जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक हे त्यांच्या बेधडक विधानांसाठी परिचित आहेत. नुकतीच त्यांनी 'द वायर' या वेबसाईटला एक मुलाखत दिली. ज्यामध्ये त्यांनी १४ फेब्रुवारी २०१९ रोजी झालेल्या पुलवामा हल्ल्याबाबत एक खळबळजनक दावा केला आहे. पुलवामामध्ये हल्ला झाला तेव्हा सत्यपाल मलिक जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल होते. त्यामुळे त्यांच्या विधानाकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अक्षम्य निष्क्रियतेमुळे हा हल्ला झाला, असा दावा मलिक यांनी केला. शिवाय याबाबत त्याच दिवशी संध्याकाळी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधला, पण त्यांनी मला शांत बसण्यास सांगितले, असा गौप्यस्फोट मलिक यांनी केला आहे. मलिक यांच्या दाव्यानंतर काँग्रेसने त्यांच्या मुलाखतीचा व्हिडीओ ट्वीट करून भाजपावर निशाणा साधला. मलिक यांच्या दाव्यानंतर आता आरोप-प्रत्यारोप होतील. तत्पूर्वी चार वर्षांपूर्वी पुलावामा येथे हल्ला कसा झाला? त्यानंतर भारताने त्याला कसे उत्तर दिले? गृहखात्याने कोणत्या खबरदारीच्या उपाययोजना केल्या? याबाबत घेतलेला हा आढावा. पुलवामा हल्ला कसा झाला? १४ फेब्रुवारी २०१९ रोजी जम्मू-श्रीनगर महामार्गावरच्या पुलवामा भागात सीआरपीएफच्या जवानांच्या एका ताफ्यावर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा अतिरेकी आदिल अहमद दार याने स्फोटकांनी भरलेल्या गाडीची धडक सीआरपीएफच्या ताफ्यातील बसला दिली. या भीषण स्फोटात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले. या भ्याड हल्ल्यानंतर संयुक्त राष्ट्र आणि जगभरातील देशांनी या घटनेचा निषेध केला. युनायटेड स्टेट्स, रशिया, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, सौदी अरेबिया, श्रीलंका आणि बांगलादेश या देशांनी पुलवामा हल्ल्याचा निषेध करत असताना दहशतवादाविरोधातील लढाईत आम्ही सोबत असल्याचा संदेश दिला. हे वाचा >> “मी नरेंद्र मोदींना सांगितलं पुलवामा आपल्या चुकीमुळे घडलंय, तर त्यांनी मला…”, जम्मू-काश्मीरच्या माजी राज्यपालांचा खळबळजनक दावा! हल्ल्यानंतर जैश-ए-मोहम्मद संघटनेने एक व्हिडीओ पोस्ट करून हल्ल्याची जबाबदारी घेतली. आत्मघाती हल्लेखोर २२ वर्षीय आदिल अहमद दारने स्वतःच्या गाडीत स्फोटके भरून पुलवामा जिल्ह्यातून जाणाऱ्या सीआरपीएफच्या बसला लेथपोरा येथे धडक दिली होती. आदिल काश्मिरी तरुण असून त्याच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार २०१८ सालापासून तो बेपत्ता होता. बालाकोट एअर स्ट्राईक पुलवामाचा हल्ला झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळणे अपेक्षितच होते. या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देऊन सरकारने शहीद जवानांना श्रद्धांजली द्यावी, अशी मागणी पुढे येऊ लागली होती. २६ फेब्रुवारी २०१९ रोजी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील बालाकोट येथे एअर स्ट्राईक करून दहशतवाद्यांचा तळ उद्ध्वस्त करत पुलवामाच्या भ्याड हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले. भारतीय लष्काराने दिलेल्या माहितीनुसार या हवाई हल्ल्यात अनेक दहशतवादी ठार झाले. भारताच्या एअर स्ट्राईकला उत्तर देण्यासाठी पाकिस्तानकडून