रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, शांती, साहित्य, अर्थशास्त्र अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत अनोखे काम करणाऱ्या दिग्गजांना जगातील प्रतिष्ठेच्या ‘नोबेल पुरस्कारा’ने सन्मानित केले जाते. स्वीडनचे प्रख्यात रसायनशास्त्रज्ञ आणि इंजिनिअर आल्फ्रेड नोबेल यांच्या पुण्यतिथीदिनी (१० डिसेंबर) या पुरस्काराचे वितरण केले जाते. वेगवेगळे ३५५ पेटंट आल्फ्रेड नोबेल यांच्या नावे होते. नोबेल यांनी डायनामाइट या स्फोटकाचा शोध लावला. हा शोध नंतर संपूर्ण जगासाठी वरदान ठरला. मात्र, डायनमाइटचा वापर युद्धातही केला जातो. याच पार्श्वभूमीवर नोबेल यांनी डायनामाइटचा शोध कसा लावला? त्याचा उपयोग नेमका कशासाठी केला जातो? हे जाणून घेऊ या…
१० डिसेंबरचे महत्त्व काय?
आल्फ्रेड नोबेल यांचे १० डिसेंबर १८९६ रोजी निधन झाला. १० डिसेंबर रोजी साहित्य, रसायनशास्त्र, शांती, भौतिकशास्त्र अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत उत्तुंग कामगिरी करून जगभरातील लोकांच्या कल्याणासाठी हातभार लावणाऱ्या मान्यवरांचा नोबेल पुरस्काराने सन्मान केला जातो. म्हणूनच जगभरात १० डिसेंबर हा दिवस ‘नोबेल प्राईज दिवस’ म्हणून साजरा केला जातो.
नोबेल यांनी लावला डायनामाइटचा शोध
आल्फ्रेड नोबेल यांनी एका ट्रस्टची स्थापना केला जावी तसेच जगातल्या उत्तम शास्त्रज्ञांना, साहित्यिकांना आणि शांतीदूतांना सन्मानित केले जावे, असे आपल्या मृत्यूपत्रात लिहून ठेवले होते. आता त्यांच्या नावाने शांततेसाठी काम करणाऱ्यांचा सन्मान केला जात असला तरी सध्या काही ठिकाणी स्फोटक म्हणून वापरल्या जाणाऱ्या डायनामाइटचा शोध नोबेल यांनीच लावलेला आहे. या डायनामाइटच्या शोधाची कथा मोठी रंजक आहे. नोबेल यांनी १८६२ साली नायट्रोग्लिसरीन या घटकाच्या निर्मितीस सुरुवात केली. बांधकाम क्षेत्रात या घटकाचा वापर व्हावा, असा नोबेल यांचा उद्देश होता. सुरुवातीला त्यांनी स्टॉकहोम येथे नायट्रोग्लिसरीनचा कारखाना सुरू केला होता. नायट्रोग्लिसरीन या स्फोटकाचा सुरक्षितपणे कसा स्फोट करता येईल, यावर ते काम करत होते.
ग्रीक शब्दापासून स्फोटकाला डायनामाइट असे नाव
त्यासाठी त्यांनी सर्वांत अगोदर ब्लास्टिंग कॅपची निर्मिती केली. त्यांनी सिलिसियस अर्थ, कैसेलगुहर यासारख्या घटकांमुळे नायट्ररोग्लिसरीनला स्थिरता येते, असा शोध लावला. त्यानंतर १८६६ साली आल्फ्रेड नोबेल यांनी डायनामाइटचा शोध लावला आणि १८६७ साली त्यांनी डायनामाइट स्फोटकाचे पेटंट घेतले. डायनामाइट हा एक ग्रीक शब्द आहे. या शब्दाचा अर्थ शक्ती असा होतो. डायनामाइटचा स्फोट झाल्यावर त्यातून ऊर्जा निर्माण होते. याच कारणामुळे नोबेल यांनी या स्फोटकाला डायनामाइट असे नाव दिले. नायट्रोसेलुलोज आणि नायट्रोग्लिसरीन यांचे मिश्रण करून नोबेल यांनी डायनामाइटचा शोध लावला होता.
