मुंबईच्या पश्चिम उपनगरातील मढ आणि वर्सोवा हे दोन समुद्र किनारे पूल बांधून जोडण्यात येणार आहेत. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला आहे. १९६७ च्या विकास आराखड्यात प्रथम प्रस्तावित केलेला पूल गेली कित्येक वर्षे विविध परवानग्यांअभावी रखडला होता. आता या पुलासाठी आवश्यक असलेल्या पर्यावरणीय परवानग्या मिळाल्या असून लवकरच पुलाचे काम सुरू होण्याची शक्यता आहे. हा पूल भविष्यात सागरी किनारा मार्गालाही जोडला जाणार असून या पुलामुळे पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडी सुटणार का, या पुलामुळे मुंबईकरांना कसा दिलासा मिळणार याबाबतचे हे विश्लेषण
मढ वर्सोवा पुलाची आवश्यकता का?
मुंबईच्या पश्चिम उपनगरातील मालाड येथे मढ समुद्र किनारा आहे, तर वर्सोवा समुद्र किनारा अंधेरी पश्चिम परिसरात आहे. हे दोन समुद्र किनारे पश्चिम उपनगरातील असले तरी या दोन ठिकाणी जाण्यासाठी मुंबईकरांना बऱ्याच वाहतूक कोंडीतून सुमारे २२ किमीचे अंतर पार करून जावे लागते. सध्या या मार्गासाठी थेट मार्ग नसल्यामुळे लिंक रोड, एस व्ही रोड, पश्चिम दृतगती मार्ग असा तब्बल २२ किमीचा मोठा वळसा घालून किंवा मग बोटीने जावे लागते. तसेच पावसाळ्याच्या काळात ही बोटसेवा बंद ठेवावी लागते. त्यामुळे या दोन समुद्र किनाऱ्यांना जोडणाऱ्या मार्गाची आवश्यकता होती. नवीन पूल झाल्यास या पुलामुळे दळणवळण सोपे होणार आहे. त्यामुळे हा पूल प्रस्तावित आहे. पावसाळ्यात बंद होणाऱ्या बोट फेरीला पर्याय मिळून, रहिवासी, पर्यटक, मच्छीमार इत्यादींसाठी अखंड असा पर्यायी रस्ता मिळेल.
पुलामुळे आणखी काय फायदा?
हा पूल दळणवळण सुधारण्याच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचा असून नागरिकांना याचा जसा फायदा होईल तसाच फायदा या समुद्र किनाऱ्यांवर मासेमारीचा व्यवसाय करणाऱ्या मच्छीमारांना, भारत सरकारचे नौदल व कोस्ट गार्ड अशा कर्मचाऱ्यांच्या सुरळीत हालचालीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या पुलामुळे प्रवासाचा वेळ वाचणार आहे. २२ किमीचा प्रवास दीड किमीवर येणार आहे. तर प्रवासाचा ९० मिनिटांचा वेळ अक्षरशः पाच मिनिटांवर येणार आहे. त्यामुळे इंधन व वेळेची बचत होणार आहेच, तसेच कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन मोठ्या प्रमाणात कमी होईल. पश्चिम उपनगरारतील वाहतूक कोंडीही कमी होण्याची शक्यता आहे. पुलामुळे पर्यटनालाही चालना मिळणार आहे. मालाडचा मढ किल्ला व समुद्रकिनाऱ्यासारख्या ऐतिहासिक स्थळांपर्यंत सुलभ प्रवेश मिळून, मढ आयलंडचे पर्यटनक्षेत्र खुले होणार आहे. त्यामुळे स्थानिक व्यवसायांना लाभ मिळेल व रोजगाराच्या संधी निर्माण होतील. तसेच वस्तू व सेवांच्या वाहतुकीला गती मिळू शकेल. वर्सोवा किंवा मढ येथील रहिवाशांना आरोग्य सेवा वेळेवर मिळणे तसेच मालाची वाहतूक करणे या बाबीही जलद होतील.
पुलाला परवानग्या का मिळू शकल्या नाहीत?
हा प्रकल्प १९६७ त्या विकास आराखड्यात प्रथम प्रस्तावित केलेला असला तरी या प्रकल्पाची घोषणा २०१५ मध्ये करण्यात आली होती. मात्र विविध कारणांमुळे हे काम रखडले होते. या पुलाचा मार्ग हा कांदळवनातून जाणारा असल्यामुळे पर्यावरणीय परवानग्यांअभावी हा प्रकल्प रखडला होता. तसेच या परिसरातील स्थानिक मच्छीमारांनीही या प्रकल्पाला विरोध केला होता. मात्र जानेवारी २०२४ मध्ये या प्रकल्पाला किनारपट्टी व्यवस्थापन प्राधिकरणाने मंजुरी दिल्यानंतर मुंबई महापालिका प्रशासनाने मार्च २०२३ मध्ये या प्रकल्पासाठी निविदा मागवल्या होत्या. मात्र पर्यावरणीय परवानग्यांमुळे प्रत्यक्ष काम सुरू होऊ शकले नाही. आता या प्रकल्पाला राज्याच्या व केंद्राच्या पहिल्या टप्प्यात परवानग्या मिळाल्या आहेत. या प्रस्तावाचा भाग म्हणून, २.७५१५ हेक्टर जागेच्या बदल्यात ३ हेक्टर पर्यायी जागा निवडून त्यात एका झाडाच्या बदल्यात तीन झाडांचे वृक्षारोपण केले जाणार आहे.
कसा असेल हा पूल?
या पुलाचा मार्ग कांदळवनातून जात असल्यामुळे पिलर्सची संख्या कमी ठेवून आसपासच्या कांदळवनाचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने आरेखन केलेले आहे. कांदळवनांचे कमीतकमी नुकसान व्हावे म्हणून मढ आणि वर्सोवा दरम्यान केबल-स्टे पूल उभारण्यात येणार आहे. वांद्रे-वरळी सागरी सेतूप्रमाणे हा पूल केबल स्टे पद्धतीचा असेल. येत्या दोन-तीन महिन्यांत पुलाचे काम सुरू होण्याची शक्यता असून हे काम तीन वर्षांत पूर्ण केले जाणार आहे.
भविष्यात सागरी किनारा मार्गाला जोडणार?
मुंबई महापालिकेने सध्या वर्सोवा-दहिसर सागरी किनारा मार्गाच्या कामाला सुरुवात केली आहे. हा सागरी किनारा मार्ग थेट भाईंदरपर्यंत आहे. भविष्यात मढ-वर्सोवा पूल हा या सागरी किनारा मार्गाला जोडल्यास वर्सोव्याहून आलेल्या वाहनांना थेट दहिसर-भाईंदरपर्यंत जाता येणार आहे. त्यामुळे मुंबई आणि ठाणे हे परिसर जोडणारा आणखी एक मार्ग तयार होईल.
indrayani.narvekar@expressindia.com