अफगाणिस्तानात तालिबान सत्तेत आल्यानंतर पाकिस्तानसोबतचे संबंध कमालीचे बिघडले आहेत. अफगाणिस्तानात पुन्हा तालिबान राजवट आणण्यासाठी पूर्ण ताकद लावणाऱ्या पाकिस्तानी लष्कर आणि गुप्तचर संस्था आयएसआयसाठी तालिबानी दहशतवादी आता भस्मासूर झाले आहेत. तालिबानी संघटनांकडून पाकिस्तानच्या सीमेवर हल्ले केले जात आहेत. या हल्ल्यात पाकिस्तानच्या सात सैनिकांची हत्या झाल्यानंतर वाद चिघळला आहे. यानंतर पाकिस्तानी सैन्याने पूर्व अफगाणिस्तानमधील कुनार आणि खोस्त प्रांतात पहाटे हवाई हल्ले केले. या हल्ल्यात २० मुलांसह किमान ४५ जण ठार झाले. इस्लामाबादमधील अधिकार्‍यांनी याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. पण अफगाणिस्तानच्या सीमेवर खैबर-पख्तूनख्वाच्या उत्तर वझिरीस्तान जिल्ह्यात सात पाकिस्तानी सैनिकांच्या मृत्यूचं उत्तर असल्याचं बोललं जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दहशतवादी कोणत्या गटाशी संबंधित आहेत?

पाकिस्तानी सैन्याची ज्या दहशतवाद्यांनी हत्या केली, ते तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) किंवा पाकिस्तानी तालिबानचे सदस्य असल्याचा संशय आहे. २००७ मध्ये बैतुल्ला मेहसूद या हाय-प्रोफाइल जिहादी कमांडरने दहशतवादी संघटना स्थापित केली होती. प्रामुख्याने उत्तर-पश्चिम पाकिस्तानमधील पश्तून आदिवासी भागातून या संघटनेला समर्थन असल्याचं बोललं जात आहे.

दहशतवादी संघटनेची मुख्य उद्दिष्टे काय आहेत?

यूएस इन्स्टिट्यूट ऑफ पीसच्या अहवालानुसार, टीटीपीच्या मुख्य उद्दिष्टांमध्ये “शरिया कायद्याची अंमलबजावणी करणे, अफगाणिस्तानातील यूएस-नाटो सैन्याशी लढा देणे आणि पाकिस्तानी सैन्याविरुद्ध जिहाद करणे, यांचा समावेश आहे. यूएस आणि नाटो सैन्य देशातून बाहेर पडल्यामुळे आता तालिबानचे नियंत्रण आहे. त्यामुळे टीटीपी आता केवळ शरिया लागू करण्यावर आणि पाकिस्तानी सैन्याशी लढण्यावर लक्ष केंद्रित करत आहे.

पाकिस्तानने २७०० किमी लांबीच्या सीमेवर कुंपण घातलं

टीटीपी आणि बरादर गटांसारख्या गटांचे हल्ले रोखण्यासाठी पाकिस्तानने २७०० किमी लांबीच्या सीमेवर कुंपण घातले आहे. मात्र कुंपणावरून तालिबान आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष वाढला आहे. अफगाणिस्तानच्या कोणत्याही सरकारने आतापर्यंत ड्युरंड रेषा म्हणून ओळखली जाणारी ही सीमा मान्य केलेली नाही. तालिबानचे म्हणणे आहे की, पाकिस्तान बळजबरीने वसाहतवादी काळात ओढलेली रेषा सीमा म्हणून लादण्याचा प्रयत्न करत आहे.

टीटीपीने कोणत्या महत्त्वपूर्ण दहशतवादी हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे?

टीटीपीने २०१४ मध्ये कराची आंतरराष्ट्रीय विमानतळ ताब्यात घेतलं होतं. तसेच पेशावर येथील आर्मी पब्लिक स्कूलमधील १५० लोकांची हत्या केली होती. मागील वर्षी टीटीपीच्या आत्मघातकी दहशतवाद्यांनी पेशावरमधील ऐतिहासिक ऑल सेंट्स चर्चला लक्ष्य केले होते. यात १२० जणांचा मृत्यू झाला होता. २०१२ मध्ये मलाला युसूफझाईच्या हत्येच्या प्रयत्न या संघटनेनं केला होता. त्यानंतर मलाला युसूफझाईला २०१४ मध्ये नोबेल शांतता पुरस्कार मिळाला होता.

विश्लेषण: ध्वनीप्रदूषण आरोग्यासाठी महाघातक; भोंग्याचा इतिहास व राजकारण जाणून घ्या…

अफगाण तालिबानशी त्यांचे संबंध काय?

तालिबान आणि टीटीपी एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचं पाकिस्तानी लष्कराच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. टीटीपी तालिबानला दहशतवादी आणि रसद पुरवण्यासाठी ओळखले जाते. आदिवासी भागातील शेकडो आत्मघातकी हल्लेखोरांना प्रशिक्षण देऊन पाठवले होते, अफगाणिस्तानात पाठवले होते. अफगाण तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यामुळे गेल्या वर्षी तुरुंगात असलेल्या शेकडो टीटीपी दहशतवाद्यांना तुरुंगातून सोडण्यात आले होते. टीटीपीचे अल कायदा आणि अफगाण तालिबानशी संलग्न असलेल्या हक्कानी नेटवर्कशीही जवळचे संबंध आहेत.

हवाई हल्ल्यांवर तालिबानची प्रतिक्रिया

पाकिस्तानने अफगाणिस्तानात केलेल्या हवाई हल्ल्यांबद्दल तालिबानने तीव्र नाराजी व्यक्त केली. “अफगाणिस्तानचे इस्लामिक अमीरात खोस्त आणि कुनारमधील निर्वासितांवर पाकिस्तानच्या हल्ल्यांचा तीव्र निषेध करतो. पाकिस्तानने अफगाण लोकांच्या संयमाची परीक्षा घेऊ नये आणि तीच चूक पुन्हा करू नये असे आवाहन केले आहे. अन्यथा त्याचे वाईट परिणाम होतील,” असे तालिबान सरकारचे प्रवक्ते जबिहुल्ला मुजाहिद यांनी सांगितले. टीटीपीनेही एक निवेदन जारी करून या हल्ल्याचा निषेध केला आहे. टीटीपीचे प्रवक्ते मुहम्मद खुरासानी म्हणाले, “आम्ही पाकिस्तानी सैन्याला सांगू इच्छितो की प्रत्येक युद्धाचे एक तत्त्व असते आणि पाकिस्तानने अद्ययावत युद्धाच्या प्रत्येक तत्त्वाचे उल्लंघन केले आहे. आम्ही पाकिस्तानी सैन्याला आव्हान देतो की, अत्याचारित लोकांवर आणि निर्वासितांच्या छावण्यांवर बॉम्बफेक करण्याऐवजी युद्धभूमीवर आमच्याशी लढा.”

पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने एक निवेदन जारी करत सांगितलं आहे की, “पाक-अफगाण सीमा प्रदेश सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तानने गेल्या काही महिन्यांत अफगाण सरकारला वारंवार विनंती केली आहे. अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर दहशतवादी पाकिस्तानमध्ये कारवाया करण्यासाठी करत आहेत.”

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistan launched airstrikes on afghanistan know the reason rmt
First published on: 02-05-2022 at 11:37 IST