पाकिस्तानचा माजी लेग-स्पिनर दानिश कनेरिया मैदानावर आणि बाहेरही कायम चर्चेत राहिला. अलीकडे भारताच्या अंतर्गत बाबींवर त्याने सातत्याने सकारात्मक वक्तव्ये केली. कनेरियाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेही कौतुक केले. यामुळे कनेरियाला भारतीय नागिरकत्व हवे असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, यात तथ्य नसल्याचा खुलासाही त्याने केला आहे. या सर्व घटनांचा आढावा.
कनेरियाच्या भारतीय नागरिकत्वाची चर्चा
कनेरिया धर्माने हिंदू आहे. याच कारणास्तव कारकीर्दीदरम्यान त्याला पाकिस्तानी अधिकारी आणि क्रिकेट मंडळाकडून कायम भेदभाव सहन करावा लागला. अशातच अलीकडे भारतातील घडामोडींवर त्याने सकारात्मक टिप्पणी केली. त्यामुळे त्याला भारतीय नागरिकत्व हवे असल्याच्या चर्चेने जोर धडला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत कनेरिया
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपला शंभरावा वर्धापन दिन साजरा करत आहे. या संघटनेत कोणतीही जात नाही, धर्म नाही, सीमा नाही, फक्त सेवा. हे ध्येय पुढे नेणाऱ्या प्रत्येक स्वयंसेवकाला मी सलाम करतो. जगाला अशा समर्पित संघटनांची गरज आहे. मी या संघटनेचे काम पाहिले आहे. समुदायांना मदत करणे, गरजूंसाठी धावून जाणे, तरुणांना सक्षम करणे यात ही संघटना आघाडीवर आहे. त्यांचे काम अविरत सुरू आहे. यामुळे मला त्यांचे कौतुक वाटते, असे कनेरिया म्हणाला होता.
‘भारत माता’ वक्तव्य चर्चेत
कनेरियाने पुढे जाऊन ‘फ्रेंड्स ऑफ आरएसएस’ या एक्स हँडलवरून एक टिप्पणी शेअर केली, ज्यामध्ये वकील इंदिरा जयसिंग यांनी ‘भारत माता’ आणि ‘आरएसएस’ स्वयंसेवकांचे चित्र असलेले स्मारक नाणे जारी करण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या संदर्भात ‘सरकारने बनावट धर्मनिरपेक्षतावाद्यांची पर्वा करू नये. आरएसएस आणि त्यांच्या स्वयंसेवकांना सक्षम करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे,’ असेही जयसिंग यांनी लिहिले होते.
भारतीय नागरिकत्व मिळविण्यासाठी इच्छुक?
कनेरियाने या चर्चेवर पडदा टाकताना शनिवारी एक्सवरून आणखी एक टिप्पणी करत आपल्याला भारतीय नागरिकत्वामध्ये रस नसल्याचे स्पष्ट केले आहे. मला कायमच तू पाकिस्तानबाबत का बोलत नाहीस, अशी विचारणा होत असते. मी हे सर्व भारतीय नागरिकत्वासाठी करतो असा त्यांचा समज आहे. मात्र, तो चुकीचा आहे. मी त्या उद्देशाने कधीच विचार केला नाही, असे तो लिहितो.
भारतीय नागरिकत्वाबाबत भूमिका
मी जन्माने पाकिस्तानी असलो, तरी माझे पूर्वज हे भारतीय होते आणि त्यामुळेच भारत ही माझी मातृभूमी आहे. यावर मी ठाम आहे. पण पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करताना पाकिस्तानी चाहत्यांकडून मिळालेले प्रेम कधीही विसरणार नाही. भारत एक मंदिरासारखा आहे. पण, भारतीय नागरिकत्व मिळविण्याचा माझा विचार नाही. माझ्यासारख्या एखाद्याने असा विचार केला तर त्यांच्यासाठी ‘सीएए’ कायदा अस्तित्वात आहे, असे कनेरिया म्हणाला. या वक्तव्यामुळे भविष्यात त्याने भारतीय नागरिकत्व घेण्याचा पर्याय तयार ठेवला असल्याचे बोलले जाते.
नागरिकत्व सुधारणा कायद्याचा काय संबंध?
नागरिकत्व सुधारणा कायद्यांतर्गत बांगलादेश, पाकिस्तान आणि अगदी अफगाणिस्तानातून पळून भारतात प्रवेश केलेल्या छळग्रस्त अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व देण्यात येते. अशा प्रकारे पाकिस्तानात जन्मलेल्या अदनान सामी याला २०१६ मध्ये भारतीय नागरिकत्व देण्यात आले आणि या वर्षी पद्मश्री या नागरी सन्मानानेही गौरविण्यात आले.
कनेरियाचे धर्माबाबतचे विचार काय?
आपण हिंदू असल्याबद्दल तो ठाम आहे. मी कायम धर्माचे समर्थन करत राहीन. आपल्या नितिमत्तेला हानी पोहोचवणाऱ्या आणि समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या देशद्रोही आणि बनावट धर्मनिरपेक्षतावाद्यांना कायम उघड करत राहीन, अशी भूमिका एक्सवरून स्पष्ट करताना कनेरियाने शेवटी ‘जय श्री राम’ असे लिहिले आहे.
पाकिस्तानच्या माजी हिंदू क्रिकेटपटूशी संबंध
१९८०च्या दशकात अनिल दलपत हा पाकिस्तानच्या संघात यष्टिरक्षक होता. अलीकडच्या काळात पाकिस्तानकडून खेळलेला तो पहिला हिंदू क्रिकेटपटू. १९८५मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या चँपियन ऑफ चँपियन्स स्पर्धेत त्याची कामगिरी चर्चेचा विषय ठरली होती. भारताने त्या स्पर्धेत अजिंक्यपद पटकावले, पण भारताविरुद्ध सामन्यात दलपतने अनेक चुका केल्या. त्याच्या हिंदू असण्यामुळे त्यावेळी त्याच्याविषयी पाकिस्तानात संशय व्यक्त झाला होता. अनिल दलपत हा दानिश कनेरियाचा दूरचा भाऊ होता.