‘ऑपरेशन सिंदूर’ कारवाईदरम्यान पाकिस्तानला चीन आणि तुर्कीयेकडून सक्रिय मदत मिळत होती, अशी माहिती लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल राहुल सिंह यांनी नुकतीच दिली. सिंदूर कारवाईदरम्यान भारताचा मुकाबला करण्यासाठी पाकिस्तानने चिनी लढाऊ विमाने आणि क्षेपणास्त्रे, तसेच तुर्की ड्रोन्स वापरले हे ज्ञात होतेच. पण चीनने उपग्रहांच्या माध्यमातून गुप्तवार्ता पुरवली, तुर्कीयेने ड्रोन हाताळणीसाठी प्रशिक्षित मनुष्यबळ पुरवले ही माहिती नवीन होती. या कारवाईमध्ये पाकिस्तानला चीन आणि तुर्कीयेने साथ दिली, भविष्यातही कदाचित देतील. पण पुन्हा युद्धाचा किंवा सौम्य कारवाईचा भडका उडाल्यास भारताच्या बाजूने कोणते देश येतील, याविषयी संदिग्धता आहे. भारताने भविष्यात ही शक्यता गृहित धरून आखणी केली पाहिजे.
एक सीमा, तीन शत्रू
भविष्यात कधीतरी पाकिस्तान आणि चीनकडून एकत्रित आक्रमण होण्याची शक्यता भारतीय राजकीय नेतृत्वाने, सैन्यदल उच्चाधिकाऱ्यांनी आणि सामरिक विश्लेषकांनी गृहित धरली होती. पण ही शक्यता आजवर केवळ सैद्धान्तिक पातळीवर होती. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या निमित्ताने पहिल्यांदाच पाकिस्तानचा प्रत्यक्ष सहभाग आणि चीनचा अप्रत्यक्ष सहभाग अशी स्थिती पाहायला मिळाली. पण चीनकडून पाकिस्तानला होणारी मदत अप्रत्यक्ष नव्हती. त्याचबरोबर, या कारवाईत तुर्कीयेनेही पाकिस्तानला मदत केली. काश्मीरच्या मुद्द्यावर तुर्कीयेने नेहमीच पाकिस्तानची पाठराखण केलेली आहे. पण पाकिस्तानला अत्यंत महत्त्वाची लष्करी मदत – विध्वंसक लॉयटरिंग ड्रोन्स – या देशाकडून प्रथमच झाली. याशिवाय हे ड्रोन्स चालवण्यासाठी आणि उडवण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळही तुर्कीयेने पुरवले. चीनने उपग्रहांच्या माध्यमातून भारतीय हालचालींवर नजर ठेवली आणि त्याविषयीची इत्थंभूत माहिती पाकिस्तानला पुरवली.
चीनची भारतावर ‘नजर’
सिंदूर कारवाईदरम्यान भारत आणि पाकिस्तानचे लष्करी कारवाई महासंचालक सातत्याने परस्परांच्या संपर्कात होते. त्यावेळी पाकिस्तानकडून ‘तुमचे अमूक एक क्षेपणास्त्र तैनात आहे. ते डागू नये’ अशा सूचना होत होत्या. ही सगळी हालचाल चिनी उपग्रह टिपत होते आणि तशी माहिती पाकिस्तानला पुरवत होते. याचा अर्थ भारताची कोणतीही हालचाल चिनी ‘नजरेतून’ सुटत नव्हती. कदाचित ऑपरेश सिंदूर सुरू होण्याआधीपासून भारताच्या हालचाली चीन टिपत होता. याचाच लाभ उठवत पाकिस्तानकडून सुरुवातीला झालेल्या तिखट प्रतिकारामध्ये भारताला एक किंवा अधिक लढाऊ विमाने गमवावी लागली असावीत, असेही स्पष्ट होऊ लागले आहे.
ब्रह्मोसने बाजी उलटवली?
पाकिस्तानी रडार यंत्रणांचा वेध घेण्याचे भारताने ठरवले आणि यासाठी प्राधान्याने ब्रह्मोस या सुपरसॉनिक मिसाइलचा वापर केला. ध्वनीपेक्षा अधिक वेगाने (स्वनातीत) या क्षेपणास्त्रांचा वेध घेणे चिनी यंत्रणेसही झेपले नाही. याउलट पाकिस्तानच्या प्रत्येक क्षेपणास्त्र व ड्रोन हल्ल्यांचा वेध घेऊन ते नष्ट करण्यासाठी भारताने विविध प्रकारची युद्धसामग्री वापरली. भारतीय क्षेपणास्त्रांचे वैविध्यही निर्णायक ठरले.
सिंदूर कारवाई ठरली चीनची ‘प्रयोगशाळा’?
अनेक शस्त्रास्त्रांची आणि यंत्रणांची परिणामकारकता तपासून पाहण्यासाठी चीनने ऑपरेशन सिंदूर कारवाईचा वापर एखाद्या प्रयोगशाळेसारखा केला, असे लेफ्टनंट जनरल राहुल सिंह यांनी म्हटले आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये पाकिस्तानने आयात केलेल्या युद्धसामग्रीपैकी ८१ टक्के चिनी बनावटीची आहे. भविष्यात या सामग्रीमध्ये सुधारणा करून चीन ती पाकिस्तानला पुरवू शकतो किंवा भारताविरुद्धही वापरू शकतो. चीनची क्षेपणास्त्र बचाव प्रणाली भारताविरुद्ध सर्वाधिक कुचकामी ठरली. पण जेएफ मालिकेतली लढाऊ विमाने आणि त्यांवर तैनात पीएल – १५ क्षेपणास्त्रे तुलनेने अधिक परिणामकारक ठरली. भारताने रशिया, फ्रान्स आणि इस्रायली बनावटीच्या शस्त्रास्त्रांबरोबरच भारतीय बनावटीची सामग्रीही मोठ्या प्रमाणात वापरली. त्याचाही अभ्यास चीनने करून ठेवला असेल ही शक्यता नाकारता येत नाही.
भविष्यातील धोके
इस्रायल-इराण संघर्षामध्ये इराणला चीन आणि रशिया या पारंपरिक शत्रूंनी वाऱ्यावर सोडले. याउलट इस्रायलला त्यांचा जुना मित्र अमेरिकेने ऐनवेळी हस्तक्षेप करून साथ दिली. पाकिस्तानसाठी चीन आणि तुर्कीये हे देश यापुढे कोणत्याही प्रकारची कारवाई किंवा युद्धामध्ये साथीदार ठरतील. भारताला तशाच प्रकारची साथ रशिया, इस्रायल, फ्रान्स किंवा अगदी अमेरिकेकडून मिळेल का, असा प्रश्न आहे. अशी साथ गृहित न धरता भारताने तयारी चालवली असण्याची शक्यता अधिक आहे. पण शस्त्रास्त्रांच्या बाबतीत आजही आपण इतर देशांवर अधिक अवलंबून आहोत. हे अवलंबित्व भविष्यात कमी करणे क्रमप्राप्त ठरते.