गुवाहाटी येथे १ सप्टेंबर रोजी एका कार्यक्रमात बोलताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशवासियांना इंडियाऐवजी भारत असे संबोधण्याचे आवाहन केले होते. देशाचे नाव भारत हेच आहे, इंडिया नव्हे असे स्पष्ट करत भाषा कोणतीही असो देशाचे नाव बदलत नाही हे त्यांनी नमूद केले होते. विशेष म्हणजे त्यानंतर चारच दिवसांनी जी-२० समूहाच्या बैठकीच्या मेजवानीसाठी पाहुण्या राष्ट्रप्रमुखांना जे निमंत्रण देण्यात आले आहे, त्यावर ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ असा उल्लेख आहे. त्यामुळे इंडिया की भारत हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. अर्थात संघाने नेहमीच हे अधोरेखित केले आहे. संघाची विविध गीते किंवा बौद्धिकांमध्ये भारत हाच उल्लेख असल्याचे मुंबईत संघाच्या विविध जबाबदाऱ्या सांभाळलेल्या एका ज्येष्ठ कार्यकर्त्याने स्पष्ट केले.
‘अनावश्यक वाद’…
भारत हेच नाव आहे. त्यात वादाचा मुद्दा नाही असे संघाच्या एका जुन्या प्रचारकाने नमूद केले. हे नैसर्गिक नाव आहे. त्यात कुणाच्या विचारसरणीचा मुद्दा नाही असेही संबंधितांनी स्पष्ट केले. सर्व प्रादेशिक भाषांमध्ये भारत हाच उल्लेख आहे. बंगाली साहित्य वाचल्यावरही हे लक्षात येईल असे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी रिसर्च फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिर्बन गांगुली यांनी सांगितले. भारत आणि इंडिया हे दोन्ही उल्लेख राज्यघटनेत आहेत. मात्र अधिकाधिक नागरिक भारत या शब्दाला प्राधान्य देत असल्याने त्याला महत्त्व आहे, असे गांगुली यांचे म्हणणे आहे. ब्रिटिशांनी अनेक नावे दिली, पुढे ती बदलण्यात आली. उदा. सिलोनचे श्रीलंका तर बर्माचे म्यानमार झाल्याचा संदर्भ त्यांनी दिला. त्यातून कोणतीही समस्या निर्माण झाली नाही. त्यामुळे भारत विरुद्ध इंडिया असा वाद उत्पन्न करणे चुकीचे आहे असे संघाच्या एका पदाधिकाऱ्याने स्पष्ट केले. कदाचित हिंदुस्थान आणि भारत यात वाद होऊ शकेल. पण भारत या नावात आक्षेप असण्याचे कारण नाही, असे संघातील मंडळींचे म्हणणे आहे.
हेही वाचा – ‘वन आवर ट्रेड सेटलमेंट’ म्हणजे काय? ट्रेडिंग आणखी सोपे होणार?
संघाचा भारतावर भर
संघाने सुरुवातीपासूनच भारत या शब्दावर भर दिला आहे. राज्यसभा सदस्य राकेश सिन्हा यांच्या ‘मेकर्स ऑफ मॉर्डन इंडिया – के. बी. हेडगेवार’ या पुस्तकात याबाबतचा दाखला आहे. १९२९ मध्ये वर्धा येथील भाषणात संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार यांच्या एका भाषणाचा उल्लेख आहे. ब्रिटिश सरकारने अनेक वेळा स्वातंत्र्य देण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र त्याची पूर्तता केलेली नाही. आता भारत आपल्या ताकदीवरच ते मिळवेल असे हेडगेवार यांनी म्हटले होते. त्यावेळी भारत हा उल्लेख होता. संघ नेत्यांची बहुतेक भाषणे ही हिंदीत असतात, त्यात भारत हाच संदर्भ असतो. भारत माता की जय या घोषणेच्या ठिकाणी इंडिया हे विचित्र वाटते. १९५० मध्ये संघाचा जो पहिला ठराव आहे. त्यात फाळणीनंतर हिंदूंच्या स्थितीबाबत उल्लेख करताना गव्हर्नमेंट ऑफ भारत याच अर्थाने संबोधले गेले आहे. १९५३ मध्ये अखिल भारतीय प्रतिनिधी सभा तसेच कार्यकारी मंडळाने जे दोन ठराव संमत केले त्यात काश्मीरचे भारतात संपूर्ण विलीनीकरण असाच उल्लेख आहे. १९६२ मध्ये पहिल्यांदा इंडिया हा उल्लेख आला. मात्र त्यानंतर इंडियाऐवजी भारत वापरा अशी मागणी कुणीच केली नाही. सरसंघचालकांच्या गुवाहाटी येथील भाषणातील आवाहनानंतर हा मुद्दा चर्चेत आला.
भक्कम सांस्कृतिक बंध
द्वितीय सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर यांच्या ‘विचारधन’ या पुस्तकात भारत या शब्दाचा घट्ट सांस्कृतिक बंध विशद करण्यात आला आहे. ‘भारत ही आपली माता आहे. आपल्या सांस्कृतिक परंपरेत एखाद्या महिलेला अमुक एकाची पत्नी यापेक्षा तिच्या मुलाच्या किंवा मुलीच्या नावाने ओखळले जाते. त्यामुळे भारत ही आपली मातृभूमी आहे’ असे गोळवलकर म्हणतात. संघ परिवारातील अनेक संघटनांची नावेही भारत या नावाशी निगडित आहे. भारतीय मजदूर संघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय किसान संघ ही काही उदाहरणे आहेत. अगदी ताजे उदाहरण घ्यायचे झाल्यास, पुण्यात संघाची समन्वय बैठक या महिन्यात होत आहे. त्या संदर्भात जे निवेदन काढण्यात आले आहे. त्यातही ऑल भारत कोऑर्डिनेशन कमिटी असा उल्लेख करण्यात आला आहे. थोडक्यात भारत या शब्दावर भर देण्यात आला आहे.
हेही वाचा – मराठा आरक्षणाचा वाद मिटणार की पेटणार?
राजकीय आरोपांना धार
राष्ट्रपतींच्या जी-२० निमंत्रणपत्रिकेतील उल्लेखानंतर विरोधकांच्या टीकेला सत्ताधाऱ्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भारत जोडो यात्रा नावाने यात्रा करणाऱ्यांना हे नाव का खुपते असा सवाल भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी केला आहे. तर विरोधकांच्या इंडिया आघाडीचे नाव बदलून भारत केल्यास काय करणार, असा प्रश्न दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उपस्थित केला आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनीही पंतप्रधानांवर टीका केली आहे. देशाचे नाव भारत हे वापरण्याबाबत तसेच इंडिया हा शब्द वगळण्याबाबत संसदेच्या विशेष अधिवेशनात केंद्र सरकार विधेयक आणणार काय, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आता भारत या शब्दावरून सत्तारूढ-विरोधकांमध्ये आरोपांच्या फैरी झडण्याची चिन्हे आहेत.