AI detect colorectal cancer दरवर्षी लाखो लोकांना कर्करोगामुळे (कॅन्सर) आपला जीव गमवावा लागतो. भारतात कर्करोगाची नवीन प्रकरणे सातत्याने वाढत असल्याने तज्ज्ञांनी याविषयी चिंता व्यक्त केली आहे. मुख्य म्हणजे भारतातील ७० टक्के कर्करोगाच्या प्रकरणांसाठी आपल्या दैनंदिन जीवनातील काही घटक कारणीभूत असल्याचेही सांगण्यात आले आहे, त्यामुळे कर्करोगाचे वेळेत निदान होणे फार महत्त्वाचे आहे.
आतड्याचा कर्करोग (कोलोरेक्टल कॅन्सर) हा जगभरातील सर्वात सामान्य कर्करोगांपैकी एक आहे आणि कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. याचे वाढते प्रमाण थांबवण्यासाठी जगभरात प्रयत्न केले जात आहेत. या कर्करोगाच्या निदानासाठी आता एआय प्रभावी ठरणार असल्याचे आरोग्यतज्ज्ञांचे सांगणे आहे. आतड्याचा कॅन्सर ओळखण्यासाठी एआय कसे प्रभावी ठरणार? कोलोरेक्टल कॅन्सरच्या धोक्याविषयी आरोग्यतज्ज्ञ काय सांगतात? जाणून घेऊयात…
कोलोरेक्टल कर्करोग किती गंभीर? एआयच्या मदतीने कसे होणार निदान?
- भारतात सहा प्रकारचे कर्करोग जास्त प्रमाणात आढळतात, ज्यामध्ये फुफ्फुसांचा कर्करोग, तोंडाचा कर्करोग, पोटाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोग आणि कोलोरेक्टल कर्करोग यांचा समावेश आहे.
- कोलोरेक्टल कर्करोग हा मोठ्या आतड्याचा कर्करोग आहे.
- या कर्करोगाचे वेळीच निदान झाल्यास उपचार केल्यास तो मोठ्या प्रमाणात टाळता येण्याजोगा आहे. मात्र, त्याच्या तपासणीचा (Screening) दर खूप कमी आहे, असे डॉक्टर्स सांगतात.
- दर कमी असण्याचे मुख्य कारण म्हणजे सध्या निदानासाठी केली जाणारी कोलोनोस्कोपी (Colonoscopy) चाचणी.
- या प्रक्रियेत कोलन (मोठ्या आतड्याच्या) आणि गुदाशयाच्या आतील भागाची तपासणी करण्यासाठी कोलोनोस्कोप नावाची कॅमेरा असलेली एक लांब, लवचिक नळी गुदाशयातून आत टाकली जाते जेणेकरून कोलन पाहता येईल.
- मात्र, युनिव्हर्सिटी ऑफ जिनेव्हा येथील शास्त्रज्ञांनी कोलोरेक्टल कर्करोग ओळखण्यासाठी नवीन मार्ग शोधून काढला.

शास्त्रज्ञांनी उप-प्रजातीच्या स्तरावरील (Sub-species level) आतड्यामधील जीवाणूंची पहिली सविस्तर यादी तयार केली आहे. विष्ठेच्या नमुन्यांवर (Stool samples) ‘मशीन लर्निंग’चा वापर करून त्यांनी ही यादी तयार केली. त्यानंतर याच यादीचा वापर कोलोरेक्टल कर्करोगाची उपस्थिती ओळखण्यासाठी केला आहे आणि यात त्यांनी ९० टक्के अचूकता मिळवली आहे. ही अचूकता कोलोनोस्कोपीच्या निष्कर्षांच्या जवळ असल्याचे त्यांचे सांगणे आहे. नवी दिल्लीतील इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल्स येथील वैद्यकीय ऑन्कोलॉजीचे वरिष्ठ सल्लागार डॉ. अंकित जैन म्हणतात, “यामुळे कर्करोगाच्या तपासणीत मोठी क्रांती होऊ शकते आणि या चाचण्या परवडणाऱ्यादेखील होऊ शकतात.”
आतड्यातील मायक्रोबायोमची भूमिका काय?
