गेल्या अनेक दशकांपासून सुरू असलेल्या प्रयत्नांनंतर आणि २० अब्ज डॉल्सपेक्षाही जास्त खर्च करून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात पोलिओ अद्यापही कायम आहे. गेल्या दहा वर्षांपासून सुघ्रा अयाज आग्नेय पाकिस्तानमध्ये घरोघरी फिरत आहेत आणि पालकांना त्यांच्या मुलांना पोलिओ लसीकरण करण्याचे आवाहन करत आहेत. यादरम्यान त्यांनी कायम या लसीविषयी चिंता आणि आक्षेपच व्यक्त होत असल्याचे पाहिले आहे. लोक अनेकदा लसीकरणापेक्षा पुरेसे अन्न आणि स्वच्छ पाणी यांसारख्या आवश्यक गोष्टींना प्राधान्य देतात असे असोसिएटेड प्रेस या संस्थेने म्हटले आहे. शिवाय पोलिओ लसीविषयी इथल्या लोकांमध्ये प्रचंड गैरसमज आहेत. तोंडावाटे लस घेतल्यास मुलांमध्ये वंध्यत्व निर्माण होते असा दावा काही नागरिक करत आहेत.
भरपूर चुकीची माहिती आणि लसीकरणाची आकडेवारी देण्यासाठी वाढत्या दबावानंतर अयाज यांनी उघड केले की काही पर्यवेक्षकांनी लसीकरण करणाऱ्यांना मुलांचे लसीकरण झाले असल्याच्या खोट्या नोंदी केल्या आहेत. तसंच त्यांनी असेही नमूद केले की, ज्या लसी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवाव्या लागतात त्या नेहमीच आवश्यक तापमानात साठवल्या जात नाहीत. तसंच अनेक ठिकाणी लसीकरणाचे काम प्रामाणिकपणे केले जात नाही, असेही अयाज यांनी एपीशी बोलताना सांगितले.
पोलिओ निर्मूलनासाठीचे प्रयत्न जागतिक आरोग्य संघटना आणि त्यांच्या भागीदारांनी १९८८ मध्येच सुरू केले होते. या आजाराचा नायनाट करणे हाच यामागचा उद्देश होता. २०२१ मध्ये प्रगती चांगली होती. जेव्हा अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये फक्त पाच पोलिओ रूग्ण आढळले होते. मात्र, संख्या पुन्हा वाढली. गेल्यावर्षी ती १९ वर पोहोचली आणि निर्मूलनासाठीच्या अनेक मुदतीदेखील चुकवल्या.
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे एकमेव असे देश आहेत जिथे पोलिओचा प्रसार हा एका संसर्गजन्य आजारासारखा आहे, त्यामुळे गेल्या दहा वर्षांपासून हे दोन्ही देश पोलिओ मोहिमेचे लक्ष आणि संसाधनांचे प्राथमिक केंद्रबिंदू राहिले आहेत. इतिहासातील सर्वात महत्त्वाकांक्षी आणि महागड्या सार्वजनिक आरोग्य कार्यक्रमांपैकी एक असलेल्या, २० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त खर्चाच्या आणि जवळपास प्रत्येक देशाचा समावेश असलेल्या प्रगतीमध्ये अडथळा निर्माण झाला आहे.
मोहिमेच्या सुरुवातीपासून शेकडो आरोग्य कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचारी मारले गेले आहेत. पाश्चात्य नेतृत्वाखालील उपक्रमाशी त्यांच्या कथित संबंधांमुळे या कर्मचाऱ्यांना लक्ष्य केले गेले. WHO चे पोलिओ विभागाचे संचालक डॉ. जमाल अहमद यांनी पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील मोहिमेच्या धोरणांचे समर्थन केले आणि प्रतिरोधक प्रदेशांसाठी तयार केलेल्या स्थानिक हस्तक्षेपांकडे लक्ष वेधले. “गेल्या ४० वर्षांमध्ये केलेल्या कामामुळे आज इतक्या मुलांना संरक्षण मिळत आहे. आव्हानांना जास्त नाट्यमय बनवू नका, कारण त्यामुळे मुले पोलिओला बळी पडतात”, असे अहमद म्हणाले. पुढच्या १२ ते १८ महिन्यांत हा विषाणू पूर्णपणे नष्ट होऊ शकेल अशी आशा अहमद यांनी व्यक्त केली आहे. या मोहिमेचे लक्ष्य आता २०२९ ठेवण्यात आले आहे. हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी पाकिस्तानात अंदाजे ४.५ कोटी आणि अफगाणिस्तानात १.१ कोटी मुलांना लसीकरण करणे आवश्यक आहे असेही ते म्हणाले.
