फटका कुठे, किती?: अतिवृष्टीत चाळीत साठवलेला उन्हाळ आणि शेतातील खरीप अर्थात लाल अशा दोन्ही प्रकारच्या कांद्याला फटका बसला. नाशिकमध्ये ४० हजार हेक्टरवरील कांद्याचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अहिल्यानगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, आदी कांदा पिकवणाऱ्या भागांत नुकसान जास्त झाले. केंद्रीय समितीने नाशिक आणि अहिल्यानगरमध्ये पाहणी केली. उत्पादन किती घटणार, याचा आढावा घेतला. पंचनामे प्रगतिपथावर असून अंतिम अहवालानंतर कांद्याचे एकंदर नुकसान लक्षात येईल, असे कृषी अधिकारी सांगतात.
आकडेवारी काय सांगते?
राज्यात वर्षभरात खरीप, ‘लेट खरीप’ आणि रब्बी या तीन हंगामांत कांदा पीक घेतले जाते. कृषी विभागाच्या माहितीनुसार कांदा लागवडीखालील क्षेत्र १० लाख हेक्टरच्या आसपास आहे. यामध्ये मुख्य पीक रब्बी हंगामात जवळपास साडेसहा लाख हेक्टर क्षेत्रावर घेतले जाते. खरीप आणि लेट खरीपमध्ये तुलनेत कमी क्षेत्रावर लागवड होते. २०२५-२६ या वर्षात एक लाख ३७ हजार हेक्टरवर खरीप कांद्याची लागवड झाली. यातून १७.८६ लाख मेट्रिक टन उत्पादन अपेक्षित आहे.
संकटांची मालिका
काही महिन्यांपासून उन्हाळ कांद्याला घाऊक बाजारात क्विंटलला सरासरी हजार ते १२०० रुपये दर मिळत आहे. अतिवृष्टीत शेतातील कांदादेखील हातातून गेल्याची भावना शेतकरी वर्गातून उमटली. किमतीतील चढ-उतार, निर्यातीवरील निर्बंध, साठवणुकीसाठी पायाभूत सुविधांचा अभाव, काढणीपश्चात नुकसान आदी आव्हानांना तोंड देणाऱ्या उत्पादकांसमोर अतिवृष्टीने संकट कोसळले. पावसाने केवळ खरीप वा उशिराच्या अर्थात लेट खरिपचे नव्हे तर, काही ठिकाणी उन्हाळ कांद्यासाठी लावलेल्या रोपांचेही नुकसान झाले आहे.
कृषी विभाग काय म्हणतो?
पावसाने खरीप कांद्यासह चाळीतील उन्हाळ कांद्याचे निश्चितपणे नुकसान झाले आहे. खरीप कांद्याची लागवड १ जुुलै ते १५ सप्टेंबर या कालावधीत केली जाते. ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान तो काढणीला येतो. त्यालाच पावसाची झळ बसली. लेट खरिपाची लागवड सप्टेंबरच्या उत्तरार्धात सुरू होते. रब्बी अर्थात उन्हाळ कांद्याची लागवड नोव्हेंबरच्या मध्यानंतर होते. पावसामुळे खरिपातील कांदा उत्पादनात घट होईल. मात्र, पुढील हंगामात ती भरून निघेल. कारण, अतिवृष्टीमुळे यंदा दुष्काळग्रस्त भागात पाणी आहे. तेथील शेतकरी लेट खरीप व रब्बी हंगामात कांदा लागवडीकडे वळतील, असा काही अधिकाऱ्यांचा अंदाज आहे.
उत्पादकता किती?
खरीप कांद्याची अन्य हंगामांचा विचार करता सर्वात कमी म्हणजे प्रति हेक्टरी १० ते १५ मेट्रिक टन उत्पादकता असते. त्यानंतर लागवड होणाऱ्या लेट खरीप हंगामात प्रति हेक्टरी १५ ते २० मेट्रिक टन उत्पादकता आहे. तर रब्बी अर्थात उन्हाळ कांद्याचे उत्पादन प्रति हेक्टरी सर्वाधिक २० ते २५ मेट्रिक टन इतके असते. त्याचे आयुर्मान जास्त असल्याने तो चाळीत साठवून ठेवता येतो. दर उंचावल्यानंतर विकता येतो. खरीप आणि लेट खरीप कांद्याची साठवणूक करता येत नाही. काढणीनंतर तो लगेच बाजारात न्यावा लागतो. आहे त्या दरात विकण्याशिवाय गत्यंतर नसते.
कांदा उत्पादक संघटनांचे निरीक्षण
ज्या भागात उन्हाळ्यात शेतीला पाणी नसते, अशा भागात खरीप कांद्याची अधिक लागवड केली जाते. पावसामुळे काढणीवर आलेल्या कांद्याचे नुकसान होईल. ज्याची फारशी वाढ झाली नाही, त्यांना कमी झळ बसेल. राज्यात बीड, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर भागात पावसाने मोठे नुकसान झाले आहे. या तुलनेत नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात कमी नुकसान असेल. काही ठिकाणी कांदा रोपवाटिकांचेही नुकसान झाल्याकडे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी लक्ष वेधले.