Pakistan Asim Munir Spews Venom Against India : पहलगाम येथील दहशतवादी सूड म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर राबवीत पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अनेक अड्डे उद्ध्वस्त केले. या कारवाईला पाकिस्तानने सुरुवातीला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला; पण भारतीय लष्कराने तो यशस्वीरित्या हाणून पाडला. ऑपरेशन सिंदूरनंतर भेदलेल्या पाकिस्तानने भारताच्या लष्करप्रमुखांना फोन केला आणि त्यांच्यासमोर युद्धविरामाची झोळी पसरवली. या घटनेला काही दिवस लोटल्यानंतर पाकिस्तानकडून पुन्हा एकदा भारताविरोधात कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर हे चिथावणीखोर भाषणं करून दहशतवादाला खतपाणी घालताना दिसून येत आहेत. त्यांच्या विखारी भाषणांमुळे दोन्ही देशांमधील संबंध आणखीच ताणले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, नेमके काय म्हणाले असीम मुनीर? ते जाणून घेऊ…

पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी भारताविरोधात विखारी वक्तव्य करीत द्वेष पसरविण्याचा प्रयत्न केला. कराचीत नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना मुनीर यांनी कोणतेही ठोस पुरावे न देता भारतावर जम्मू-काश्मीरमधील तणाव वाढवण्याचा आरोप केला. त्यांच्या या चिथावणीखोर भाषणामुळे पाकिस्तानकडून भारतावर पुन्हा हल्ला करण्याचा कट रचला जातोय का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. विशेष बाब म्हणजे, मुनीर यांनी यापूर्वी काश्मीरला पाकिस्तानच्या गळ्याची नस म्हणून संबोधलं होतं. गुप्तचर यंत्रणांच्या मते, त्यांच्या या वक्तव्यानंतरच काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. आता पाकिस्तानी लष्कर प्रमुखांकडून पुन्हा एकदा बेताल वक्तव्ये केली जात आहेत.

नेमके काय म्हणाले असीम मुनीर?

  • कराचीमध्ये बोलताना मुनीर यांनी जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादाचं उदात्तीकरण केलं.
  • पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांना न्यायासाठी संघर्ष असं म्हणत त्यांनी दहशतवादाचं समर्थन केलं.
  • पाकिस्तानने दोनदा कोणतीही चिथावणी न देता भारताकडून झालेल्या हल्ल्यांचा सामना केला, असं मुनीर म्हणाले.
  • भारताच्या धोरणांवर टीका करताना मुनीर यांनी काश्मीरमध्ये होणाऱ्या हिंसेची पाठराखण केली आहे.
  • भारताने आक्रमक पवित्रा घेतल्यास पाकिस्तानकडून पुन्हा कडक प्रत्युत्तर दिलं जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
  • काश्मीरचा मुद्दा उपस्थित करताना मुनीर म्हणाले की, तेथील जनतेचीही पाकिस्तानमध्ये सामील होण्याची इच्छा आहे.
  • जर भारताने या क्षेत्रात तणाव वाढला तर त्याचा वाईट परिणाम होईल अशी धमकी मुनीर यांनी दिली.
  • आपल्याला भारताविरोधात लढणाऱ्या काश्मीरी भावांची कुर्बानी लक्षात ठेवावी लागेल, अशी गरळही त्यांनी ओकली.
  • पाकिस्तानला जम्मू व काश्मीरमध्ये फक्त शांतताच हवी असल्याचा खोट्या थापाही मुनीर यांनी त्यांच्या भाषणात मारल्या.

आणखी वाचा : पाकिस्तान नैसर्गिक आपत्तीच्या छायेत; दोन दिवसांतच ३२ जण ठार; विनाशाची कारणे कोणती?

मुनीर हे भारताविरोधात गरळ का ओकत आहेत?

