Happy Birthday PM Narendra Modi: आज, १७ सप्टेंबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. परंतु, या सर्व जल्लोषाच्या आणि उत्साहाच्या वातावरणात भारतातील माणा गावातील लोक बद्रीनाथाच्या चरणी पंतप्रधान मोदींच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत. ते सांगतात, हा दिवस आमच्यासाठी पंतप्रधानांना शुभेच्छा देण्यापुरता मर्यादित नसून आमच्या गावाला जी ओळख मिळाली आहे त्या प्रवासाची आठवण करून देणारा आहे. माणा हे गाव भारतातील सर्वात शेवटचं गाव म्हणून ओळखलं जात होतं. परंतु, आता चित्र पालटलं आहे, हेच गाव भारताच्या सीमेवरील पहिलं गावं म्हणून ओळखलं जातं आणि शेवटचं ते पहिलं या प्रवासासाठी मोदीच कारणीभूत ठरले!
माणा हे गाव कुठे आहे?
माणा हे गाव उत्तराखंड राज्यातील चमोली जिल्ह्यात आहे. हे गाव बद्रीनाथ धामच्या उत्तरेला, अलकनंदा नदीच्या काठावर वसलेले आहे. भारत-तिबेट सीमेच्या अगदी जवळ असल्यामुळे पूर्वी त्याला भारताचं शेवटचं गाव म्हटलं जात असे. पण, २०२२ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीमावर्ती प्रत्येक गावाला ‘देशाचं पहिलं गाव’ अशी ओळख दिल्यानंतर आता माणा गाव भारताचं पहिलं गाव म्हणून गौरवलं जातं. हे गाव समुद्रसपाटीपासून सुमारे ३,२२० मीटर उंचीवर वसलेलं असून, चीन-तिबेट सीमेपासून फक्त काही किलोमीटर अंतरावर आहे. धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या या स्थानाला मोठं महत्त्व आहे, कारण येथे भीमपुल, व्यासगुंफा आणि गणेशगुंफा यांसारखी अनेक धार्मिक स्थळं आहेत.
मनातील सल
या गावाचे ग्रामप्रमुख धर्मेंद्र चौहान म्हणतात, मी माणामध्ये जन्मलो आणि वाढलो. मला आठवतं तेव्हापासून आमच्या गावाच्या प्रवेशद्वारावरच्या फलकावर लिहिलं असे, भारताचं शेवटचं गाव ‘माणा’. दरवेळी आम्ही त्या फलकाजवळून जात असू, तेव्हा मनात कुठेतरी एक खिन्नता दाटून येत असे. जणू आम्हाला देशाच्या स्मृतीच्या सीमेवर नेऊन ठेवले आहे, असा भास होतं असे. आम्ही आपल्या प्राणांची बाजी लावून, देशावरच्या प्रेमापोटी सीमा सांभाळत होतो; तरीदेखील शेवटचे म्हणून ओळखलं जाण्याची सल मनात कायम सलत राहिली. सहनशीलतेने ती स्वीकारली, कारण दुसरा मार्गच नव्हता.

मोदींवर आमची श्रद्धा होती
पण, आम्ही शांत असलो तरी कधीच हताश नव्हतो. दिल्ली कितीही दूर भासत असली, तरी बदलाची झुळूक एखाद्या दिवशी इथे नक्कीच येईल, असा विश्वास आम्हाला होता. मोदीजी पंतप्रधानपदावर विराजमान झाले, तेव्हा तो क्षण आला. भूजच्या भूकंपानंतर त्यांनी गुजरातला पुन्हा उभं केलं, केदारनाथच्या आपत्तीच्या काळात ते किती खंबीरपणे उभे राहिले, हे आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या सीमेवर विस्मृतीत गेलेले कोपरेही उजेडात येतील, अशी आमची श्रद्धा होती.
आम्ही शेवट नाही, सुरुवात आहोत
व्हायब्रंट व्हिलेजेस कार्यक्रमामुळे आमचं स्वप्नं वास्तवात आलं. पहिल्यांदाच आम्हा गावकऱ्यांना जाणवलं की, सरकारचं लक्ष डोंगरांपर्यंत पोहोचतं आहे आणि मग २१ ऑक्टोबर २०२२ हा दिवस उजाडला. तो आमच्या आठवणीत कायमचा कोरला गेला. त्या दिवशी पंतप्रधानांनी जाहीर केलं, “देशातील प्रत्येक सीमावर्ती गाव हे देशाचं पहिलं गाव आहे,” तेव्हा आमच्या डोळ्यांतून भावनांचे अश्रू ओघळले. त्या एका वाक्याने वर्षानुवर्षे मनावर साचलेलं दुर्लक्षित असल्याचं ओझं हलकं झालं. त्याने आम्हाला सन्मान दिला, आत्मभान दिलं. आमच्यात विश्वास निर्माण केला की, आम्ही शेवट नाही, आम्ही सुरुवात आहोत.
