Taliban Response to Pakistan Strikes : आठ दिवसांच्या रक्तरंजित संघर्षानंतर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये गुरुवारी तात्पुरता युद्धविराम झाला. दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी कतार व तुर्कस्तानने पुढाकार घेतल्याचे पाहायला मिळाले. शनिवारी दोहा येथील एका बैठकीत काही मुद्द्यांवरून त्यांच्यात वाटाघाटीही झाल्या. यादरम्यान पाकिस्तानने तात्पुरत्या युद्धविरामाचे उल्लंघन करून अफगाणिस्तानवर हल्ला केल्याचा आरोप तालिबान सरकारने केला आहे. पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यांना जशास तसे प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. दरम्यान, भारताशेजारील या दोन देशांत पुन्हा युद्ध भडकल्यास कुणाचे नुकसान जास्त होणार? त्या संदर्भातील हा आढावा…
फ्रान्सच्या ‘एएफपी’ वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने शुक्रवारी रात्रीच्या सुमारास अफगाणिस्तानच्या पक्तिका प्रांतावर हवाई हल्ले केले. या हल्ल्यांत १० जणांचा जागीच मृत्यू झाला; तर डझनभर नागरिक जखमी झाले. मृतांमध्ये अफगाणिस्तानच्या स्थानिक क्रिकेट क्लबमधील तीन तरुण खेळाडूंचाही समावेश आहे. या ताज्या हल्ल्यांवर तालिबान सरकारने संताप व्यक्त केला असून, पाकिस्तानवर प्रतिहल्ला करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
पाकिस्तान-अफगाणिस्तानमध्ये युद्ध कसे भडकले?
पाकिस्तानच्या हवाई दलाने ९ ऑक्टोबर रोजी अफगाणिस्तानच्या काही प्रांतावर हवाई हल्ले केले होते. तहरीक-ए-अफगाणिस्तान पाकिस्तान (टीटीपी) या दहशतवादी संघटनेच्या तळांना उद्ध्वस्त करण्यासाठी हे हल्ले करण्यात आल्याचे पाकिस्तानकडून सांगण्यात आले. गेल्या दशकभरापासून या दहशतवादी संघटनेने पाकिस्तानमध्ये दहशत माजवली आहे. टीटीपीच्या हल्ल्यांत आपल्या देशातील हजारो निष्पाप लोकांना आपले प्राण गमावावे लागले, असा आरोप पाकिस्तानकडून केला जात आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकार सत्तेत आल्यापासून टीडीपीला अधिक बळ मिळाल्याचा संशय पाकिस्तानला आहे.
आणखी वाचा : MNS Maha Vikas Aghadi Alliance : राज ठाकरे यांच्या मनसेपासून काँग्रेस का ठेवतेय दुरावा? कारण काय?
पाकिस्तानच्या हल्ल्यांना तालिबानचे प्रत्युत्तर
दरम्यान, पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून तालिबान सरकारने त्यांच्यावर प्रतिहल्ला केला. या हल्ल्यात पाकिस्तानचे ५८ सैनिक ठार झाल्याचा दावा अफगाणिस्तानने केला. पाकिस्तानने मात्र हा दावा फेटाळून लावत केवळ एका जवानाचा मृत्यू झाल्याची कबुली दिली. त्यानंतर तालिबानने आपले ऑपरेशन यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याचे जाहीर करून तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तालिबानी लष्कराच्या हल्ल्यांनी चवताळून उठलेल्या पाकिस्तानने दुसऱ्याच दिवशी अफगाणिस्तानवर पुन्हा हल्ला केला. या हल्ल्यात २०० हून अधिक तालिबानी सैनिक मारले गेल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात आला. त्याशिवाय चकमकींत आपल्या २३ सैनिकांना प्राण गमावावे लागल्याची माहिती त्यांनी माध्यमांना दिली.