डायनामाइटच्या शोधामुळे क्रांती
नोबेल यांनी डायनामाइटचा शोध लावल्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रात एक प्रकारे क्रांती झाली. अगदी कमी काळात डायनामाइट नावाचे स्फोटक जगभरात प्रसिद्ध झाले. डायनामाइट हे ब्लॅक पावडरपेक्षा (एका प्रकारचे स्फोटक)
अधिक सुरक्षित होते. म्हणूनच लोक ब्लॅक पावडरपेक्षा डायनामाइटचा वापर करू लागले. नोबेल यांनी डायनामाइटचे स्वाामित्त्व स्वत:कडेच कसे राहील, यासाठी पूर्णपणे काळजी घेतली. अनेक कंपन्या परवाना नसूनही डायनामाइटचे उत्पादन करू लागल्या. मात्र, नंतर या कंपन्यांवर बंदी घालण्यात आली. तरीदेखील अमेरिकेतील काही कंपन्यांनी पळवाटा शोधल्या होत्या. या कंपन्यांकडून डायनामइटचे उत्पादन घेतले जात होते.
डायनामाइटमुळे बांधकाम क्षेत्रात मोठी प्रगती
डायनामाइट हा घटक ब्लॅक पावडरपेक्षा हजारो पटीने अधिक शक्तीशाली होता. डायनामाइटमुळे बोगदे, रस्ते, कालवे तसेच इतर बांधकाम प्रकल्पांचे काम अधिक वेगाने होऊ लागले. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात बांधकाम तसेच अभियांत्रिकी क्षेत्रात डायनामाइटला फार महत्त्व आले होते. डायनामाइटच्या स्फोटामुळे मोठे-मोठे दगड फुटायचे. कमी मनुष्यबळ आणि कमी वेळ खर्च करून हे काम जलत गतीने व्हायचे. त्यामुळे बांधकाम क्षेत्राला गती मिळाली होती.
उद्योग क्षेत्रात डायनामाइटची मदत
आल्फ्रेड नोबेल यांनी डायनामाइटचा शोध लावला त्या काळात जगभरात रेल्वेजाळे निर्माण केले जात होते. रेल्वे रुळांची उभारणी करण्यासाठी मोठे पर्वत फोडावे लागत. या पर्वतात डायनामाइटच्या मदतीने स्फोट घडवून रेल्वे रुळ तयार करण्यात आले. याच काळात उद्योग क्षेत्रातही वेगाने विकास होत होता. उद्योगविश्वातही डायनामाइटचा फार उपयोग झाला. मात्र, डायनामाइटच्या स्फोटामुळे अनेकवेळा लोकांचा मृत्यूदेखील व्हायचा.
मृत्यूच्या व्यापाऱ्याचे निधन म्हणून वृत्त प्रकाशित
नोबेल यांनी मानवजातीच्या कल्याणासाठी डायनामाइटचा शोध लावला. खाणकाम, इमारतींचे बांधकाम या क्षेत्रात डायनामाइटचा उपयोग व्हावा असा त्यांचा हेतू होता. मात्र, याच डायनामाइटचा युद्धात स्फोटक म्हणूनही वापर केला जाऊ लागला. आल्फ्रेड नोबेल यांचे बंधू लुडविग यांचा १८८८ साली मृत्यू झाला होता. फ्रान्सच्या एका वृत्तपत्राला नोबेल यांचाच मृत्यू झाला आहे असे वाटले. नंतर या वृत्तपत्राने चुकून ‘मृत्यूच्या व्यापाऱ्याचे निधन’ अशा मथळ्याने आल्फ्रेड नोबेल यांच्या निधनाचे चुकीचे वृत्त दिले होते.
नोबेल १०० कारखान्यांचे मालक
नोबेल यांचे १० डिसेंबर १८९६ रोजी निधन झाले. नोबेल यांचे निधन झाले तेव्हा ते विस्फोटक आणि युद्धसामग्री तयार करणाऱ्या १०० कारखान्यांचे मालक होते. नोबेल यांनी एका स्फोटकाचा शोध लावला असला तरी त्यांना जगात शांतता नांदावी असे वाटायचे. याच कारणामुळे त्यांनी १८९५ मध्ये त्यांचे मृत्यूपत्र तयार केले होते. या मृत्यूपत्रात संपत्तीची मदत घेऊन एका ट्रस्टची स्थापना केली जावी, तसेच शास्त्रज्ञ, साहित्यिक आणि शांतीदूतांना सन्मानित केले जावे असे लिहून ठेवले. म्हणूनच आता शास्त्रज्ञ, लेखक, अर्थशास्त्र, मानवी हक्कासाठी लढणारे कार्यकर्ते यांना नोबेल यांच्या नावे जगातील सर्वोच्च अशा ‘नोबेल पुरस्कारा’ने सन्मानित केले जाते.