Suicides Among Indian Men Due to Marital Stress Rise Suicide नैराश्य ही एक गंभीर मानसिक स्थिती आहे. असे मानले जाते की, लग्नानंतर महिला अधिक मानसिक ताण सहन करतात; परंतु पुरुषदेखील याला अपवाद नाहीत. पुरुषदेखील वैवाहिक कारणांमुळे नैराश्याने ग्रस्त असतात. त्यातूनच ते आत्महत्येचे पाऊल उचलतात. हे आता आकडेवारीतूनदेखील सिद्ध झाले आहे. विवाहाशी संबंधित समस्यांमुळे आत्महत्या करणाऱ्या महिलांच्या तुलनेत पुरुषांची संख्या वाढली आहे.
अनेक वर्षांत प्रथमच अशी आकडेवारी दिसून आली आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्यूरो (एनसीआरबी)च्या ताज्या आकडेवारीनुसार, देशाच्या सामाजिक आणि मानसिक आरोग्य गतिशीलतेमध्ये महत्त्वपूर्ण बदल झाल्याचे दिसून येते. ‘एनसीआरबी’च्या अहवालातून नक्की काय समोर आले आहे? विवाहसंबंधित समस्या म्हणजे नक्की काय? तज्ज्ञ याविषयी काय सांगतात? जाणून घेऊयात…
‘एनसीआरबी’च्या अहवालात काय?
‘एनसीआरबी’च्या २०२३ च्या अहवालातून हे दिसून आले की, वैवाहिक ताणामुळे ४,८६३ पुरुषांनी आत्महत्या करून आपले जीवन संपवले. तर, याच कारणामुळे आत्महत्या करणाऱ्या महिलांची संख्या ४,१८० होती. महिलांच्या तुलनेत ही संख्या पहिल्यांदाच वाढली असल्याचे सांगितले जात आहे. २०२२ मध्ये आत्महत्या करणाऱ्या पुरुषांची संख्या ४,२३७ आणि महिलांची ३,९२६ होती. केवळ एका दशकापूर्वी ही परिस्थिती नेमकी उलटी होती. २०१५ मध्ये विवाहसंबंधित समस्यांमुळे सुमारे ४,००० महिलांनी आणि २,४९७ पुरुषांनी आपले जीवन संपवले होते. यावरून गेल्या काही वर्षांत हा कल किती वेगाने बदलला आहे हे स्पष्ट होते.
विवाहसंबंधित समस्या म्हणजे काय?
- हुंड्याचा वाद
- विवाह न जुळणे
- विवाहबाह्य संबंध
- घटस्फोट आणि वेगळे होण्याचा ताण
- इतर वैवाहिक संघर्ष
हुंड्यामुळे होणाऱ्या आत्महत्यांमध्ये अजूनही महिलांची संख्या जास्त असली तरी घटस्फोट, विवाहबाह्य संबंध आणि विभक्त झाल्यानंतर निर्माण झालेल्या भावनिक तणावाशी संबंधित प्रकरणांमध्ये आता पुरुषांची संख्या वाढली आहे.
तिशीतील पुरुष सर्वाधिक तणावात?
२०१९ ते २०२३ दरम्यानच्या आकडेवारीवरून एक स्पष्ट लोकसंख्याशास्त्रीय विभाजन दिसते:
विवाहसंबंधित तणावामुळे आत्महत्या केलेल्या ३० वर्षांवरील पुरुषांची संख्या १०,८१६ होती, तर महिलांची संख्या ६,६१९ होती. ३० वर्षांखालील गटात, महिलांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त असल्याचे दिसून आले आहे. याच कालावधीत १३,९२१ महिलांनी, तर ८,९८३ पुरुषांनी आत्महत्या केली. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, हे बदलत्या दबावांचे चित्र आहे. जास्त वयाच्या पुरुषांना वैवाहिक संबंध तुटल्यानंतर आर्थिक आणि भावनिक बोजाचा सामना करावा लागतो; तर तरुण महिला हुंडा आणि घरगुती हिंसाचाराला बळी पडण्याची शक्यता अजूनही जास्त आहे, असे ते म्हणाले.
पुरुषांतील सामाजिक व भावनिक तणावाविषयी तज्ज्ञ काय सांगतात?
