चीनमधील बालकांमध्ये ‘एच९एन२’ (एव्हियन इन्फ्लूएंझा व्हायरस) आणि श्वसनविकार यांचा उद्रेक झाला असून करोनासारखाच या आजारांचा प्रसार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गूढ न्यूमोनिया असलेला हा आजार चीनच्या उत्तर भागामध्ये पसरलेला असून अनेक बालकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा आजार नेमका काय आहे, जागतिक आरोग्य संघटनेचे यावर काय मत आहे आणि खरोखर जागतिक चिंता करण्यासारखे आहे काय याचा आढावा…
चीनमध्ये पसरलेला नवा आजार काय आहे?
चीनच्या उत्तर भागात बालकांमध्ये श्वसनाचे विकार वाढल्यानंतर याबाबत माहिती देण्यासाठी चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने नुकतीच पत्रकार परिषद घेतली. उत्तर चीनमधील शैक्षणिक संस्थांमधून गूढ न्यूमोनियाचा उद्रेक झाल्याचे त्यांनी सांगितले. करोनासारखाच हा श्वसनविकार असून अनेक बालकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चीनमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या श्वसनविकारवाढीचा संबंध इन्फ्लूएंझा, मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया, बॅक्टेरियाचा संसर्ग यांच्याशी जोडला असून हा आजार विशेषत: लहान मुलांना होतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार बालकांमध्ये श्वसन आणि न्यूमोनियाशी संबंधित आजार आढळून आले आहेत, मात्र त्याची लक्षणे न्यूमोनियापेक्षा वेगळी आहेत. मुलांमध्ये तीव्र ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास आदी लक्षणे दिसून येतात. काही मुलांमध्ये फुप्फुसाला सूज येणे, तीव्र ताप आणि श्वसनविकारांसबंधी अन्य लक्षणेही दिसून आली आहेत. चिनी अधिकाऱ्यांनी आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्याचे आवाहन केले आहे. ऑक्टोबर महिन्यात उत्तर चीनमध्ये गेल्या तीन वर्षांच्या याच कालावधीच तुलनेत इन्फ्लूएंझासारख्या आजारांमध्ये अधिक वाढ झाली आहे.
हेही वाचा : 15 years of 26/11: मुंबई दहशतवादी हल्ल्याने भारताच्या पायाभूत सुरक्षा सुविधा कशा बदलल्या?
चीनमध्ये काय परिस्थिती आहे?
स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार चीनमधील बीजिंग आणि लिओनिंग येथील रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात बालकांना दाखल केले जात आहे. अनेक रुग्णालयांनी बालकांसाठी विशेष कक्षांची उभारणी केली आहे. अनेक रुग्णालये बालरुग्णांनी ओसंडून वाहत असून रुग्णशय्या अपुऱ्या पडत आहेत. या गूढ न्यूमोनियामध्ये वाढ होत असल्याने काही शहरांमध्ये शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. जर या आजाराचा प्रसार वेगाने झाला तर उत्तर चीनमध्ये सर्व शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे स्थानिक प्रशासनाने सांगितले. साथीच्या आजारांकडे लक्ष देणाऱ्या ‘प्रो-मेड’ या संस्थेने उत्तर चीनमध्ये नवा आजार मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे सांगितले. मात्र चिनी प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचे सांगितले. चीनच्या प्रशासनाकडून महासाथ जाहीर केली नसून याबाबतची आकडेवारी लपवत असल्याचे ‘प्रो-मेड’ने सांगितले.
जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे काय?
हा आजार समोर येताच जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) सक्रिय झाली आहे. डब्ल्यूएचओने चीनला यावर लक्ष ठेवण्याचे आणि अधिकाधिक तपशीलवार माहिती सादर करण्याचे निर्देश दिले. श्वसोच्छवासाच्या आजारांमध्ये वाढ आणि मुलांमध्ये होणारे श्वसनविकार याची अधिकृत आकडेवारी सादर करण्याचेही डब्ल्यूएचओने चीनला सांगितले आहे. सार्वजनिक आरोग्य सल्लागार जारी करून रुग्णांच्या संपर्कात इतर लोकांनी येऊ नये यासाठी पावले उचलावीत. चीनच्या आरोग्य यंत्रणाांनी या आजारांविरुद्ध केलेल्या उपाययोजनांचे पालन करण्याचे डब्ल्यूएचओने चिनी नागरिकांना सांगितले आहे. नवा आजार झालेल्या रुग्णांपासून अंतर राखणे, आजारी असल्यास घरीच राहणे आणि मुखपट्टी वापरणे आदी नियमांचे पालन करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. ‘’डब्ल्यूएचओ‘ने केलेल्या एकूण जोखीम मूल्यमापनात त्यांच्याकडे आतापर्यंत नोंदवलेल्या ‘एच९एन२’च्या प्रकरणांमध्ये एका मानवाकडून दुसऱ्या मानवाकडे संसर्ग पसरण्याची शक्यता खूप कमी आहे. त्याशिवाय या आजारांमुळे मृत्यू होण्याचे प्रमाणाही कमी आहे. करोना आजार सर्व देशभर पसरत असताना चीनच्या अधिकाऱ्यांनी दाखवलेला मोकळेपणा आणि सहकार्याच्या अभावाबाबत डब्ल्यूएचओने वारंवार चिंता व्यक्त केली होती. त्यामुळे हा आजार जगभर पसरू नये यासाठी डब्ल्यूएचओने आताच पावले उचलायला सुरुवात केली आहे.
हेही वाचा : Mumbai 26/11 Attacks: …आणि तुकाराम ओंबळे शहीद झाले! गड आला पण सिंह गेला…!
चीनच्या प्रशासनाचे काय मत आहे?
नव्या आजारामध्ये कोणतेही असमान्य आणि नवीन विषाणू आढळले नसल्याची माहिती चीनने डब्ल्यूएचओला दिली. चिनी प्रशासनाने फ्लूसारख्या आजारांमध्ये वाढ झाल्याचे श्रेय करोना प्रतिबंध हटविण्याला दिले. स्थानिक प्रशासनाने रुग्णालये बालरुगणांनी भरून गेल्याचे वृत्त दिले असले तरी याबाबतची कोणतीही आकडेवारी जाहीर केली नाही. देशाच्या उत्तर भागात पसरणाऱ्या श्वसनाच्या आजारांमध्ये वाढ ही अनेक ज्ञात विषाणूंमुळे झाली आहे. मात्र परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे, असे चीन सरकारकडून सांगण्यात आले. मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया आणि इन्फ्लूएंझा फ्लूच्या वाढत्या प्रकरणांमुळे घाबरण्याची गरज नसून ही जागतिक चिंता नसल्याचेही चीनकडून सांगण्यात आले. डब्ल्यूएचओने चीनकडे नव्या आजारांबाबत माहिती आणि आकडेवारी मागितल्यानंतर चीनने ही माहिती दिली.
भारत सरकारने काय भूमिका घेतली?
चीनमध्ये ‘एच९एन२’ आणि श्वसनविकार यांचा उद्रेक झाल्याने करोनासारखाच या आजारांचा प्रसार होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मात्र या आजाराचा भारताला धोका कमी असून भीती बाळगण्याचे कारण नाही, असे भारताच्या आरोग्य विभागाने सांगितले. केंद्र सरकारचे याकडे बारकाईने लक्ष आहे. या आजारामुळे आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्याविरोधात लढा देण्यास तयार असल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले.
sandeep.nalawade@expressindia.com