अन्वय सावंत

भारतीय बुद्धिबळाने गेल्या काही वर्षांत झपाट्याने प्रगती केली असून याचा प्रत्यय अझरबैजानमध्ये बाकू येथे सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेतही येत आहे. विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच भारताच्या चार बुद्धिबळपटूंना उपांत्यपूर्व फेरीचा टप्पा गाठण्यात यश आले. यापैकी डी. गुकेश, विदित गुजराथी आणि अर्जुन एरिगेसी यांचे स्पर्धेतील आव्हान या फेरीत संपुष्टात आले. मात्र, आर. प्रज्ञानंदने एरिगेसीला नमवत विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली. तसेच या यशामुळे त्याने पुढील वर्षी होणाऱ्या ‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धेसाठीही पात्रता मिळवली आहे. प्रज्ञानंदच्या या यशाचे आणि ‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धेचे महत्त्व काय, याचा आढावा.

‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धा म्हणजे काय?

‘कॅन्डिडेट्स’ म्हणजेच आव्हानवीरांची स्पर्धा. या स्पर्धेतून जगज्जेत्याला आव्हान देणारा बुद्धिबळपटू निश्चित केला जातो. ही स्पर्धा पुढील वर्षी एप्रिलमध्ये कॅनडा येथे रंगणार आहे. या स्पर्धेत एकूण आठ बुद्धिबळपटू खेळणार असून सध्या सुरू असलेल्या विश्वचषकातील अव्वल तीन खेळाडू ‘कॅन्डिडेट्स’साठी थेट पात्र ठरले आहेत. त्याचप्रमाणे जागतिक अजिंक्यपद लढतीतील गतउपविजेत्या इयान नेपोम्नियाशीलाही थेट प्रवेश मिळाला आहे. याव्यतिरिक्त ‘फिडे’ ग्रँप्री स्पर्धेतील अव्वल दोन बुद्धिबळपटू, २०२३ ‘फिडे सर्किट’चा विजेता आणि जानेवारी २०२४ मध्ये सर्वाधिक गुणांकन असलेला बुद्धिबळपटूही ‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धेसाठी पात्र ठरेल. या आठ बुद्धिबळपटूंमध्ये होणाऱ्या ‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धेतील विजेता खेळाडू सध्याचा जगज्जेता डिंग लिरेनला जागतिक अजिंक्यपदाच्या लढतीत आव्हान देईल.

प्रज्ञानंद ‘कॅन्डिडेट्स’साठी कसा पात्र ठरला?

प्रज्ञानंदने विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेतील संघर्षपूर्ण झालेल्या उपांत्यपूर्व लढतीत भारताच्याच अर्जुन एरिगेसीवर मात केली. प्रज्ञानंदने ‘सडन डेथ टायब्रेकर’मध्ये विजय नोंदवला. या विजयासह त्याने उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. प्रज्ञानंदसह पाच वेळचा जगज्जेता नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन, अझरबैजानचा निजात अबासोव आणि अमेरिकेचा फॅबिआनो कारूआना या बुद्धिबळपटूंनीही विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली आहे. या चारपैकी तीन बुद्धिबळपटू ‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धेसाठी पात्र ठरणार हे निश्चित होते. मात्र, उपांत्यपूर्व फेरीची लढत जिंकल्यानंतर कार्लसनने आपण ‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धेत खेळणार नसल्याचे स्पष्ट केले. ‘‘मी ‘कॅन्डिडेट्स’मध्ये खेळणार नाही हे सर्वांनी गृहीत धरावे. त्यामुळे विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठणारे अन्य सर्व बुद्धिबळपटू ‘कॅन्डिडेट्स’साठी पात्र ठरतील,’’ असे कार्लसन म्हणाला. त्याने माघार घेतल्यामुळे प्रज्ञानंद, कारूआना आणि अबासोव या तिघांचा ‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धेत खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

प्रज्ञानंदचे हे यश खास का?

‘लाइव्ह रेटिंग’नुसार (क्रमवारी) प्रज्ञानंद सध्या भारताचा तिसरा सर्वोत्तम बुद्धिबळपटू आहे. त्याने विदित गुजराथीला मागे टाकले असून तो एकूण क्रमवारीत २३व्या स्थानी आहे. त्याच्यापुढे गुकेश (आठव्या स्थानी) आणि विश्वनाथन आनंद (नवव्या स्थानी) हे दोनच भारतीय बुद्धिबळपटू आहेत. प्रज्ञानंदने १८व्या वर्षीच हे यश मिळवले आहे. विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठणारा, तसेच ‘कॅन्डिडेट्स’साठी पात्र ठरणारा प्रज्ञानंद हा दुसराच भारतीय आहे. यापूर्वी ही कामगिरी पाच वेळचा विश्वविजेता आणि बुद्धिबळ इतिहासातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक असलेल्या आनंदने केली आहे. तसेच ‘कॅन्डिडेट्स’साठी पात्र ठरणारा तो कार्लसन आणि बॉबी फिशर यांच्यानंतरचा सर्वांत युवा बुद्धिबळपटू आहे. त्यामुळेच त्याचे हे यश वैयक्तिक पातळीवर आणि भारतीय बुद्धिबळासाठीही खास ठरते.

अन्य कोणते बुद्धिबळपटू ‘कॅन्डिडेट्स’साठी पात्र ठरू शकतील?

गेल्या (२०२२) ‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धेत नेपोम्नियाशी आणि लिरेन हे अव्वल दोन स्थानांवर राहिले होते. तत्कालीन जगज्जेता कार्लसनने जागतिक अजिंक्यपदाच्या लढतीत खेळण्यास नकार दिल्याने या दोघांमध्येच जागतिक लढत झाली. यात लिरेन विजयी ठरला. याव्यतिरिक्त तेमुर राजाबोव, हिकारू नाकामुरा, कारूआना, अलिरेझा फिरौजा, यान-क्रिस्टोफ डुडा आणि रिचर्ड रॅपपोर्ट ‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धेत खेळले होते. यापैकी नेपोम्नियाशी आणि कारूआना यंदाच्या स्पर्धेसाठीही पात्र ठरले आहेत. तसेच जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेला नाकामुरा आणि पाचव्या स्थानी असलेला फिरौजा हेसुद्धा ‘कॅन्डिडेट्स’साठी पात्र ठरण्याची दाट शक्यता आहे. भारताकडून गुकेशला पात्रतेची सर्वोत्तम संधी आहे. गुकेशने गेल्या काही काळात चमकदार कामगिरी केली असून त्याच्याकडून भारताला सर्वाधिक आशा आहे.