दुसऱ्याच दिवशी हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पाकिस्तानच्या या आगळिकीला भारताने तात्काळ चोख उत्तर दिले. भारताच्या मिग २१ या लढाऊ विमानाचे वैमानिक विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी पाकिस्तानचे शक्तिशाली फोर्स एफ-१६ हे लढाऊ विमान पाडून पराक्रम गाजवला. पण दुर्दैवाने विंग कमांडर वर्धमान यांच्याही जेटचे नुकसान झाल्यामुळे त्यांना पाकिस्तानच्या हद्दीत उतरावे लागले. तिथे पाकिस्तानी सैन्याने त्यांना ताब्यात घेतले. विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची सुखरूप सुटका व्हावी, यासाठी संपूर्ण देश प्रार्थना करत होता. भारतानेही आंतरराष्ट्रीय स्तरावरून पाकिस्तानवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. तब्बल साठ तास पाकिस्तानच्या सैन्याचा छळ सहन केल्यानंतर अभिनंदन वर्धमान यांची १ मार्च २०१९ रोजी सुटका करण्यात आली. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शांती अबाधित राहावी, यासाठी अभिनंदन यांच्या सुटकेला मान्यता दिली. अभिनंदन वर्धमान यांना त्याच वर्षी स्वातंत्र्यदिनी वीरचक्र देऊन सन्मानित करण्यात आले. भारतीय लष्करात अतुलनीय शौर्य गाजविणाऱ्यांना दिला जाणारा हा सन्मान तिसऱ्या क्रमाकांचा सर्वात मोठा सन्मान आहे. हे वाचा >> पुलवामा हल्ल्याविषयी माहिती देणारे ‘द लव्हर बॉय ऑफ बहावलपूर’ या पुस्तकात काय लिहिले? पुलवामा हल्ला आणि राजकारण पुलवामा हल्ल्याला चार वर्षे झाली असली तरी त्यावरून होणारे राजकारण थांबलेले नाही. सत्यपाल मलिक हे पहिले व्यक्ती नाहीत ज्यांनी पुलवामा हल्ल्यावरून मोदी सरकारवर प्रश्न उपस्थित केले. याआधी काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनीही असेच प्रश्न उपस्थित केले होते. मात्र भाजपाकडून जोरदार टीका झाल्यानंतर काँग्रेस पक्षातूनच दिग्विजय सिंह यांना शांत राहण्याचा इशारा देण्यात आला. २३ जानेवारी २०२३ रोजी दिग्विजय सिंह यांनी एक ट्वीट करत पुलवामा हल्ल्यासाठी वापरण्यात आलेले ३०० किलो आरडीएक्स कुठून आले? असा प्रश्न उपस्थित केला होता. तसेच सीआरपीएफच्या जवानांना एअर लिफ्ट करण्याची मागणी होत असताना त्यांना विमानाने का आणण्यात आले नाही? असाही प्रश्न त्यांनी त्या वेळी उपस्थित केला होता. अर्थातच भाजपाकडून झालेल्या टीकेनंतर काँग्रेसने दिग्विजय यांचे वक्तव्य वैयक्तिक पातळीवरचे असून पक्षाशी त्याचा काही संबंध नसल्याचे सांगितले. जानेवारी २०२३ मध्ये वाद निर्माण करणाऱ्या दिग्विजय यांनी १४ फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा ट्वीट करून पुलवामा हल्ल्यावर भाष्य केले. त्यांनी पुलवामाचा हल्ला हा भारताच्या गुप्तचर यंत्रणेचे अपयश असल्याचे म्हटले. या आरोपानंतरही साहजिकच भाजपाकडून जोरदार हल्लाबोल करण्यात आला. दिग्विजय सिंह यांची भाषा ही आयएसआय एजंटला शोभणारी आहे, अशी टीका मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केली. पुलवामा हल्ल्यानंतर जवानांना विमान देण्याचा निर्णय घेतला पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर सैनिकांच्या सुरक्षेसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने काश्मीरमध्ये तैनात असलेल्या सर्व केंद्रीय सुरक्षा दलांना आता