दोन्ही देशांमध्ये वाद सोडवण्याचे प्रयत्न
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील वाद विकोपाला गेल्यानंतर कतार व तुर्कस्तानने या वादात मध्यस्थी करण्याची भूमिका घेतली. आठवडाभराच्या रक्तरंजित संघर्षानंतर गेल्या गुरुवारी दोन्ही देशांनी तात्पुरत्या युद्धविरामावर सहमती दर्शवली. शनिवारी दोहा येथील आयोजित एका बैठकीत पाकिस्तान व अफगाणिस्तानमध्ये काही वाटाघाटीही झाल्या. त्यायादरम्यान पाकिस्तानने तात्पुरत्या युद्धविरामाचे उल्लंघन करून अफगाणिस्तानवर हल्ला केल्याचा आरोप तालिबान सरकारने केला आहे. या हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशाराही त्यांच्याकडून देण्यात आला आहे.
अफगाणिस्तान खरोखर प्रतिहल्ला करू शकते?
अफगाणिस्तानने प्रतिहल्ला करण्याचा इशारा दिला असला तरी पाकिस्तानच्या तुलनेत त्यांची लष्करी क्षमता खूपच कमी आहे. २०२१ मध्ये अमेरिकन सैनिकांनी अफगाणिस्तानमधून माघार घेतल्यानंतर तालिबानच्या हाती मोठा शस्त्रसाठा लागला होता. मात्र, पाकिस्तानकडे त्याहूनही मोठा शस्त्रसाठा असल्याचे सांगितले जात आहे. त्याशिवाय पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी अफगाणिस्तानकडे कोणतीही प्रभावी क्षमता नसल्याचे दिसून येत आहे. तालिबान सरकारला अद्याप आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवण्यात यश आलेले नाही. भारत आणि चीनसारख्या देशांबरोबर त्यांचे संबंध मजबूत झाले असले तरीही युद्धाच्या वेळी हे दोन्ही देश त्यांच्या मदतीला धावून जाण्याची शक्यता कमी आहे.
हेही वाचा : निवडणूक बिहारची, पण चर्चा मात्र एकनाथ शिंदेंची; कारण काय? कन्हैया कुमार यांनी काय सांगितलं?
तालिबान सरकारला नेमकी कशाची भीती?
अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था सध्या ढासळलेली असल्याने त्यांना युद्ध परवडणारे नाही, असे एका आंतरराष्ट्रीय विश्लेषकाने सांगितले. त्यातच अफगाणिस्तानचा बराच आंतरराष्ट्रीय व्यापार पाकिस्तानमधून चालत असल्याने तालिबान सरकारवर दबाव आहे. पाकिस्तानने व्यापारी मार्ग बंद केल्यास अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था आणखीच कमकुवत होण्याची शक्यता आहे. तरीदेखील तालिबान सरकार पाकिस्तानच्या हल्ल्यांकडे दुर्लक्ष करू शकत नाही. कारण- त्यांना एक सार्वभौम राष्ट्र म्हणून स्वतःचे अस्तित्व आणि स्वतंत्र परराष्ट्र धोरण सिद्ध करायचे आहे. पाकिस्तानच्या मागणीपुढे बिनशर्त झुकल्यास आपल्याकडे मांडलिक राज्य म्हणून पाहिले जाईल, अशी भीती तालिबान सरकारला आहे.
युद्ध झाल्यास पाकिस्तानचेही होणार मोठे नुकसान
अफगाणिस्तानकडे पाकिस्तानपेक्षा कमी लष्करी बळ असले तरी त्यांचे सैन्य डावपेच आखण्यात पटाईत आहे. त्यामुळे दोन्ही देशांत पुन्हा युद्ध भडकल्यास पाकिस्तानलाही मोठे नुकसान सहन करावे लागू शकते, असा अंदाज विश्लेषकांनी बांधला आहे. तहरीक-ए-अफगाणिस्तान पाकिस्तान या दहशतवादी संघटनेमुळे पाकिस्तानचे आधीच मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे तालिबान सरकारबरोबर युद्ध करणे त्यांनाही परवडणारे नाही. या पार्श्वभूमीवर दोहा येथील बैठकीत निघालेल्या तोडग्यांचे दोन्ही देश किती पालन करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.