अनेक मराठी घरांमध्ये टोमॅटो- कांदा रस्सा भाजी ही अनेकांची आवडती असते, रसरशीत आणि मसालेदारही. टोमॅटो आणि मसाल्याने चव येते बटाट्याला. पण आजवर आपण कधी असा विचार केला आहे का की, टोमॅटो आणि बटाटा हे एकमेकांचे नातेवाईक असावेत? तर वाचून धक्का बसेल, पण ते खरंच एकमेकांचे घनिष्ट नातेवाईक आहेत आणि तेही आताचे नाही तर हे नातं अस्तित्त्वात आलं, ते तब्बल ९० लाख वर्षांपूर्वी! मात्र ते संशोधकांना लक्षात आलं, ते मात्र अगदी अलीकडे २०२५ सालच्या ऑगस्ट महिन्यात!
बटाटा आणि टोमॅटो यांचा मिलाफ
बटाट्याच्या उत्क्रांतीचा प्रवास रंजक आहे. सध्या जगभरातील मंडळी क्लायमेट चेंज अर्थात वातावरण बदलाने हैराण आहेत. काही ठिकाणी पावसाने ठाण मांडलंय तर काही ठिकाणी वातावरणाचा प्रवास वाळवंटी प्रदेशाच्या दिशेने सुरू आहे. त्यामुळे पराकोटीच्या तीव्र वातावरणबदलांना सामोरे जाताना अन्न सुरक्षा कशी अबाधित राखता येईल, यावर जगभरात संशोधन सुरू आहे. या संशोधनादरम्यान बटाट्याच्या उत्क्रांतीचा हा प्रवास संशोधकांसमोर अवचित उलगडला. त्यात लक्षात आले की, बटाटा आणि टोमॅटो यांचे घनिष्ट नातेसंबंध आहेत आणि तेही आताचे नाही तर तब्बल ९० लाख वर्षांपूर्वीचे. तेही नैसर्गिक पद्धतीने झालेल्या परागीभवनाद्वारे अस्तित्त्वात आले. या प्रस्तुत संशोधनामध्ये बटाट्यामध्ये चक्क टोमॅटोची जनुकं आढळली आहेत. शेंझेंन येथील अॅग्रीकल्चर जिनोमिक्स इन्स्टिट्यूट, चायनीज अॅकेडमी ऑफ अॅग्रीकल्चर सायन्सेस आणि चीनमधील लान्झोऊ विद्यापीठ यांनी कॅनडा आणि युनायडेट किंग्डममधील संशोधकांच्या मदतीने हा संशोधन प्रकल्प हाती घेतला होता.
बटाट्याच्या जनुकांत बदल
बटाट्याच्या लागवडीखाली असलेल्या ४५० वाणांवर व वन्य बटाट्यांच्या ५६ प्रजातींवर वैज्ञानिकांनी संशोधन केले. त्यांची जनुकं तपासण्यात आली. त्यातून आज आपण वापरत असलेल्या बटाट्यापर्यंत आपण कसे पोहोचलो, ते संशोधकांना लक्षात आले. आज आपण ओळखतो त्या बटाटाला tuber म्हणतात, तो जमिनीखाली तयार होतो. टोमॅटोचे फळ तयार होण्यास जी जनुकं मदत करतात, त्याच जनुकांनी बटाट्याच्या जनुकांत बदल घडवून आणले आणि तेव्हाच्या वातावरणबदलाच्या तडाख्यात तेव्हाचा बटाटा हा भूमिगत झाला. अर्थात तो जमिनीखाली तयार होण्यासाठी उत्परिवर्तन झाला. ही बटाट्यामधील सर्वात मोठी उत्क्रांतीच होती.
कसे आणि कधी झाले हे उत्परिवर्तन?
विद्यमान बटाट्याचे शास्त्रीय नाव सोलेनम ट्युबरोसम Solanum tuberosum आहे. या संशोधनानुसार, त्या काळी दक्षिण अमेरिकेत बटाट्यासारखीच असणारी एक प्रजाती होती. त्याला लागणारे बटाटे हे जमिनीखाली नव्हते. सध्या पेरूमध्ये बटाट्यासारखी आढळणारी प्रजाती इट्युबरोसम Etuberosum नावाने ओळखली जाते. तिची पूर्वज असलेली ही प्रजाती आणि टोमॅटो यांच्या एकत्रित परागीभवनातून आजचा बटाटा उत्परिवर्तीत झाला. परागीभवनाच्या प्रक्रियेत टोमॅटोमधील फळाला आकार देणारे जनुक बटाट्यामध्ये नैसर्गिकरित्या शिरले आणि या मिलनप्रक्रियेतून नवीन बटाटा तयार झाला, जो जमिनीखाली पिकू लागला. त्या दोघांचीही पूर्वज असलेली वनस्पती १४० लाख वर्षांपूर्वी एकमेकांपासून वेगळी झाली होती.त्यानंतर ५० लाख वर्षांनंतर पुन्हा एकदा परागीभवनातून या दोन्ही वनस्पतींचे जनुक एकत्र आले आणि ९० लाख वर्षंपूर्वी आजचा बटाटा अस्तित्त्वात आला.

हे घडले कुठे?
पृथ्वीच्या पोटातील हालचाली आणि वातावरणातील बदलांमुळे (विशेषतः अँडिज पर्वतरांगेत) हे वैशिष्ट्यपूर्ण परागीभवन घडून आले. याला संशोधकांनी नैसर्गिक पुनर्रचना restructuring असे म्हटले आहे. त्या पुनर्रचना प्रक्रियेत नव्याने निर्माण झालेल्या बटाट्याच्या प्रजातीत tuber म्हणजेच जमिनीखाली तो विकसित होण्याची क्षमता अस्तित्त्वात आली.
बटाट्याची दीर्घकालीन टिकाऊ शक्ती
टोमॅटो आणि बटाटा हे दोन्ही nightshade प्रजातीतील आहेत — टोमॅटोमध्ये स्वाभाविकपणे फळ खाल्ले जाते. तर बटाट्यामध्ये जमिनीखाली येणाऱ्या गाठी किंवा कंद म्हणजेच बटाटा खाल्ला जातो. बटाट्याच्या कंदामुळे वनस्पतीची दीर्घकाळ ऊर्जा साठवून ठेवण्याची क्षमता वाढली. सध्याच्या हवामानबदलाच्या कालखंडात बटाट्याच्या याच क्षमतेचा वापर करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयोगादरम्यान संशोधकांना बटाट्यातील या उत्परिवर्तनाचा शोध लागला, हे विशेष!