जम्मूहून श्रीनगरला नेण्यासाठी विमानप्रवासाची सेवा पुरवली जाणार असल्याचे जाहीर केले. गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार बीएसएफ, आसाम रायफल्स, सीआरपीएफ, सीआयएसएफ, एसएसबी, एनएसजी आणि आयटीबीपीच्या जवानांना काश्मीर खोऱ्यात तैनात करण्यासाठी हवाईमार्गे श्रीनगरला नेण्यासाठी विमाने पुरविण्यात येतील, असे गृह मंत्रालयाने जाहीर केले होते. दिल्ली-श्रीनगर, श्रीनगर-दिल्ली आणि जम्मू-श्रीनगर व श्रीनगर-जम्मू या मार्गावर विमान सेवेचा वापर केला जाईल. जवळपास सात लाख ८० हजार जवानांना याचा लाभ मिळणार असल्याचे गृहखात्याने सांगितले. सीआरपीएफ जवानांना विमान न पुरविल्यामुळेच त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला असल्याचा आरोप दिग्विजय सिंह यांनी केला होता. सत्यपाल मलिक यांनी तर त्यापुढे जाऊन १४ फेब्रुवारी २०१९ रोजी काय झाले याचा घटनाक्रम 'द वायर'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितला आहे. तसेच, माझ्याकडे जर सीआरपीएफने मागणी केली असती, तर मीच त्यांना विमान उपलब्ध करून दिले असते, असेही ते म्हणाले. बालाकोट एअर स्ट्राईकवर प्रश्नचिन्ह पुलवामा हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल भारताकडून बालाकोट येथे एअर स्ट्राईक करण्यात आला. या हल्ल्यात जवळपास ३०० दहशतवादी मारले गेले, असे सांगितले जात होते. तत्कालीन परराष्ट्र संबंध मंत्रालयाचे सचिव विजय गोखले यांनी पत्रकार परिषद घेऊन बालाकोट हवाई हल्ल्यात दहशतवाद्यांचे मोठे नुकसान झाले असून दहशतवाद्यांचे प्रशिक्षण केंद्र उद्ध्वस्त केल्याचा दावा त्यांनी केला होता. मात्र पाकिस्तानने विजय गोखले यांचा दावा खोडून काढला. हे ही वाचा >> पुलवामा हल्ल्यानंतर सैनिकांच्या सुरक्षेसाठी ‘एअर लिफ्ट’, सरकारचा मोठा निर्णय बालाकोट येथील 'मरकज़ सय्यैद अहमद शहीद' हा मदरसा हवाईहल्ल्यात उद्ध्वस्त केल्याचा दावा भारताने केला होता. बालाकोट एअर स्ट्राईकचे वार्तांकन करण्यासाठी रॉयटर्स या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेच्या काही प्रतिनिधींनी घटनास्थळी जाण्याचा प्रयत्न केला. पण पाकिस्तानी सैन्याने त्यांना खैबर पख्तूनख्वाहच्या पर्वतरांगांवर जाण्यास परवानगी दिली नाही. एका महिन्यानंतर म्हणजे २८ मार्च रोजी पाकिस्तानी सैन्याने पाकिस्तानच्या माध्यमांना घटनास्थळी जाण्याची मुभा दिली. ज्यामध्ये मदरशाची इमारत सुस्थितीत असल्याचा दावा करण्यात आला. एका महिन्यात बालाकोट येथे पाकिस्तानने डागडुजी करून आता नवे चित्र जगासमोर उभे करण्याचा हास्यास्पद प्रकार केला असल्याची टीका भारताकडून करण्यात आली. सत्यपाल मलिक यांच्या दाव्यामुळे भाजपाची कोंडी? काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या आरोपानंतर त्यांच्यावर तुटून पडणाऱ्या भाजपाने सत्यपाल मलिक यांच्या वक्तव्यानंतर अद्याप भूमिका घेतलेली नाही. सत्यपाल मलिक हे फटकळ स्वभावाचे असल्याचे मानले जाते. दिल्लीच्या सीमेवर वर्षभर चाललेल्या शेतकरी आंदोलनावरून त्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत खटके उडाले होते, ज्याची जाहीर वाच्यता त्यांनी न घाबरता माध्यमांसमोर केली होती. त्यामुळे भाजपा आता मलिक यांच्या आरोपांना कसे उत्तर देणार हे पाहावे लागेल.