ख्वाजा आसिफ यांनी पहिल्यांदाच अशा प्रकारे विनोदी दावे केलेले नाहीत. निराधार आणि तथ्यहीन विधाने करण्याचा त्यांचा इतिहास आहे.
‘मुघल सम्राट औरंगजेबाच्या राजवटीतच केवळ भारत एकसंध होता.’ अशा प्रकारे ऐतिहासिकदृष्ट्या निराधार आणि विनोदी विधान पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी केले. पाकिस्तानने जर त्यांच्या भूमीत दहशतवादाला पाठिंबा दिला तर त्यांना भौगोलिक अस्तित्व गमवावे लागेल, असा इशारा भारताने दिल्यानंतर आसिफ यांनी अशा प्रकारे मुक्ताफळे उधळली. आसिफ यांच्या या वक्तव्याबाबत…
पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचा दावा
पाकिस्तानच्या समा टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत तेथील संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी अनेक प्रकारची मुक्ताफळे उधळून चिथावणीखोर विधाने केली. मुघल सम्राट औरंगजेबाच्या राजवटीशिवाय भारत कधीही खऱ्या अर्थाने एकसंध नव्हता, असा निराधार दावा त्यांनी केला. ‘‘इतिहास असे दर्शवितो की भारत कधीही एकसंध राष्ट्र नव्हते, अर्थात औरंगजेबाच्या कारकीर्दीशिवाय. औरंगजेबाच्या राजवटीत भारतामध्ये ऐक्य दिसून आले,’’ असे विधान आसिफ यांनी केले. त्यांच्या या विधानाला मूलभूत ऐतिहासिक तथ्यांचा आधार नसला तरी केवळ चिथावणी देण्यासाठी त्यांनी अशा प्रकारचे बेजबाबदार विधान केले. पाकिस्तानने आपल्या भूमीत दहशतवादाला आधार दिला आहे. पाकिस्तानने जर दहशतवादाला पाठिंबा देणे सोडले नाही, तर जगाच्या नकाशात पाकिस्तानचे अस्तित्व राहणार नाही, असा इशारा भारताने गेल्याच आठवड्यात दिल्यानंतर प्रत्युत्तर म्हणून आसिफ यांनी अशा प्रकारे मुक्ताफळे उधळली.
युद्धाची धमकी
वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पाकिस्तानी संरक्षणमंत्री आसिफ यांनी आणखी काही निराधार दावे केले. भारताशी युद्धाची शक्यता खरी आहे, असा दावाही त्यांनी केला. मला युद्धात वाढ नको आहे, परंतु युद्धाचा धोका खरा आहे हे मी नाकारत नाही. जर युद्धाचा प्रसंग आला तर अल्लाच्या इच्छेनुसार आम्ही पूर्वीपेक्षा चांगले परिणाम साध्य करू, असे आसिफ म्हणाले. पाकिस्तानची निर्मिती अल्लाच्या नावाने झाली, असे आसिफ सांगतात. देशांतर्गत आम्ही वाद घालतो, स्पर्धा करतो, परंतु भारताशी लढताना आम्ही नेहमीच एकत्र येतो. आता जर भारताने आक्रमण केले, तर त्याचे प्रत्युत्तर आम्ही जोरदारपणे देऊ, अशी मुक्ताफळे आसिफ यांनी उधळली.
याआधीचे विनोदी दावे
ख्वाजा आसिफ यांनी पहिल्यांदाच अशा प्रकारे विनोदी दावे केलेले नाहीत. निराधार आणि तथ्यहीन विधाने करण्याचा त्यांचा इतिहास आहे. जागतिक व्यासपीठांवर ते पाकिस्तानला लाज येईल, अशा प्रकारे वक्तव्ये करतात. गेल्या महिन्यात त्यांनी पाकिस्तानच्या पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी एक विचित्र उपाय सांगितला. सखल भागात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांनी पाणी नाल्यांमध्ये जाऊ देण्याऐवजी कंटेनरमध्ये साठवावे, असा सल्ला त्यांनी दिला. पुराकडे नागरिकांनी ‘आशीर्वाद’ म्हणून पाहावे, असेही ते म्हणाले. ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान भारताने नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्यानंतर त्यांनी पाकिस्तानात चुकीची माहिती पसरवली. ‘सीएनएन’ला दिलेल्या मुलाखतीत पाकिस्तानने भारतीय लढाऊ विमाने पाडल्याचा दावा त्यांनी केला. याबाबत पुरावा मागितला असता त्यांनी याचे श्रेय समाज माध्यमांना दिले. ‘‘केवळ पाकिस्तानच्याच नाही तर भारतीय समाज माध्यमांमध्ये याबाबत माहिती आहे. या विमानाचे आवशेष काश्मीरमध्ये पडले,’’ असा दावा करत खोट्या बातम्या पसरवण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
संयुक्त राष्ट्र परिषदेत गोंधळ
ख्वाजा आसिफ हे नुकतेच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सात वेळा गोंधळले. परिषदेच्या ‘एआय इनोव्हेशन डायलॉग’मध्ये बोलताना त्यांची अनेकदा ततफफ झाली. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (एआय) निर्माण होणाऱ्या आव्हानांबद्दल ते बोलले. परंतु युद्धात ‘एआय’च्या वापरावरील चर्चेत भारत-पाकिस्तान चकमकी आणि अलीकडच्या काळात भडकलेल्या घटनांचाही उल्लेख केला. ‘‘भारत आणि पाकिस्तानमधील अलीकडच्या काळात झालेल्या संघर्षात, पहिल्यांदाच एका अणुसज्ज देशाने दुसऱ्या देशाविरुद्ध लष्करी देवाणघेवाणीदरम्यान स्वायत्त शस्त्रे आणि हाय-स्पीड दुहेरी सक्षम क्रूझ क्षेपणास्त्रांचा वापर केला होता, ज्यामुळे एआय कोणते धोके निर्माण करू शकते हे दिसून येते,’’ असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. आधुनिक एआय-चालित युद्ध धोकादायक वाढ कशी घडवू शकते याची उदाहरणे म्हणून स्वायत्त शस्त्रे, हाय-स्पीड क्रूझ क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा वापर त्यांनी अधोरेखित केला. अनेक माहिती सांगताना आसिफ चुकीचे व निराधार बोलत होते.
sandeep.nalawade@expressindia.com