अंतर्गत अहवालांमध्ये वारंवार त्रुटी
२०१७ च्या सुरुवातीला स्थानिक कर्मचारी त्यांच्या वरिष्ठांना गंभीर समस्यांबद्दल इशारा देत होते. तेव्हाच्या कागदपत्रांमध्ये खोटे लसीकरण रेकॉर्ड्स, अप्रिशिक्षित सदस्य आणि लसींचे अयोग्य व्यवस्थापन केल्याच्या अनेक घटनांचा तपशील आहे. ऑगस्ट २०१७ मध्ये अफगाणिस्तानातील कंधार इथल्या एका अहवालात स्थानिक अधिकारी आणि इतरांच्या हस्तक्षेपामुळे अल्पवयीन आणि निरक्षर स्वयंसेवकांची लसीकरणकर्ता म्हणून नियुक्ती कशी झाली याबाबत सांगितले आहे.
दोन्ही देशांमधील आरोग्य कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी अंतर्गत कागदपत्रांमधील मजकुराची माहिती दिली. सांस्कृतिक संवेदनशीलता, लसींवरील अविश्वास आणि दीर्घकालीन गरिबी या परिस्थितीत घरोघरी जाऊन लसीकरण करण्यात अडचणी असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
तोंडावाटे लस देण्याचा मुद्दा वादग्रस्त
१९५५ मध्ये पहिली पोलिओ लस उपलब्ध होण्याआधी दूषित पाणी आणि विष्ठेद्वारे पसरणारा हा विषाणू दरवर्षी लाखो मुलांना अर्धांगवायूग्रस्त करत असे. तोंडी लसीशिवाय पोलिओ निर्मूलन अशक्य आहे, असे सीडीसी (रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्र)चे माजी संचालक आणि पोलिओ निर्मूलन पर्यवेक्षण मंडळाचे सध्याचे सदस्य डॉ. टॉम फ्रीडेन यांनी सांगितले.
पोलिओ रूग्णसंख्येत वाढ का?
- लस घेण्यास विरोध आणि गैरसमज
- तोंडावाटे लस घेण्याबाबत गैरसमज
- कट्टरतावादी संघटनांचा विरोध
- राजकीय अस्थिरता आणि त्यामुळे होणारा संघर्ष
- दुर्गम, डोंगराळ भागात लस न पोहोचणे
- लसीकरण कार्यक्रमातील भ्रष्टाचार
अनेक गावकऱ्यांनी पोलिओवर लक्ष केंद्रित केल्याबाबत निषेध केला आहे. २०२३ पासून शेकडो लोकांनी बहिष्कार टाकले आहेत. आरोग्य कर्मचारी बहुतेकदा सशस्त्र संरक्षणाखाली काम करतात. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १९९० पासून २०० हून अधिक आरोग्य कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचारी मारले गेले आहेत. यामध्ये अतिरेक्यांचाही सहभाग होता. पोलिओ लसीबाबत खोटी माहिती पसरवली जाते. लसीमध्ये डुकराचे मूत्र असते किंवा त्यामुळे अकाली वंध्यत्व येते अशा अफवा पसरवल्या जात आहेत.
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे जगातील एकमेव असे देश आहेत, जिथे पोलिओ विषाणू अजूनही अस्तित्वात आहे. या विषाणूच्या अस्तित्वाचे एक कारण म्हणजे लोक त्यांच्या मुलांना लसीकरण करण्यास नकार देतात. पोलिओ आरोग्य कर्मचारीदेखील दहशतवादी गटांकडून हत्या आणि हल्ल्यांचे बळी ठरले आहेत. कमाल यांनी घोषणा केली की, २१ एप्रिलपासून आणखी एक देशव्यापी पोलिओ लसीकरण मोहीम सुरू होईल, ज्यामध्ये किमान ४,१५,००० पोलिओ कर्मचारी सहभागी होतील. त्यांनी नागरिकांना त्यांचा आदर करण्याचे आणि त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. “कृपया त्यांचा आदर करा, कारण ते तुमच्या मुलांचे भविष्य सुरक्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत,” असे त्यांनी आवाहन केले.
पाकिस्तानात आणि अफगाणिस्तानाच पोलिओ विषाणू अजूनही अस्तित्वात आहे. या विषाणूच्या अस्तित्वाचे एक कारण म्हणजे लोक त्यांच्या मुलांना लसीकरण करण्यास नकार देतात. काही दिवसांपूर्वी आरोग्यमंत्र्यांनी लोकांना या मोहिमेत आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहनही केले होते