Delhi name origin: चांदणी चौकचे खासदार प्रवीण खंडेलवाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून दिल्लीचे नाव बदलून ‘इंद्रप्रस्थ’ करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या या पत्रामुळे भारताच्या आधुनिक राजधानीला थेट महाभारतकालीन संस्कृतीशी जोडण्याची जुनी मागणी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. खंडेलवाल यांनी पत्रात लिहिले आहे की, “दिल्लीचा इतिहास हा केवळ हजारो वर्षांचा नाही, तर तो भारतीय संस्कृतीचा आणि पांडवांनी स्थापन केलेल्या इंद्रप्रस्थ या नगराच्या गौरवशाली वारशाचा जिवंत पुरावा आहे.” हे पत्र त्यांनी दिल्ली स्थापनेच्या वर्धापनदिनानिमित्त पाठवले होते. त्याच पार्श्वभूमीवर दिल्ली या शहराला ते नाव कसे पडले? खरंच दिल्ली हे मुस्लीम नाव आहे का? याचाच घेतलेला हा आढावा.
व्हाइसरॉय लॉर्ड हार्डिंग यांनी रायसिना हिलवर नवी दिल्ली बांधण्याच्या वेळी या स्थळाला नाव काय देण्यात यावे, असे विचारले होते. त्यावेळी या स्थळाला दिल्ली असे नाव देण्यात आले. असे असले तरी मिर्झा गालिबसाठी हे शहर ‘दिली’च होते.
दिल्ली: हिंदुस्तानचे हृदय
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाने प्रकाशित केलेल्या Delhi and Its Neighbourhood या पुस्तकात इतिहासकार वाय. डी. शर्मा लिहितात, “दिल्लीचे पहिले मध्ययुगीन शहर तोमरांनी स्थापन केले होते आणि त्याला ‘ढिली’ किंवा ‘ढिल्लिका’ असे नाव दिले गेले. मात्र, ऐतिहासिक नोंदींमध्ये ‘ढिल्लिका’ हे नाव ११ व्या शतकातील (इ.स. ११७०) बिजोलिया (जिल्हा उदयपूर) येथील लेखात आढळते, या लेखात चाहमनांनी दिल्ली जिंकल्याचा उल्लेख आहे.
पालमबावलीत ‘ढिली’
इ.स. १२७६ मधील बलबनच्या काळातील पालम बावली शिलालेखात या शहराला ‘ढिली’ म्हटले असून, ते असलेल्या प्रदेशाला ‘हरियाणक’ असे संबोधले आहे. तर मोहम्मद तुघलक (१३२८) याच्या काळातील शिलालेखात या शहराचा उल्लेख ‘ढिल्लिका’ असा आहे. जुन्या नोंदींमध्ये या शहराला ‘ढिली’, ‘दिहली’ आणि ‘ढिल्लि’ अशा विविध नावांनी ओळखले गेले आहे. काही नोंदींमध्ये त्याचा उल्लेख ‘देहली’ असा आढळतो, त्याचा अर्थ ‘देशाचा उंबरठा’ असा होतो, तर काही इतर नोंदींमध्ये त्याला ‘दिली’ म्हटले गेले आहे… म्हणजेच हिंदुस्तानचे हृदय होय.”
गॅझेटिअरमधील संदर्भ काय सांगतात?
१८८३-८४ च्या दिल्ली जिल्हा गॅझेटिअर मध्ये म्हटले आहे की, प्रचलित कथेनुसार या शहराच्या स्थापनेचे श्रेय पांडवांचे पूर्वज राजा दिलीप यांना दिले जाते. इ.स.च्या तिसऱ्या किंवा चौथ्या शतकात राजा धव यांनी प्रसिद्ध लोखंडी स्तंभ उभारला होता.
वासुकीच्या डोक्यावर टेकलेला स्तंभ
गॅझेटिअरमध्ये पुढे म्हटले आहे की, “इतर परंपराही या स्तंभाच्या निर्मितीला बिलन देव किंवा अनंगपाल या तोमर (टुनवार) वंशाच्या संस्थापक राजाशी जोडतात, तो आठव्या शतकात राज्य करीत होता.” असं सांगितलं जातं की, एका विद्वान ब्राह्मणाने राजाला सांगितलं होतं की, लोखंडी स्तंभाचा पाया इतका खोल जमिनीत गेला आहे की, तो पृथ्वीला आधार देणाऱ्या सर्पराज वासुकीच्या मस्तकावर टेकला आहे. त्यामुळे हा स्तंभ कधीही हलणार नाही आणि जोपर्यंत तो उभा आहे, तोपर्यंत राज्य त्याच्या वंशातच राहील.
