History of Taj Mahal Protection 1971: ऑपरेशन सिंदूरनंतर भारत-पाकिस्तान लष्करी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रीय स्मारकांना धोका असल्याची शक्यता ओळखून सुरक्षा यंत्रणांनी ताजमहालावर ड्रोनविरोधी यंत्रणा कार्यान्वित केली आहे. या प्रणालीची शोधक क्षमता तब्बल आठ किलोमीटरची आहे आणि ती ‘सॉफ्ट किल’द्वारे कोणताही हवाईधोका निष्प्रभ करू शकते. भारताने पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्यानंतर ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. ही यंत्रणा ड्रोन शोधून ते प्रभावीपणे निष्प्रभ करू शकते, हे सिद्ध झाले आहे.
सहाय्यक पोलीस आयुक्त (ताज सुरक्षा) सय्यद आरिब अहमद यांनी सांगितले की, ही यंत्रणा आठ किलोमीटर परिसरात कोणत्याही दिशेने येणारी ड्रोन्स शोधू शकते. “ही यंत्रणा केवळ ड्रोनचा सध्याचा ठावठिकाणा नव्हे, तर त्याचे उड्डाण नेमके कुठून झाले आहे, याचीही अचूक माहिती देते. स्मारकाच्या ५०० मीटर परिसरात आलेली ड्रोन्स स्वयंचलित पद्धतीने निष्प्रभ होतील,” असे त्यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले की, ताजमहालभोवती असलेल्या नो-फ्लाय झोनमध्ये ड्रोन आढळल्यास तात्काळ कारवाई केली जाईल. “ऑपरेटरचा ठाव शोधून त्याच्या ठिकाणी छापा टाकण्यात येईल आणि प्रचलित कायद्यांनुसार कारवाई केली जाईल,” असेही अहमद यांनी सांगितले. ही यंत्रणा कार्यान्वित करण्यापूर्वी ताजमहालावर तैनात सुरक्षा कर्मचाऱ्यांना त्याचे प्रशिक्षण देण्यात आले.
सॉफ्ट किल म्हणजे काय?
ताजमहाल व त्याच्या परिसराचे संरक्षण आग्रा पोलीस व केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) संयुक्तपणे करतात. ताजमहालाच्या ५०० मीटर परिसरात ड्रोन वापरणे प्रतिबंधित आहे. सुरक्षेच्या कारणास्तव अधिकृत सूत्रांनी या प्रणालीचे तपशील उघड करण्यास नकार दिला, मात्र पोलीस सूत्रांनी सांगितले की, ही यंत्रणा ‘सिग्नल जॅमिंग’ तंत्रज्ञानाचा वापर करते, त्यामुळे येणारे ड्रोन निष्प्रभ होतात. यालाच ‘सॉफ्ट किल’ असे म्हटले जाते. या प्रणालीच्या कार्यान्वयन व देखभालीची जबाबदारी आग्रा पोलिसांकडे आहे.
१९७१ भारत- पाकिस्तान युद्ध आणि ताजमहाल
१९७१ साली भारत-पाकिस्तानमधील युद्धाची अधिकृत घोषणा ३ डिसेंबर १९७१ साली करण्यात आली. ३ डिसेंबर रोजी पाकिस्तानने भारताच्या सैनिकी तळांवर अचानक हल्ला केला होता. या ऑपेरेशनचे नाव ‘चंगेझ खान’ असे होते. पश्चिम आघाडीवरील भारतीय हवाईदलाच्या १२ पेक्षा अधिक तळांवर हल्ला करण्यात आला होता. त्यातील एक तळ खेरिया एअरबेस होता. हा हवाई तळ ताजमहालपासून काही किलोमीटर अंतरावर आहे.

ताजमहालाला धोका
पाकिस्तानच्या दोन लढाऊ विमानांनी खेरिया धावपट्टीवर बॉम्बफेक केली, त्यामुळे किरकोळ नुकसान झाले. हे हल्ल्याचे ठिकाण ताजमहालच्या इतक्या जवळ होते की, भारताच्या सांस्कृतिक ठेव्यालाही धोका निर्माण झाला होता. ताजमहालासारख्या ठिकाणावर हल्ला होणं, हे भारतीय जनतेचं खच्चीकरण करण्यासारखं आहे त्यामुळे भारत सरकाराने सांस्कृतिक ठेव्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना केली.
८४०० किलोची ताडपत्री…
हल्ल्यानंतर केवळ २४ तासांतच भारतीय पुरातत्त्व खात्याने आकाशातून दिसणारा ताजमहाल लपवण्यासाठी प्रयत्न सुरु केले. हिरव्या रंगाचे ज्यूटची भलीमोठी ताडपत्री ताजमहालावर टाकण्यात आली. ही ताडपत्री सुमारे ८४०० किलो वजनाची होती. तर संपूर्ण ताजमहाल झाकण्यासाठी ६०० किलो खिळे आणि ६३ विशेष शिवणसुयांचा वापर करण्यात आला होता. मिनारांभोवती झाडांच्या फांद्या व झुडूपं लावून त्यांना लपवण्यात आलं. संगमरवरी पायऱ्यांवर वाळू टाकून त्या लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला. रोज संध्याकाळी ताजमहालमधील सर्व दिवे बंद केले जात होते. पर्यटकांना बंदी घालण्यात आली आणि कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली. संपूर्ण ताजमहाल झाकण्यासाठी दोन आठवड्यांपेक्षा जास्त वेळ लागला.
ताजमहाल लपवण्याची ती पहिलीच वेळ नव्हती…
ताजमहाल लपवण्यासाठी लढवण्यात आलेली शक्कल ही पहिल्यांदाच लढवण्यात आलेली नव्हती. १९४२ साली ब्रिटिशांनी जर्मन किंवा जपानी बॉम्बफेक करणाऱ्या विमानांपासून संरक्षण म्हणून घुमटाभोवती बांबूचे अडसर लावले होते. जेणेकरून आकाशातून पाहताना ती बांधकामाची जागा वाटावी हा हेतू होता. त्या कालखंडात जीपीएस, सॅटेलाइट संचालित शस्त्र नसल्याने पारंपरिक संरक्षणाच्या कल्पना प्रभावी ठरल्या.
ताजमहल लपवणं हा एक युद्धातील कौशल्याचा आणि राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक असलेला भाग आहे. १९७१ साली भारताने केवळ लढाई लढला नव्हता, तर आपल्या सांस्कृतिक वारशाचेही संरक्षणही भारताने केलं आणि जनतेला सजगही केलं. आजही, संकटात भारताचं तत्काळ कृती करणं, सांस्कृतिक जागरूकता आणि आत्मबल याचंच प्रतीक आहे.