‘CNN-News18’च्या वृत्तानुसार भारतातील वरिष्ठ गुप्तचर अधिकाऱ्यांचं असं मत आहे की, असीम मुनीर यांची वक्तव्यं ही शांत असलेल्या काश्मीरमध्ये हिंसा घडवून आणण्याची आहे. त्याशिवाय पाकिस्तानच्या नौदलावर अधिक नियंत्रण मिळवण्यासाठी आणि लष्करात वर्चस्व टिकवण्यासाठी ते भारतविरोधी वातावरण तयार करीत आहेत. गुप्तचर अधिकाऱ्यांनी असंही म्हटलं की, “मुनीर यांच्या महत्त्वाकांक्षा केवळ लष्करापुरत्याच मर्यादित नाहीत, तर त्यांच्या कृती आणि वक्तव्ये पाकिस्तानमधील राजकारण्यांसाठी इशाराही आहे. भारतविरोधी भूमिका घेऊन ते आपली सत्ता अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानची नाचक्की झाल्यामुळे तेथील लोक सरकावर नाराज असल्याचं सांगितलं जात आहे. त्यांना खूश करण्यासाठी मुनीर हे अशा प्रकारची बेताल विधान करीत असतील, असं भारताच्या एका माजी लष्करी अधिकाऱ्याने म्हटलं आहे.

Pakistan Army Chief Asim Munir (PTI Photo)
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ व लष्करप्रमुख असीम मुनीर (छायाचित्र पीटीआय)

मुनीर यांच्या विधानानंतर भारताकडून सतर्कता

मुनीर यांच्या चिथावणीखोर विधानांमुळे भारतीय गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. अमरनाथ यात्रा आणि काश्मीरमध्ये होणाऱ्या इतर महत्त्वाच्या कार्यक्रमांवर यंत्रणांकडून करडी नजर ठेवली जात आहे. मुनीर यांच्या विधानामुळे पाकिस्तान समर्थित दहशतवादी गैरकृत्य करू शकतात. स्लीपर सेल आणि दहशतवाद्यांचे म्होरके त्यांच्या विधानाला भारतावरील हल्ल्याचे संकेत मानू शकतात. पाकिस्तानने गेल्या काही वर्षांपासून भारतात दहशतवादी हल्ले घडवून आणले आहेत. त्यांच्या या हल्ल्यांना भारतीय लष्करानेही चोख प्रत्युत्तर दिलं आहे. उरी सर्जिकल स्ट्राईक, बालाकोट एअर स्ट्राईक आणि ऑपरेशन सिंदूर ही त्याची उदाहरणे आहेत. मात्र, असं असलं तरी असीम मुनीर यांच्या भाषणाला फक्त एक राजकीय विधान समजून दुर्लक्ष करून चालणार नाही. भारताने सतर्कता बाळगली पाहिजे, असं मत काही विश्लेषक व्यक्त करीत आहेत.

हेही वाचा : DAP Fertilizer Shortage : खरीप हंगामात डीएपी खताची टंचाई; चीनमुळे शेतकरी कसे अडचणीत आले?

पहलगाम दहशतवादी हल्ला व भारताचे प्रत्युत्तर

२२ एप्रिलच्या दुपारी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील बैसारन व्हॅली (जी ‘मिनी स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखली जाते) येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अचानक गोळीबार केला. या भ्याड हल्ल्यात २५ निष्पाप भारतीयांना आपले प्राण गमावे लागले. पोलिसांच्या माहितीनुसार, मृतांमध्ये २५ भारतीय पर्यटक आणि नेपाळच्या एका नागरिकाचा समावेश होता. हा दहशतवादी हल्ला २००८ मधील मुंबईवरील हल्ल्यानंतर दुसरा मोठा हल्ला होता. २६/११ च्या दहशतवादी हल्लात १६० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारताने ६ आणि ७ मेच्या रात्री ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवीत पाकिस्तान आणि पाकिस्तान-व्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे अनेक अड्डे उद्ध्वस्त केले. यानंतर पाकिस्तानने ८, ९ आणि १० मे रोजी भारताच्या लष्करी तळांवर हल्ल्याचा प्रयत्न केला; पण भारतीय लष्कराने तो यशस्वीरित्या हाणून पाडला आणि पाकिस्तावर प्रतिहल्ला करून त्यांच्या हवाई तळांचे नुकसान केले. या कारवाईनंतर भेदलेल्या पाकिस्तानने भारतीय लष्करप्रमुखांना फोन लावला आणि युद्धविरामाची विनंती केली. त्यानंतर भारताने पुढील कारवाई टाळण्याचा निर्णय घेतला.