राजाला या ब्राह्मणाच्या विधानाबद्दल शंका आली आणि त्याने स्तंभ काढून पाहण्याचा आदेश दिला. स्तंभ उचलल्यानंतर त्याचा पाया रक्ताने ओला झाल्याचे आढळले, ते रक्त सर्पराज वासुकीचे होते, असे मानले जाते. नंतर स्तंभ पुन्हा उभारण्यात आला; पण राजाच्या त्या संशयामुळे त्याला पुन्हा घट्ट उभा करण्याची कोणतीच योजना यशस्वी ठरली नाही. कितीही प्रयत्न केले तरी स्तंभ सैल (ढिला) राहिला आणि ‘धिली’ या नावाची उत्पत्ती याच घटनेतून झाली असे म्हटले जाते.
The eternal city of Athens of Pericles
या शहराच्या दीर्घ इतिहासात या शहराला अनेक नावांनी ओळखले गेले आहे. प्रसिद्ध पुरातत्त्व तज्ञ जनरल कनिंगहॅम यांना एका ठिकाणी या शहराचे नाव ‘दिल्लीपूर’ असे लिहिलेले आढळले. दिल्लीची तुलना अनेकदा अथेन्सच्या सुवर्णकाळातील ‘The eternal city of Athens of Pericles-परिक्लीजच्या शहराशी’ केली जाते, पण कोणीही कधी या शहराचे नाव ग्रीसच्या त्या महान प्रतीकावरून ठेवावे, अशी मागणी केली नाही. त्यामुळे जुने नाव आजही टिकून आहे.
आग्रा शहराचा इतिहास
दिल्लीचे जुळं शहर असलेल्या आग्रा शहराचा इतिहास हा अकबराशी संबंधित असल्याने या शहराचे नाव ‘अकबराबाद’ पुन्हा ठेवावे, अशी मागणी करण्यात आली होती. परंतु इतर ऐतिहासिक नोंदी सांगतात की, या मध्ययुगीन शहराची स्थापना निजाम खान सिकंदर लोदी याने केली. असं सांगितलं जातं की सुलतानाने, दिल्लीऐवजी नवीन शहर वसवण्यासाठी योग्य जागा शोधताना आपल्या वझिरासह यमुनेतून होडीतून प्रवास केला. वझिराने एका ठिकाणी बोट दाखवत ती जागा सुचवली, परंतु सुलतान म्हणाला, “नाही, ते ठिकाण जे पुढे आहे… ‘आगर’ आहे.” त्यामुळे त्या शहराचे नाव ‘आग्रा’ पडले.
गुरगांव ते गुरुग्राम
NCR क्षेत्रातील इतर काही ठिकाणांचीही नावे बदलण्यात आली आहेत. उदाहरणार्थ, ‘गुळासाठी’साठी प्रसिद्ध असलेल्या गुरगांवचे नाव बदलून ‘गुरुग्राम’ ठेवले गेले, या ठिकाणी पांडव आणि कौरवांचे गुरु ‘द्रोणाचार्य’ यांना ‘गुरुदक्षिणा’ देण्यात आली होती, म्हणून या स्थळाला गुरुग्राम असे नाव दिले. मुघलसरायचे नावही बदलले गेले आहे आणि जुनं ‘बॉम्बे’ आता ‘मुंबई’ झालं आहे. दिल्ली कॉलेजचे नावही बदलून ‘जाकिर हुसेन कॉलेज’ करण्यात आले, परंतु नंतर सावधगिरीचा उपाय म्हणून त्याचे नाव ‘जाकिर हुसेन दिल्ली कॉलेज’ असे ठेवण्यात आले. त्यामुळे ‘दिल्ली’ हे नाव अधिकृतपणे तसेच राहू द्यावे आणि बोलचालीत ती ‘दिली’ म्हणूनच ओळखली जावी, असे अभ्यासक सांगतात.