मानवी आतड्यात अब्जावधी सूक्ष्मजीव असतात, ज्यांना एकत्रितपणे ‘मायक्रोबायोम’ म्हणतात. पचन, रोगप्रतिकारशक्ती आणि एकूण आरोग्यामध्ये हे सूक्ष्मजीव महत्त्वाची भूमिका बजावतात. मायक्रोबायोममध्ये होणारे बदल कोलोरेक्टल कर्करोगासह अनेक रोगांशी जोडलेले असल्याचे अनेक पुरावे आहेत. संशोधक आता उप-प्रजाती स्तरापर्यंत मायक्रोबायोमचा अधिक अभ्यास करू शकत आहेत. विष्ठेच्या नमुन्यांवर कृत्रिम बुद्धिमत्तेचा (Artificial intelligence) वापर करून, हे नमुने अचूकतेसह ओळखणे शक्य होत आहे.
विष्ठेवर आधारित तपासणीचे फायदे काय?
कर्करोग ओळखू शकणारी विष्ठा तपासणी कोलोनोस्कोपीपेक्षा अधिक फायद्याची ठरू शकते. जसे की, यासाठी भूल, उपकरणांचा वापर किंवा रुग्णालयात जाण्याची आवश्यकता नाही. ही चाचणी सोयीस्कर असेल, म्हणजेच नमुने घरीच गोळा करता येतील, ज्यामुळे कमीत कमी अडथळा निर्माण होईल. मुख्य म्हणजे या स्वरूपाची चाचणी परवडणारी असेल. कोलोनोस्कोपीच्या तुलनेत याचा खर्च कमी असेल, ज्यामुळे तपासणी अधिक सुलभ होईल. अशा चाचणीमुळे तपासणी कार्यक्रमांमध्ये अधिक सहभाग वाढू शकतो, ज्यामुळे लवकर निदान होईल आणि मृत्यूचे प्रमाण कमी होईल.
एआयपेक्षा कोलोनोस्कोपी अधिक अचूक आहे का?
कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित विष्ठेच्या चाचण्या अजून व्यापक वैद्यकीय वापरासाठी तयार नाहीत. या तंत्रज्ञानावर अजूनही संशोधन सुरू आहे आणि त्यांना प्रमाणित वैद्यकीय प्रॅक्टिसमध्ये समाविष्ट करण्यापूर्वी त्याचे प्रमाणीकरण आवश्यक आहे. हेदेखील लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, कोलोनोस्कोपीचे निदानापलीकडेही फायदे आहेत. या प्रक्रियेमुळे डॉक्टरांना आतड्यांचे थेट निरीक्षण करता येते आणि त्याच वेळी कर्करोगपूर्व गाठी काढून टाकता येतात. याउलट, विष्ठेवर आधारित चाचण्यांमुळे केवळ रोगाचे निदान होते आणि उपचारांसाठी नंतरही कोलोनोस्कोपी करण्याची आवश्यकता असू शकते. ‘फेकल इम्युनोकेमिकल टेस्ट’सारख्या इतर विष्ठेवर आधारित चाचण्या आधीच उपलब्ध आहेत आणि त्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.
कोलोरेक्टल कर्करोग टाळण्यासाठी कधी तपासणी करावी?
वैद्यकीय मार्गदर्शक तत्त्वांनुसार, ४५ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या प्रौढांना नियमित कोलोरेक्टल कर्करोग तपासणी करण्याचा सल्ला दिला जातो. ज्यांच्या कुटुंबात या कर्करोगाचा इतिहास आहे किंवा ज्यांना इतर अतिरिक्त धोकादायक घटक (Risk factors) आहेत, त्यांना लवकरात लवकर तपासणी सुरू करण्याची आवश्यकता असू शकते. रोगप्रतिकारक शक्ती कमी करणाऱ्या औषधांचा वापर, लाल मांसाचे सेवन, जास्त मद्यपान आणि लठ्ठपणा यामुळे हा आजार होण्याचा धोका वाढतो.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, फुफ्फुसाच्या कर्करोगानंतर हा दुसरा सर्वात सामान्य कर्करोग आहे. कर्करोग होऊ नये यासाठी आरोग्यदायी जीवनशैली महत्त्वाची असल्याचे तज्ज्ञ सांगतात. त्यासाठी व्यायाम करणे, भरपूर फायबर्स घेणे, फॅट्स किंवा स्निग्धपदार्थ यांचे सेवन कमी करणे आणि पाणी पिण्याचे प्रमाण वाढवणे महत्त्वाचे आहे.