदूची निर्मिती झालेली नाही.
…आणि रिल्स पाहायला आपसूक सुरुवात होते!
क्लिक, स्क्रोल आणि नोटिफिकेशन्सची आताशा आपल्या मेंदूला खूप सवय झाली आहे. ही सवय तेवढ्यापुरतीच मर्यादित नाही तर या रिल्सच्या माध्यमातून मिळणारा तत्काळ आनंद आता हवाहवासा वाटू लागला आहे. त्यामुळे वेळ वाया जातो, हे ठावूक असूनही आपण सतत रिल्स पाहात राहातो. त्यामुळे आपण काहीच न करता रिकामटेकडे बसलोय, असं हल्ली होतच नाही. वेळ मिळाला की, नजर आणि बोटं दोन्ही मोबाईलच्याच दिशेने जातात आणि आपण रिल्स पाहायला सुरुवात करतो.
‘डोपामिन डिटॉक्स’चा ट्रेण्ड असे सांगतो की, काही दिवस डिजिटल आपण मोबाईलपासून दूर राहिलो तर डोपामिन ही मेंदूची ‘रिवॉर्ड सिस्टीम’ ही रीसेट होऊ शकते. पण खरंच असं होतं का?
डोपामिन म्हणजे नेमकं काय?
डोपामिन हे मेंदूतील न्यूरोट्रान्समीटर आहे. म्हणजे असे एक रासायनिक जे आपल्याला नव्या गोष्टी शिकण्याची प्रेरणा, आणि आनंदाची अनुभूती देते. आपल्याला जे आवडतं ते आपण करतो. तर आवडणं किंवा आनंद देणं आणि त्या माध्यमातून माणसाला सवयी लागणं यामध्ये या डोपामिनची भूमिका महत्त्वाची असते. एखादं काम सुरू करण्याआधीची असलेली उर्मी, आवडणारी गोष्ट खाल्ल्यानंतरच मिळणारं समाधान किंवा मोबाईल उचलताना मनात असलेली उत्सुकता हे सारं यातूनच घडत असतं.

आनंद आणि समाधानाच्या इच्छेनेही ते कार्यरत होतं!
पण डोपामिन हे काही फक्त ‘आनंदाचं हॉर्मोन’ नाही, तर ते मार्गदर्शकही असतं. एखाद्यासाठी नेमकं काय महत्त्वाचं आहे किंवा काय साध्य करायचं आहे याचा निर्णय घेण्यामध्येही डोपामिनची भूमिका महत्त्वाची असते. सर्वसाधारणपणे व्यायामानंतर डोपामिन स्रवू लागते आणि मग ती ऊर्जा- ऊर्मी दिवसभर राहाते म्हणून सकाळीच व्यायाम करावा, असे सांगितले जाते. पण अलीकडच्या संशोधनात असे लक्षात आले आहे की, तुम्ही एखादी गोष्ट मिळवण्याची अपेक्षा करता किंवा इच्छा मनात धरता तेव्हाही ते सक्रिय असतं. म्हणजेच आनंद मिळाल्यावरच नव्हे, तर आनंदाची किंवा समाधानाची इच्छा असतानाही ते कार्यरत असतं.
डोपामिन डिटॉक्स दिशाभूल करणारं!
म्हणूनच संशोधकांना असं वाटतं की, डोपामिनच्या संदर्भात ‘डिटॉक्स’ हे प्रकरणचं दिशाभूल करणारं आहे. कारण एरवी अनेक गोष्टींचं विरेचन तुम्ही शरीरामधून करू शकता, त्यासाठी काही पेय घेतली जातात किंवा खास डाएटही सांभाळला जातो, त्या माध्यमातून विषारी द्रव्य शरीरातून काढून टाकली जातात. अशा प्रकारे विषारी द्रव्य शरीरातून काढून टाकणं, याला डिटॉक्स म्हणतात. त्याप्रमाणे डोपामिन काही शरीरातून काढून टाकता येत नाही. डोपामिन शरीरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करणे म्हणजे मानवी प्रेरणा, त्याला केंद्रस्थानी ठेवून केली जाणारी हालचाल आणि या साऱ्यामागचे कुतूहल हे सारंच स्तब्ध झाल्यासारखंच असेल, असं संशोधकांना वाटतं.
डोपामिन डिटॉक्स म्हणजे काय?
या ट्रेण्डनुसार काही तासांपासून ते काही दिवसांपर्यंत सोशल मीडिया, नेटफ्लिक्स, गेमिंग, साखर, फास्ट फूड यापासून दूर राहायचं. वाचन, लेखन, ध्यान किंवा केवळ रिकामटेकडं बसणं यालाच प्राधान्य द्यायचं. मोबाईल- रिल्सयामुळे मेंदूला मिळणाऱ्या सततच्या उत्तेजनेपासून दूर राहाणं.
समस्या मोबाईलच्या अतिवापरात!
संशोधकांना वाटतं की, सध्या मोबाईल आणि रिल्सच्या जगात प्रत्येक जणच सततच उत्तेजनाच्या लाटेवर आरुढ असतो. त्यामुळेच मेंदूला शांत वेळ दिला, तर तो विचलित झालेलं लक्ष पुन्हा केंद्रित करण्यास मेंदूला मदतच होईल. मुळात समस्या डोपामिनमध्ये नाही, तर मोबाईलच्या अतिवापरात आहे.
