पाकिस्तान आणि सौदी अरेबिया यांच्यात नुकत्याच जाहीर झालेल्या संरक्षण सहकार्य कराराविषयी बोलताना पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी सौदी अरेबियाला संरक्षण तंत्रज्ञान आणि अण्वस्त्र कवच दिले जाईल असे नमूद केले होते. इस्लामी जगतामध्ये अण्वस्त्रे असलेला पाकिस्तान हा एकमेव देश आहे. झुल्फिकार अली भुत्तोंनी १९७०च्या दशकात भारताच्या अणुचाचण्यांनंतर पहिल्यांदा ‘इस्लामिक बॉम्ब’ असा शब्दप्रयोग केला होता. भारताच्या पाठोपाठ लगेचच त्या देशानेही अणुऊर्जेचा अण्वस्त्रांमध्ये परिवर्तन करण्याचे प्रयोग सुरू केले. पाकिस्तानी अण्वस्त्र कार्यक्रमाचे सूत्रधार अब्दुल कादिर खान यांच्या संशयास्पद संशोधनातून हे शक्य झाले. पण त्यावेळी, तसेच नंतरही इस्लामिक बॉम्ब संकल्पनेला सौदी अरेबियाने पाकिस्तानला मोठ्या प्रमाणात तेलपुरवठा करून पाठबळ दिले. आज हाच इस्लामिक बॉम्ब पाकिस्तान सौदी अरेबियाप्रमाणेच अरब आणि इस्लामी जगतातील इतर देशांनाही विकू इच्छित आहे.
पाकिस्तान आणि ‘इस्लामिक बॉम्ब’
१८ मे १९७४ रोजी भारताने पहिल्यांदा अणुचाचण्या घेतल्या. पोखरण येथे झालेला तो प्रयोग ‘स्मायलिंग बुद्धा’ म्हणून ओळखला गेला. कोणत्याही देशाच्या तंत्रज्ञान आणि संसाधन मदतीविना भारताने स्वबळावर, स्वबुद्धीवर हा चमत्कार करून दाखवला होता. मात्र त्यामुळे पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान झुल्फिकार अली भुत्तो अस्वस्थ झाले. १९७१च्या युद्धामध्ये भारताकडून दारूण पराभवाची नामुष्की पत्करावी लागल्यामुळे त्यांना प्रतिमासंवर्धनाची गरज होती. वाट्टेल त्या परिस्थितीत पाकिस्तानचा अणुबॉम्ब विकसित करायचाच, या महत्त्वाकांक्षेने त्यांना घेरले. ‘वेळ पडल्यास गवत खाऊ, झाडपाला खाऊन राहू किंवा उपाशी राहू. पण आमचा स्वतःचा बॉम्ब बनवणारच. ख्रिश्चन बॉम्ब आहे, ज्यू बॉम्ब आहे, आता हिंदू बॉम्ब आहे. मग इस्लामिक बॉम्ब का नको’, अशी गर्जना त्यांनी केली. ‘इस्लामिक बॉम्ब’ या संकल्पनेचा तो जन्म होता. कारण त्यावेळी मुस्लिम जगतातील इतर कोणत्याच देशाकडे अणुबॉम्ब नव्हता.
चोरट्या मार्गाने तंत्रज्ञान हस्तगत?
डॉ. अब्दुल कादिर खान यांना पाकिस्तानी अण्वस्त्र कार्यक्रमाचे जनक संबोधले जाते. मात्र त्यांनी चौरट्या मार्गानेच अणुबॉम्बचे आराखडे हस्तगत केले. १९७०च्या दशकात ते नेदरलँड्समधील युरेन्को या खासगी अणुइंधन कंपनीत नोकरीला होते. त्यांनी कराची विद्यापीठातून विज्ञानात पदवी आणि बर्लिन विद्यापीठातून मेटॅलर्जिकल इंजिनिअरिंगमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली. युरेन्को कंपनी युरोपिय अणुभट्ट्यांना समृद्ध युरेनियम पुरवायची, जे अणुबॉम्बसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या कंपनीतील नोकरीमुळे खान यांना अत्यंत गोपनीय कागदपत्रे, तंत्रज्ञान आणि आराखडे जवळून अभ्यासता येत होते. झुल्फिकार अली भुत्तो यांनी इस्लामिक बॉम्बची घोषणा करताच अब्दुल कादिर खान यांनी रहस्यमयरीत्या डच कंपनीतील नोकरीचा राजीनामा दिला आणि ते पाकिस्तानला रवाना झाला. पाकिस्तानला येताना त्यांनी अणुबॉम्बनिर्मितीचे आराखडे चोरून आणले असावेत, असा सार्वत्रिक संशय आहे. पुढे नेदरलँड्समधील एका न्यायालयाने खान यांना हेरगिरीबद्दल दोषी ठरवले. पण खान तोपर्यंत पाकिस्तानी लष्करी व्यवस्थेचे विश्वासू बनले होते.
