Cancer is Genetic Or Lifestyle Disease जगभरात आज कर्करोगाचे (कॅन्सर) प्रमाण वाढत चालले आहे. जीवघेण्या कर्करोगाच्या रूग्णांच्या संख्येत मोठी वाढ पहायला मिळाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार कर्करोग हा जगातील सर्वात मोठा मारक ठरत आहे. आता कर्करोगावर केलेल्या संशोधनात महत्त्वाच्या गोष्टी उघड झाल्या आहेत. या संशोधनात कर्करोग अनुवंशिक आहे की याला जीवनशैली कारणीभूत आहे, याचा अभ्यास करण्यात आला आहे. संशोधनात नक्की काय समोर आले? कर्करोग नक्की कशामुळे उद्भवतो आणि त्याचा धोका टाळता येणे शक्य आहे का? त्याविषयी जाणून घेऊयात…

कर्करोगाविषयीच्या नव्या अभ्यासात काय?

  • शरीरात नवीन नॉर्मल पेशी तयार होत असतात, ज्या नेमून दिलेले कार्य योग्य पद्धतीने करतात. कार्य संपल्यास जुन्या पेशींना मारून तिथे नवीन पेशी तयार होतात.
  • शरीरात होणार्‍या या प्रक्रियेत अडथळा निर्माण झाल्यास कर्करोग उद्भवू शकतो.
  • इन्फेक्शन, विषाणू बाधा, अनुवंशिकता इत्यादी कारणांनी या जनुकांमध्ये बदल झाल्यास वरील प्रक्रियेत अडथळा येतो, पेशींच्या आकारात वाढ होते आणि स्वभावही बदलतो, त्यामुळे कर्करोगाची लक्षणे दिसू लागतात.
  • कर्करोगाचे १०० पेक्षा जास्त प्रकार आहेत.
शरीरात नवीन नॉर्मल पेशी तयार होत असतात, ज्या नेमून दिलेले कार्य योग्य पद्धतीने करतात. (छायाचित्र-लोकसत्ता संग्रहित)

आरोग्यतज्ज्ञ त्यांचे तीन प्रकारांमध्ये वर्गीकरण करतात. त्यात सॉलिड कॅन्सर (त्वचा, स्तन, आतड्यांचा, फुफ्फुसांचा, हाडांचा, ऊतींचा), ब्लड कॅन्सर आणि मिक्स्ड कॅन्सर यांचा समावेश आहे. आकडेवारी दर्शवते की भारतातील दर १०० पैकी ११ लोकांना त्यांच्या आयुष्यात कधीतरी कर्करोग होण्याची शक्यता असते. २०२४ मध्ये, भारतात अंदाजे १५.६ लाख नवीन कर्करोगाच्या रुग्णांची नोंद झाली आणि या रोगामुळे सुमारे ८.७४ लाख लोकांचा मृत्यू झाला, असे त्यात म्हटले आहे.

कर्करोग अनुवंशिक आहे का?

क्लीव्हलँड क्लिनिक सांगते की, कर्करोग तेव्हा होतो जेव्हा पेशींच्या कार्याचे व्यवस्थापन करणाऱ्या जनुकांमध्ये बदल होतो. त्यामुळे असामान्य पेशी तयार होतात, ज्या विभाजित होतात आणि त्यांची संख्या वाढत जाते. या पेशींची संख्या वाढल्यास त्या तुमच्या शरीराच्या कार्यात अडथळा निर्माण करतात. या पेशी कर्करोगाच्या गाठी (Tumours) तयार करतात. कर्करोगाच्या पेशी गाठींमधून वेगळ्या होऊन ‘Lymphatic system’ किंवा रक्तप्रवाहाद्वारे शरीराच्या इतर भागांमध्ये पसरू शकतात. वैद्यकीय संशोधकांच्या मते, अनुवंशिक जनुकीय उत्परिवर्तनामुळे सुमारे पाच टक्के ते १० टक्के कर्करोगाची प्रकरणे नोंदवण्यात येतात. बऱ्याचदा, कर्करोग हा एक्वायर्ड जेनेटिक म्युटेशनमुळे उद्भवतो.

अनुवंशिक कर्करोगाविषयी संशोधन काय सांगते?

१७००० पेक्षा जास्त एंडोमेट्रियल कर्करोगाच्या रुग्णांचा समावेश असलेल्या GWAS (Genome-wide association studies) मेटा-विश्लेषणात, एंडोमेट्रियल कर्करोगाच्या धोक्याशी संबंधित शरीरातील पाच नवीन अनुवंशिकतेशीसंबंधित ठिकाणे ओळखली गेली. हा शोधनिबंध ‘eBioMedicine’ मध्ये ८ जुलै २०२५ रोजी प्रकाशित झाला होता. एप्रिल २०२५ मध्ये क्लिनिकल प्रोटीओमिक ट्यूमर ॲनालिसिस कन्सोर्टियम (CPTAC) च्या आकडेवारीचा वापर करून माउंट सिनाईच्या संशोधकांनी प्रकाशित केलेल्या एका अभ्यासात शास्त्रज्ञांनी दाखवले की, अनुवांशिक जनुकीय प्रकार (inherited germline variants) केवळ कर्करोगाच्या धोक्यावरच नाही तर ट्यूमरच्या जीवशास्त्रावर (tumour biology) देखील परिणाम करतात.

नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटने (NCI) २६ एप्रिल २०२४ रोजी प्रकाशित केलेल्या एका मोठ्या विश्लेषणात, किडनी कर्करोगाची ५० नवीन जनुकीय ठिकाणे (genetic risk loci) ओळखली. ऑक्टोबर २०२४ मध्ये, आईसलँडच्या ‘deCODE genetics’ च्या संशोधकांनी, विविध कर्करोगांचा धोका वाढवणारे सहा नवीन दुर्मिळ जनुकीय प्रकार ओळखले. मार्च २०२५ मध्ये, स्टॅनफर्डच्या संशोधकांनी १३ प्रमुख कर्करोगांच्या प्रकारांमधील लाखो जीनोमचे विश्लेषण केले आणि कर्करोगाच्या धोक्याशी संबंधित जनुकांवर परिणाम करणारे सुमारे ३८० अनुवांशिक डीएनए प्रकार (Inherited DNA variants) शोधले.

कर्करोगाला कारणीभूत ठरणाऱ्या पर्यावरणीय किंवा जीवनशैलीच्या घटकांबद्दल संशोधन काय सांगते?

जीवनशैली आणि पर्यावरणीय कारणांमध्ये धूम्रपान, आहार, लठ्ठपणा, प्रदूषण, संसर्गजन्य घटक, निष्क्रिय जीवनशैली, विषारी पदार्थांच्या संपर्कात येणे यांचा समावेश होतो. या वर्षी धूम्रपान न करणाऱ्या आणि फुफ्फुसांचा कर्करोग झालेल्या रुग्णांवरील अनेक देशांमधील अभ्यासानुसार असे दिसून आले की, वायू प्रदूषण धूम्रपान न करणाऱ्यांच्या डीएनएतही बदल करू शकते. शर्लक-लंग स्टडी नावाच्या या संशोधनाने हे उघड केले की हवेतील प्रदूषकांच्या संपर्कात येण्यामुळेही गंभीर परिणाम होतात.

२०२३ मध्ये, ओपन ॲक्सेस जर्नल बीएमजे ऑन्कोलॉजीने गेल्या तीन दशकांत (१९९०-२०१९) जगभरात ५० वर्षांखालील लोकांमध्ये कर्करोगाच्या नवीन प्रकरणांमध्ये ७९ टक्के वाढ झाल्याचे नोंदवले. २०१९ मध्ये या वयोगटात स्तनाच्या कर्करोगाची (Breast cancer) संख्या सर्वाधिक होती. पण १९९० पासून श्वासनलिकेचा (Nasopharynx) आणि प्रोस्टेटचा (prostate) कर्करोग सर्वात वेगाने वाढला आहे, असे विश्लेषणात दिसून आले आहे. “२०१९ मध्ये तरुण प्रौढांमध्ये सर्वाधिक मृत्यू आणि आरोग्याची हानी करणारे कर्करोग म्हणजे स्तन, श्वासनलिका, फुफ्फुस, आतड्यांचा आणि पोटाचा कर्करोग आहे,” असे त्यात म्हटले आहे.

यात जनुकीय घटकांबद्दल सांगण्यात आले असले तरी, लाल मांस, मिठाचे अधिक सेवन, फळे व दुधाचे सेवन न करणे, मद्यपान करणे आणि तंबाखूचे सेवन पर या गोष्टी हे ५० वर्षांखालील लोकांमध्ये उद्भवणाऱ्या कर्करोगासाठी कारणीभूत ठरत आहेत. तसेच यात शारीरिक निष्क्रियता, अतिरिक्त वजन यावरही भर दिला आहे.

यातून काय निष्कर्ष निघतो?

जनुकीय/अनुवंशिक घटक कर्करोगाच्या सुमारे पाच ते २० टक्के प्रकरणांसाठी जबाबदार आहेत. कर्करोगाची ही प्रकरणे वय आणि कौटुंबिक इतिहासावर अवलंबून असतात. तर दुसरीकडे जीवनशैली, पर्यावरणीय धोक्यात तंबाखूचा वापर, आहार, लठ्ठपणा, शारीरिक निष्क्रियता, प्रदूषण, संसर्गजन्य घटक (उदा. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासाठी HPV) यांचा समावेश होते. अनेकदा तपासणीत विलंब आणि उशीरा निदान झाल्यास मृत्यूचा धोका वाढतो.

कर्करोगाचा धोका टाळता येऊ शकतो?

तज्ज्ञांच्या मते, सार्वजनिक आरोग्य आणि प्रतिबंधक प्रयत्नांनी धूम्रपान, आहार, लठ्ठपणा, प्रदूषण, संसर्ग प्रतिबंध, तपासणी यांसारखे धोके कमी करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, तसेच जनुकीय संशोधनाचा विस्तार केला पाहिजे. याचे सर्वात सोपे उत्तर ऑगस्टमध्ये पबमेड (Pubmed) मध्ये प्रकाशित झालेल्या नवीनतम संशोधनात आहे, असे तज्ज्ञांचे सांगणे आहे. संशोधनात नमूद आहे, “स्तनाच्या कर्करोगातून वाचलेल्यांमध्ये आरटी (RT) किंवा एचआयआयटी (HIIT) च्या एकाच सत्राने कर्करोगविरोधी मायोकाइन्सची (Anti-cancer myokines) पातळी वाढू शकते आणि इन विट्रोमध्ये (in vitro) एमडीए-एमबी-231 (MDA-MB-231) पेशींची वाढ कमी होऊ शकते, त्यामुळे कर्करोग पुन्हा होण्याची शक्यता कमी होते.” सोप्या भाषेत सांगायचे तर, एकाच व्यायामाच्या सत्रामुळे असे बदल (Molecular changes) होऊ शकतात ज्यामुळे कर्करोगाच्या पेशींची वाढ कमी होऊ शकते.’