Why Pakistan Use border Force inside in Country : पाकिस्तानने त्यांच्या ‘फ्रंटियर कॉन्स्टेबलरी’ या केंद्रीय सुरक्षा दलाचे रुपांतर निमलष्करी दलात करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी त्या संदर्भातील एक अध्यादेश काढून राज्य सरकारांना या दलाचा वापर करण्याची अधिकृत मान्यता दिली आहे, त्यामुळे आता हे दल पाकिस्तानमधील सर्व प्रांत व केंद्रशासित प्रदेशांची सुरक्षा करणार आहे. फ्रंटियर कॉन्स्टेबलरी दलाचे नाव बदलून ‘फेडरल कॉन्स्टेबलरी’ असं करण्यात आलं आहे. या नवीन दलाकडे पाकिस्तानमधील कायदा सुव्यवस्था राखणे, स्थानिक कायदा अंमलबजावणी यंत्रणांना सहकार्य करणे व देशातील विविध सुरक्षा गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी असणार आहे. दरम्यान, पाकिस्तानने असा निर्णय नेमका कशामुळे केला? त्या संदर्भातील घेतलेला हा आढावा…
दक्षिण आशियामधील वाढत्या सुरक्षाविषयक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान सरकारने घेतलेला हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे. या बदलामुळे देशांतर्गत सुरक्षेला अधिक बळकटी मिळणार आहे, असा सरकारचा विश्वास आहे.
फ्रंटियर कॉन्स्टेबलरी दलाचे काम काय होते?
- फ्रंटियर कॉन्स्टेबलरी हे पाकिस्तानमधील केंद्रीय सुरक्षा दल होते.
- सीमावर्ती भागात सुरक्षा राखण्यासाठी या दलातील जवान नेहमीच कार्यरत असायचे.
- फ्रंटियर कॉन्स्टेबलरी दलाचा वापर’ Frontier Constabulary Act, 1915′ या कायद्यानुसार केला जात होता.
- साधारणत: २५ वर्षांपूर्वी फ्रंटियर कॉन्स्टेबलरी दलाच्या जवानांना कराचीमध्ये तैनात करण्यात आले होते.
- त्यानंतर इस्लामाबाद आणि गिलगित-बाल्टिस्तान येथेही या दलाने सुरक्षेचे काम केले.
- चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्ग (CPEC) व मोठ्या धरण प्रकल्पांच्या सुरक्षेसाठी या दलातील जवानांनी चोख भूमिका बजावली.
- फ्रंटियर कॉन्स्टेबलरी दलाचे जवान हे सीमावर्ती भागात कार्यरत असायचे, त्यांच्याकडे घुसखोरी थांबवण्याची जबाबदारी होती.
- पाकिस्तानच्या एका माजी गृहसचिवांनी ‘डॉन’ या वृत्तपत्राला यासंदर्भातील सविस्तर माहिती दिली आहे.
आणखी वाचा : जम्मू-काश्मीरमध्ये ‘शहीद दिन’ साजरा करण्यावर बंदी; अनेकांना नजरकैदेत ठेवलं; कारण काय?
पंजाब वगळता सर्व राज्यांमध्ये कार्यरत
२०२३ मध्ये पाकिस्तान-व्याप्त काश्मीरमध्ये (PoK) झालेल्या मोठ्या आंदोलनानंतर काही काळासाठी तिथे फ्रंटियर कॉन्स्टेबलरी दलाला पाचारण करण्यात आले होते. पाकिस्तानी लष्कराच्या अधिकृत वेबसाईटनुसार, उत्तर-पश्चिम खैबर पख्तुनख्वा प्रांतासह आदिवासी भागांमधील सीमेचे संरक्षण करण्यासाठी जबाबदारी या दलाकडे देण्यात आली होती. देशात होणारी घुसखोरी रोखण्यासाठी फ्रंटियर कॉन्स्टेबलरी दलाचा वापर केला जात होता. पंजाब वगळता पाकिस्तानच्या सर्व प्रांतांमध्ये या दलाच्या तुकड्या कार्यरत होत्या. मात्र, पंजाबमधील काही अतिसंवेदनशील प्रकल्प व व्हीव्हीआयपी व्यक्तींच्या सुरक्षेसाठी अधून मधून या दलातील जवानांना तैनात केले जात होते, अशी माहिती एक्स्प्रेस ट्रिब्यून या वृत्तपत्राने दिली आहे.