‘मातृभूमी डॉट कॉम’मध्ये दिल्या गेलेल्या माहितीत मनोवैज्ञानिक व सामाजिक संशोधकांनी वाढत्या पुरुष आत्महत्यांसाठी भावनिक एकाकीपण, आर्थिक ताण आणि वैवाहिक संघर्षातून जात असलेल्या पुरुषांसाठी आधारभूत संरचनांचा अभाव या गोष्टींना कारणीभूत ठरवले आहे. त्यांचे असे निरीक्षण आहे की, सार्वजनिक चर्चा अजूनही प्रामुख्याने विवाहांमध्ये महिलांना होणाऱ्या त्रासावर विशेषत: हुंडा आणि घरगुती अत्याचारावर केंद्रित असते. मात्र, पुरुषांच्या मानसिक आरोग्याच्या समस्यांकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते किंवा त्या किरकोळ मानल्या जातात.
विवाहसंबंधित आत्महत्या एकूण आत्महत्यांच्या ५ टक्के
२०२३ मध्ये विवाहसंबंधित मृत्यूंचे प्रमाण एकूण आत्महत्यांपैकी सुमारे पाच टक्के होते. कौटुंबिक समस्या, आजारपण व अमली पदार्थांचे सेवन हे यानंतर चौथ्या क्रमांकाचे प्रमुख कारण आहे. अशा आत्महत्यांची एकूण संख्या २०१५ मध्ये ६,४१२ होती, जी २०२३ मध्ये ९,०४३ पर्यंत वाढली आहे. ही वाढ भारतीय कुटुंबांमधील एका व्यापक मानसिक आरोग्य संकटाकडे लक्ष वेधते, जिथे वैवाहिक अस्थिरतेशी जोडलेला भावनिक ताण महिला-पुरुष अशा दोघांनाही प्रभावित करतो.
आत्महत्येची अलीकडील प्रकरणे
पुरुषांनी आपल्या माजी जोडीदारांना दोष देत आत्महत्या केल्याच्या अलीकडील अनेक प्रकरणांमुळे भारताच्या घटस्फोट कायद्यांवर आणि खोट्या आरोपांमुळे जीवन उद्ध्वस्त होत असल्याच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित झाले आहे.
- हैदराबाद : मार्च महिन्यात एका ३५ वर्षीय व्यक्तीने आपल्या पत्नीकडून होणाऱ्या छळामुळे आत्महत्या केल्याचा आरोप आहे. व्यक्तीच्या आईने पोलिसांकडे तक्रार केली की, त्यांच्या सुनेच्या वारंवार होणाऱ्या त्रासामुळेच मुलाने हे टोकाचे पाऊल उचलले.
- कोलकाता : कोलकाता येथील एक व्यक्ती सात वर्षांपासून एका दीर्घ कायदेशीर लढाईत अडकली आहे. एका व्हिडीओ निवेदनात, या व्यक्तीने दावा केला की, त्याच्यापासून वेगळी झालेली त्याची पत्नी त्याला २०१७ मध्ये एका वैवाहिक साईटवर भेटली. त्या महिलेने गर्भवती असल्याचे खोटे सांगून लग्नाची तारीख लवकर ठरवण्यास भाग पाडले; पण ती गर्भवती नव्हती. त्यांचे लग्न फक्त तीन महिने टिकले आणि त्यानंतर त्याची पत्नी घर सोडून गेली. महिनाभरानंतर २०१८ मध्ये त्या व्यक्तीला घरगुती हिंसाचाराच्या खटल्याची नोटीस मिळाली. त्यानंतर पोटगीच्या मागणीचा अर्जही आला.
- कोलकाता : ५१ वर्षीय अभिजीत पाल १७ मार्च रोजी त्यांच्या अपार्टमेंटच्या खिडकीच्या ग्रीलला लटकलेल्या अवस्थेत आढळले. वैद्यकीय प्रतिनिधी असलेले पाल जवळपास तीन महिन्यांपासून बेरोजगार होते आणि त्यांची पत्नी त्यांना सोडून माहेरी परत गेली होती. पोलिसांनी सांगितले, “ते नैराश्यात होते, अशी माहिती मिळाली. त्यांच्या आईला त्यांच्या खोलीचा दरवाजा उघडा दिसला आणि त्यांनी पाहिले की, ते खिडकीच्या ग्रीलला लटकले होते. मात्र, त्यांच्याजवळ कोणतीही सुसाइड नोट आढळली नाही.”
- आग्रा : आग्रा येथील मानव शर्मा या आयटी कर्मचाऱ्याने २४ फेब्रुवारी रोजी आत्महत्या केली आणि पत्नीवर आरोप करणारा एक व्हिडीओ संदेश त्याने रेकॉर्ड करून ठेवला होता.
- बंगळूरू : गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ३४ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनीयर अतुल सुभाष यांनी बंगळूरूमध्ये आत्महत्या केली. त्यांच्या माजी पत्नीकडून आलेल्या आर्थिक आणि कायदेशीर दबावामुळे त्यांनी हे पाऊल उचलल्याचे बोलले जाते.