Pakistan test-fires ballistic missile as tensions with India rise: अब्दाली हे नाव एका क्षेपणास्त्राला देऊन पाकिस्तानने भारतीयांच्या आणि तेही विशेषतः मराठी माणसाच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. अलीकडेच, ३ मे रोजी पाकिस्तानने (Abdali Weapon System) अब्दाली क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. ही चाचणी ‘एक्स -इंडस’ या प्रशिक्षण मोहिमेचा भाग होती. सैन्यदलांची कार्यक्षमता तपासणे तसेच क्षेपणास्त्राच्या प्रगत तंत्रज्ञानाची हाताळणी करणे या चाचणीचा उद्देश होता, असे पाकिस्तान सरकारच्या एक्स (X) हँडलवर पोस्ट करण्यात आले आहे.

अब्दाली शस्त्र प्रणाली म्हणजे नेमके काय?

अब्दाली शस्त्र प्रणाली हे पाकिस्तानचे लघुपल्ल्याचे क्षेपणास्त्र (Short-Range Ballistic Missile – SRBM) आहे. याची मारक क्षमता साधारणतः १८० ते २०० किमी या दरम्यान आहे. हे क्षेपणास्त्र जमिनीवरून जमिनीवर मारा करण्यासाठी विकसित करण्यात आले आहे आणि पाकिस्तानच्या अण्वस्त्र वाहक क्षेपणास्त्रांच्या यादीतील एक महत्त्वाचे अस्त्र आहे.

बॅलास्टिक क्षेपणास्त्र

पाकिस्तानने या शस्त्र प्रणालीची चाचणी २००२ साली सर्वप्रथम केली होती. Abdali Weapon System ही Hatf-II Abdali या नावानेही ओळखले जाते. या प्रकारच्या क्षेपणास्त्रांचा उद्देश शत्रूच्या जवळच्या लक्ष्यांवर अचूक हल्ला करणे असतो. अब्दाली हे एक बॅलास्टिक क्षेपणास्त्र आहे. हे असे क्षेपणास्त्र आहे, जे आपल्या लक्ष्याकडे जाण्यासाठी एखाद्या मारक तंत्रप्रणालीचा वापर करत गतीचा प्राप्त करते. प्रवासाच्या केवळ सुरुवातीच्या अल्प कालावधीतच रॉकेटद्वारे या क्षेपणास्त्राचा मारा केला जातो.

दिल्लीतल्या एका अधिकाऱ्याने The Indian Express शी बोलताना सांगितले, ही पाकिस्तानने भारताविरुद्ध केलेली एक बेजबाबदार आणि आततायी कृती असून, त्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढण्याचाच धोका अधिक आहे.

भारताची प्रतिक्रिया

ज्या लष्करी सरावादरम्यान हे क्षेपणास्त्र चाचणीसाठी वापरले गेले त्याला Exercise Indus असे नाव देण्यात आले होते.

The Indian Express च्या वृत्तानुसार, ही चाचणी सोनमियानी रेंजमध्ये घेण्यात आली आणि ती Army Strategic Forces Command (ASFC) अंतर्गत घेण्यात आलेली कार्यशील वापरकर्ता चाचणी (operational user trial) होती. ही यंत्रणा पाकिस्तानच्या अण्वस्त्र- सक्षम क्षेपणास्त्रांची जबाबदारी सांभाळते. पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतचा इंडस वॉटर ट्रीटी (सिंधू जलवाटप करार) स्थगित केला. याचबरोबर भारताने आणखीही काही उपाययोजना करत पाकिस्तानची कोंडी केली आहे. चिनाबवरील बागलिहार धरणातून जाणाऱ्या पाण्याचा प्रवाह रोखणे, पाकिस्तानी उत्पादनांची आयात थांबवणे, पाकिस्तानी मालकीच्या जहाजांना भारतीय बंदरांमध्ये मज्जाव करणे आणि सर्व पत्रव्यवहार व पार्सल्सची देवाणघेवाण स्थगित करणे या सारख्या गोष्टींचा त्यात समावेश आहे.

हे क्षेपणास्त्र कसे काम करते?

The Center for Arms Control and Non-Proliferation (non-profit) या अमेरिकन संस्थेच्या माहितीनुसार, “अग्निबाणातील इंधन जळेपर्यंत क्षेपणास्त्राचा पहिल्या टप्प्यातील प्रवास होत राहातो. ज्वलन थांबल्यानंतरही काही काळ हा प्रवास सुरू राहातो. पहिला टप्पा अनेकदा तीन ते चार मिनिटांचा असतो. दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्वलन थांबल्यानंतही क्षेपणास्त्र गतीज ऊर्जेमुळे त्याच्या सर्वोत्तम उंचीपर्यंत पोहोचते आणि नंतर त्याचा प्रवास परत एकदा जमिनीवरील लक्ष्याच्यादिशेने सुरू होतो ” अंतिम टप्पा किंवा टर्मिनल फेजमध्ये (Terminal Phase) क्षेपणास्रातील प्रत्यक्ष स्फोटक भाग वेगळा होतो आणि लक्ष्यावर आदळतो.

‘अब्दाली’ नावाचे महत्त्व काय?

Dawn या पाकिस्तानी वृत्तपत्रानुसार, अब्दाली क्षेपणास्त्राची पहिली चाचणी २००१-०२ मध्ये झाली होती. या क्षेपणास्त्राचे नाव अहमद शहा अब्दाली या अफगाण शासकावरून ठेवले आहे. अब्दालीने १८ व्या शतकात अनेक वेळा भारतावर आक्रमण केले होते. पाकिस्तानमध्ये आपली क्षेपणास्त्रे भारतावर आक्रमण करणाऱ्या मुस्लिम शासकांच्या नावाने ठेवण्याची परंपरा आहे. पानिपतच्या तिसऱ्या युद्धात (१७६१) अब्दालीने मराठ्यांवर विजय मिळवला. पाकिस्तानमध्ये अब्दालीला इस्लामी सामर्थ्याचे प्रतीक आणि ऐतिहासिक नायक म्हणून गौरवले जाते. अब्दालीव्यतिरिक्त, पाकिस्तानकडे गझनवी क्षेपणास्त्रे (महमूद गझनीच्या नावाने), घोरी क्षेपणास्त्र (मोहम्मद घोरीच्या नावाने) आणि बाबर क्षेपणास्त्र (पहिला मुघल सम्राट झहीर-उद-दिन बाबरच्या नावाने) अशी क्षेपणास्त्रे आहेत.

थोडक्यात, अब्दाली शस्त्र प्रणाली म्हणजे पाकिस्तानचे लघुपल्ल्याचे क्षेपणास्त्र असून, हे भारतासारख्या जवळच्या शत्रूंना लक्ष्य करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. ‘अब्दाली’ हे नाव ऐतिहासिक दृष्टिकोनातून इस्लामी साम्राज्याच्या विस्ताराचे प्रतिक म्हणून वापरले आहे.