फेडरल कॉन्स्टेबलरी दलाकडे कोणती जबाबदारी?
फेडरल कॉन्स्टेबलरी या नवीन दलाचा वापर आता निमलष्करी दल म्हणून केला जाणार आहे. इस्लामाबाद कॅपिटल टेरिटरी पोलिस, विविध प्रांतीय पोलिस दल, तसेच इतर सुरक्षा व कायदा अंमलबजावणी संस्थांना सहाय्य करण्याची जबाबदारी या दलाकडे देण्यात आली आहे. पाकिस्तानच्या माजी गृहसचिवांनी डॉन या वृत्तपत्राला सांगितले की, राष्ट्रपतींच्या या अध्यादेशामुळे देशातील कोणत्याही राज्यांना या दलाचा वापर करता येणार आहे. फेडरल कॉन्स्टेबलरी दलाचे नेतृत्व इन्स्पेक्टर जनरलकडे असेल आणि त्यांची नियुक्ती पाकिस्तान सरकारतर्फे करण्यात येणार आहे. सध्याच्या फ्रंटियर कॉन्स्टेबलरी दलाचे कर्मचारी व पारंपरिक पद्धतीने नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांचा त्यात समावेश असणार आहे. दंगल नियंत्रण व विशेष सुरक्षा कार्यासाठी या दलातील जवानांना प्रशिक्षण दिले जाईल.

हेही वाचा : डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील जीवघेण्या हल्ल्याला जबाबदार कोण? सिनेटच्या अहवालात काय म्हटलंय?
फेडरल कॉन्स्टेबलरी दलाकडे कोणकोणते अधिकार?
पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी जारी केलेल्या अध्यादेशात असं नमूद केलंय की, फ्रंटियर कॉन्स्टेबलरी दलातील सर्व सदस्य, कर्मचारी व या दलाची मालमत्ता नव्याने स्थापन झालेल्या फेडरल कॉन्स्टेबलरी दलामध्ये समावेश केला जाईल. यापूर्वी या दलातील जवानांचा वापर सीमेचे संरक्षण व VIP सुरक्षेसाठी करण्यात आल्यामुळे पाकिस्तान सरकारवर टीकेची झोड उठली होती. डॉन या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, आता सुधारित दलाचा वापर फक्त प्रभावशाली व्यक्तींच्या वैयक्तिक सुरक्षेसाठीच केला जाऊ शकतो. पाकिस्तानच्या PTV या सरकारी वाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, पूर्वी केंद्रीय सुरक्षा दलात केवळ खैबर पख्तुनख्वा येथील तरुणांचीच भरती केली जात होती; पण आता नवीन दलात देशातील सर्व तरुणांना भरती होण्याची एकसमान संधी दिली जाईल.
फ्रंटियर कॉन्स्टेबलरी दलाची स्थापना नेमकी कशासाठी?
मागील काही महिन्यांपासून पाकिस्तानमध्ये सातत्याने हत्येच्या तसेच अपहरणाच्या घटना घडत आहेत. भारतातील मोस्ट वॉन्टेंड दहशतवाद्यांच्या हत्या करण्याचा कुणीतरी सपाटाच लावला आहे. विशेषतः खैबर पख्तुनख्वा आणि बलुचिस्तान या अफगाणिस्तान व इराण सीमेलगतच्या प्रांतांमध्ये दहशतवादी हल्ल्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. हीच बाब लक्षात घेता पाकिस्तान सरकारने फ्रंटियर कॉन्स्टेबलरी दलाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे, असे वृत्त डॉन या वृत्तपत्राने दिले आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये पाकिस्तान व तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) यांच्यातील युद्धविराम संपल्यानंतर खैबर पख्तुनख्वा प्रांतातील दहशतवादी हल्ल्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. या हल्ल्यांना पाकिस्तानने अफगाणिस्तानमधील तालिबानी सरकारला जबाबदार धरलं आहे. मात्र, काबूलने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.