२०२३ साली, एप्रिल महिन्यात माणाच्या फलकावरचा मजकूर बदलून ‘फर्स्ट इंडियन व्हिलेज, माणा’ असं लिहिलं गेलं, तेव्हा असं वाटलं की, इतिहासाने एक नवीन पान पलटलं आहे. तो फलक म्हणजे फक्त लोखंड आणि रंग नव्हे, तर आमचा अभिमान, आमची ओळख, आमचा आवाज आहे.
स्वावलंबनाचा प्रवास
गेल्या दहा वर्षांत आमच्या आयुष्यात झालेले बदल सर्वत्र दिसतात. कधीकाळी स्वप्नवत वाटणारा रस्ता आता भारताच्या मुख्य प्रवाहाला थेट आमच्या दाराशी घेऊन आला आहे. अस्थिर झोपड्यांच्या जागी सुरक्षित घरे उभी राहिली आहेत. प्रत्येक घरात स्वच्छ पिण्याचे पाणी पोहोचले आहे. उज्ज्वला योजनेमुळे स्त्रियांना चुलीच्या धुरात खोकून जगावं लागत नाही. जे तरुण कधीकाळी शहरात स्थलांतराचा विचार करत होते, ते आता गाइड म्हणून, होमस्टे चालवून किंवा बद्रीनाथ धामासह आमच्या गावाला भेट देणाऱ्या यात्रेकरूंना स्थानिक उत्पादने विकून रोजगार शोधतात. अगदी आमच्याबरोबर सीमा राखणारी ITBP सुद्धा आता आमचा भाजीपाला आणि औषधी वनस्पती विकत घेते, त्यामुळे आम्ही स्वावलंबनाच्या प्रवासात त्यांचे भागीदार झालो आहोत.

पंतप्रधान घरातल्यासारखे
सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, आता आमच्या मनावर दुर्लक्षित असल्याचं ओझं राहिलेलं नाही. मंत्री, अधिकारी आणि शासकीय प्रतिनिधी स्वतः आमच्याकडे येतात. आपत्ती ओढावली तरी आम्ही एकटे नाही असं वाटतं NDRF आणि SDRF तत्काळ मदतीला धावून येतात. अगदी पंतप्रधानही दुःखाच्या काळात आमच्यात सामील झाले आणि एखाद्या दूरवरच्या शासकासारखे नव्हे तर आपल्या घरच्याप्रमाणे, मुलासारखे आमच्याशी बोलले. या सगळ्यामुळे माणाला नवसंजीवनी मिळाली आहे. आम्ही आता केवळ नकाशावरचं एक गाव नाही, तर भारताचं पहिलं प्रवेशद्वार आहोत. जे आपली परंपरा, संस्कृती आणि सामर्थ्य जगभर पसरवतं. माणामध्ये झालेलं हे रूपांतर दाखवून देतं की, सरकार जेव्हा सीमांत प्रदेशाकडे लक्ष देतं, तेव्हा संपूर्ण राष्ट्र अधिक उंच, अधिक भक्कम उभं राहतं.
माणा गावाचे ग्रामप्रमुख म्हणतात, मी आज अभिमान आणि कृतज्ञतेने सांगत आहे. आम्ही, माणा गावातील लोक, जाणतो की, शेवटच्या” गावापासून पहिल्या” गावापर्यंतचा आमचा प्रवास हा आमच्या पंतप्रधानांच्या दूरदृष्टी आणि बांधिलकीमुळे शक्य झाला आहे. त्यांच्या वाढदिवशी आम्ही फक्त शुभेच्छाच नाही तर मनःपूर्वक आभारही मानतो. कारण त्यांनी आम्हाला केवळ विकासच दिला नाही, तर सन्मान, ओळख आणि आशाही दिली. माणा, भारताच्या पहिल्या गावातून, आम्ही मोदीजींना आमचं प्रेम, प्रार्थना आणि वंदन पाठवतो.