विज्ञान काय सांगतं?
मेंदूविकारतज्ज्ञ सांगतात की, डोपामिन डिटॉक्स ही जैविकदृष्ट्या चुकीची संकल्पना आहे. डोपामिन हे विषारी द्रव्य नाही त्यामुळेच त्याचं ‘डिटॉक्सिफिकेशन’ही शक्य नाही. बदलायला हवं ते मानवी वर्तन.
संशोधनातून दिसून आलं आहे की, सततचं गेमिंग किंवा स्क्रोलिंग कमी झालं की, आपोआपच मोबाईल सतत पाहण्याची इच्छाही कमी होते.
अतिउत्तेजनेमुळे आनंदाची पातळी वाढते. आणि पुन्हा आनंद मिळवण्यासाठी जास्त उत्तेजना लागते. थोडा काळ थांबलं की, हळूहळू उत्तजनेची पातळी खाली येते. आणि साध्या गोष्टींमधून पुन्हा एकदा आनंद आणि समाधान मिळू लागतं. पण हा बदल एका आठवड्यात होत नाही. तर हळूहळू होत जाणारा मात्र महत्त्वपूर्ण असा हा मानसिक बदल आहे.
काय कराल?
- तत्काळ आनंदाचा पाठलाग कमी करणं हाच खरा उपाय.
- स्क्रीनपासून थोडा ब्रेक घ्या
- काही वेळ शांत, ‘बोअर’ होणंही आयुष्यात महत्त्वाचं असतं.
- वेगवान उत्तेजना टाळा आणि वाचन, चालणं किंवा सर्जनशील (क्रिएटिव्ह) काम करा.
- मनाला हवा असलेला आनंद मोबाईलमधून मिळवणे टाळा.
- मनाचं निरीक्षण करा, त्यात हरवू नका
याची गरज का आहे?
आपण सतत रील्समध्ये, आणि ऑन-डिमांड मनोरंजनात अडकलेलो आहोत. या सततच्या ‘मायक्रो-रिवॉर्ड्स’मुळे (रिल्स वा गेमिंगमधून मिळणाऱ्या सततच्या छोट्या आनंदामुळे) मेंदूचं नैसर्गिक आनंदचक्र बिघडलंय, विस्कळीत झालंय. त्यामुळेच सततच्या मनोरंजनानंतरही अनेकांना बेचैनी, उदासी जाणवत राहाते.
सध्या डोपामिन डिटॉक्स लोकप्रिय ट्रेण्ड ठरण्यामागे सध्याच्या पिढीची बेचैनी हे महत्त्वाचे कारण आहे.
डिजिटल आवाज कमी केला किंवा आपण मोबाईलपासून दूर राहिलो तर मेंदू पुन्हा माणसाच्या अंतर्गत प्रेरणेवर अवलंबून राहायला शिकतो. बाह्य उत्तेजनेपेक्षा एखादं काम पूर्ण करणं, शिकणं, काही तरी चांगलं निर्माण करणं यातून माणसाला आनंद मिळू लागतो, हेच सर्वाधिक महत्त्वाचे आहे.
प्रत्यक्षात हे कसं करावं?
- हळुहळू सुरुवात करा
- सोशल मीडिया, गेमिंग, की गोड पदार्थ? सर्वात मोठा ट्रिगर काय आहे, ते ओळखायला शिका.
- पूर्ण बंदी नको पण वारंवारता टाळा
- मोबाईलत्याऐवजी सर्जनशील काम करा किंवा व्यायाम करा, शारीरिक कष्टाचे काम करा
- एक दिवसाचा ब्रेकही प्रभावी ठरू शकतो
- स्वतःच्या मनाचे निरीक्षण करा
- लक्षात ठेवा की, हा मेंदूविरुद्धचा लढा नाही, तर त्याला वेगळ्या दिशेकडे वळवणे आहे.
- खरं डिटॉक्स म्हणजे अतिउत्तेजनापासून सुटका
- साध्या क्षणांमध्ये आनंद शोधणं, प्रयत्नांतून समाधान मिळवणं आणि एकाग्रतेचा छान अनुभव घेणं, तेवढंच महत्त्वाचं आहे.
- एका वीकेण्डमध्ये आपण मेंदू रीसेट करू शकत नाही, पण सवयी हळूहळू नक्की बदलू शकतो.
- अतिआनंदाने सुन्न मन जागं करायचं आहे!
आनंद संपवायचा नाही, तर अतिआनंदाने सुन्न झालेलं मन पुन्हा जागं करायचं आहे, हे लक्षात ठेवा, असं संशोधक सांगतात. सततच्या उत्तेजनेनेही थकवा येतो. म्हणूनच थोडं थांबा (डिजिटल पॉझ), थोडं शांत व्हा आणि आनंदाचं भरतं नव्हे तर तो हळूवारपणे मनात येऊ द्या!
रिल्स, नोटिफिकेशन आणि आनंदाचा ओव्हरडोस: खरंच उपयोगी आहे का Dopamine Detox?