सौदी अरेबियाचे पाठबळ
पाकिस्तान स्वतंत्र झाल्यानंतर काही वर्षांतच सौदी अरेबियाच्या राजघराण्याने तेथील सरकारशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केले होते. १९६०पासून सौदी अरेबियाकडून पाकिस्तानला मिळालेली आर्थिक मदत अरब जगताबाहेर सर्वाधिक होती. १९७४मध्ये सौदी राजे फैझल यांच्याकडे झुल्फिकार अली भुत्तो यांनी अणुबॉम्बसाठी आर्थिक मदतीची विनंती केली होती. ही विनंती सौदी अरेबियाने मान्य केली नाही, मात्र मदतीमध्ये कपातही केली नाही. १९९८मध्ये पाकिस्तानने प्रथम अणुचाचण्या घेतल्यानंतर अरब आणि इस्लामी जगतामध्ये या चाचण्यांचा उल्लेख कौतुकमिश्रित उत्सुकतेने इस्लामिक बॉम्ब असा जाहीरपणे केला जाऊ लागला. अब्दुल कादिर खान यांनी चोरट्या मार्गानेच यापूर्वी इराण, लिबिया या देशांना अण्वस्त्र तंत्रज्ञान पुरवले होते, पण अण्वस्त्रनिर्मितीची क्षमता आत्मसात केलेला पाकिस्तान हा पहिलाच इस्लामी देश ठरला. त्यावेळी अमेरिका आणि पाश्चिमात्य जगताने पाकिस्तानवर आर्थिक निर्बंध लादले. या निर्बंधांची झळ पाकिस्तानला पोहोचली नाही, कारण त्यावेळी सौदी अरेबियाने त्या देशाला भरीव आर्थिक मदत केली. पाकिस्तान हा अरब देश नसला, तरी सौदी अरेबियाप्रमाणेच सुन्नीबहुल असणे ही बाबही या मैत्रीसाठी प्रेरक ठरली.
लष्करी देवाणघेवाण
इराण-इराक युद्धाच्या वेळी पाकिस्तानी लष्कराने सौदी अरेबियाच्या उत्तर सीमेचे रक्षण करण्यासाठी तुकड्या पाठवल्या होत्या. हुथींविरोधात अलीकडच्या काळात सौदी अरेबियाने केलेल्या कारवाईतही पाकिस्तानी लष्कराची मर्यादित मदत घेतली गेली होती. अण्वस्त्र महत्त्वाकांक्षी इराणला जरब बसावी यासाठी आपणही सज्ज राहावे अशी सौदी अरेबियाची इच्छा आहे. या देशाने काही वर्षांपूर्वी पाकिस्तानकडे अण्वस्त्र तंत्रज्ञान पुरवण्याविषयी विचारणा केली होती. त्यास पाकिस्तानने नकार दिला होता.
‘जिहादी जनरल’ नि इस्लामिक बॉम्ब
पाकिस्तानचे विद्यमान लष्करप्रमुख असिम मुनीर हे जिहादी मनोवृत्तीचे मानले जातात. त्यांनी सौदी अरेबियामध्ये पाकिस्तानचे लष्करी प्रतिनिधी म्हणून काम पाहिले. कुराण मुखोद्गत असल्यामुळे सौदी राजसत्ता आणि धर्मसत्तेशी त्यांचे विशेष मैत्रीचे संबंध होते. त्यामुळे पाकिस्तानच्या विद्यमान दरिद्री अर्थव्यस्थेला काही प्रमाणात सौदी अरेबियाच्या पेट्रोडॉलर्स अर्थात खनिज तेलनिर्मिती आणि निर्यातीतून मिळणाऱ्या निधीचा टेकू मिळतो. त्या बदल्यात, अण्वस्त्रसक्षम इराण आणि अण्वस्त्रसज्ज इस्रायल या युद्धखोर देशांच्या तावडीत सापडू नये यासाठी पाकिस्तानशी संरक्षण सहकार्य करार करताना, त्या देशाकडून मर्यादित अण्वस्त्रकवच मिळावे ही मागणी सौदीमित्र मुनीर यांच्याकडे सौदी राजवटीने केली असू शकते. यामुळेच त्या देशाला अण्वस्त्र तंत्रज्ञान उपलब्ध करून देऊ, असे पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ बोलून गेले असावेत.