Cancer Rising in India जगभरात कर्करोगाच्या रुग्णांची आणि मृत्यूची संख्या कमी होत असली तरी भारतात मात्र ही संख्या वाढत आहे, असे ‘द लॅन्सेट’ने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अभ्यासात म्हटले आहे. भारतात कर्करोगाची नवीन प्रकरणे सातत्याने वाढत असल्याने तज्ज्ञांनी याविषयी चिंता व्यक्त केली आहे. मुख्य म्हणजे भारतातील ७० टक्के कर्करोगाच्या प्रकरणांसाठी आपल्या दैनंदिन जीवनातील काही घटक कारणीभूत असल्याचेही या अभ्यासात सांगण्यात आले आहे. त्याविषयी दिल्लीच्या एम्सयेथील ऑन्कोलॉजिस्ट (कर्करोगतज्ज्ञ) आणि या अभ्यासाचे एक सहयोगी डॉक्टर अभिषेक शंकर बोलले आहेत. दैनंदिन जीवनातील कोणते घटक कर्करोगास कारणीभूत ठरत आहेत? नवीन अभ्यास काय सांगतो? भारतातील कर्करोगाचे प्रमाण कसे कमी करता येणार? त्याविषयी जाणून घेऊयात…
नवीन अभ्यासातून काय समोर आले?
नवीन अभ्यासातील आकडेवारीनुसार, भारतातील कॅन्सरचा प्रसार १९९० मध्ये प्रति एक लाख लोकसंख्येमागे ८४.८ इतका होता. तो २०२३ मध्ये १०७.२ वर पोहोचला आहे. त्याचप्रमाणे, कर्करोगाचा मृत्युदर १९९० मध्ये प्रति एक लाख लोकसंख्येमागे ७१.७ होता, जो २०२३ मध्ये प्रति एक लाख लोकसंख्येमागे ८६.९ झाला आहे, म्हणजेच सुमारे १२.१ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की, भारतासह निम्न-मध्यम उत्पन्न असलेल्या देशांना (Lower-middle income countries) कर्करोगाच्या वाढत्या समस्येला तोंड देण्यासाठी आपल्या आरोग्य प्रणाली अधिक सक्षम करणे आवश्यक आहे. जागतिक बँक आणि इतर संस्थांच्या वर्गीकरणानुसार देशांची ही श्रेणी ठरते.
नेपाळ आरोग्य संशोधन परिषदेचे सह-लेखक डॉ. मेघनाथ धिमाल यांनी एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, “निम्न-मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये कर्करोगाचे वाढते प्रमाण ही एक मोठी आपत्ती आहे.” जगभरात कर्करोग होण्याचे आणि मृत्यूचे प्रमाण कमी होत असले तरी ताज्या ‘ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज’ (Global Burden of Disease) च्या अंदाजानुसार, केवळ संख्येच्या दृष्टीने विचार केल्यास कर्करोगाचे प्रमाण वाढतच जाईल आणि २०५० पर्यंत ३०.५ दशलक्ष लोकांना याचा फटका बसेल आणि १८.६ दशलक्ष लोकांचा मृत्यू होईल. या तुलनेत, आकडेवारीनुसार २०२३ मध्ये कर्करोगाचे अंदाजे १८.५ दशलक्ष रुग्ण होते आणि १.०४ कोटी मृत्यूंची नोंद करण्यात आली होती.

जागतिक स्तरावारी आकडेवारी बघितल्यास १९९० मध्ये २२०.६ इतका असलेला कर्करोगाचा प्रसार २०२३ मध्ये २०५.१ वर आला. मृत्युदर तर १५०.७ वरून ११४.६ पर्यंत घसरला. २०२५ पर्यंत हे प्रमाण १९२.९ पर्यंत आणखी कमी होण्याची शक्यता आहे, तसेच मृत्युदरही १०७.९ पर्यंत कमी होण्याची शक्यता आहे, असे आकडेवारी दर्शवते. यावरून असे सूचित होते की, कर्करोगाच्या रुग्णांच्या आणि मृत्यूच्या संख्येत झालेली वाढ ही वृद्ध होत असलेल्या लोकसंख्येमुळे झाली आहे.
या अभ्यासाविषयी तज्ज्ञ काय सांगतात?
या अभ्यासानुसार, यातील बहुतेक कर्करोगाचे रुग्ण आणि मृत्यू कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये होतील. अभ्यासात म्हटले आहे की, नवीन कर्करोगाच्या अर्ध्याहून अधिक रुग्णांची नोंद आणि कर्करोगामुळे दोन-तृतीयांश मृत्यू या देशांमध्ये होतील, त्यात भारताचाही समावेश आहे. डॉ. अभिषेक शंकर म्हणाले, “आपल्याला अनेक गोष्टींवर लवकरात लवकर काम करण्याची गरज आहे. पहिले म्हणजे, सतत जनजागृती मोहीम चालवण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून लोक कोणत्याही चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवणार नाहीत आणि लवकर उपचार घेतील. या मोहिमा फक्त कर्करोग दिन किंवा तंबाखू विरोधी दिनापुरत्या मर्यादित न ठेवता वर्षभर चालवल्या पाहिजेत.”
ते पुढे म्हणाले, “मानवी शरीराच्या प्रत्येक भागात वेगवेगळ्या प्रकारचा कर्करोग होऊ शकतो आणि त्याची कोणतीही लक्षणे निश्चित नसतात. कर्करोगाचे त्वरित निदान आणि उपचारांसाठी आपल्याला सर्वांना सहभागी करून घेण्याची गरज आहे,” असे त्यांनी सांगितले. महत्त्वाचे म्हणजे, कर्करोगावरील कोणताही कार्यक्रम नवीन उपचार पद्धतींना त्वरित स्वीकारण्यासाठी तयार असला पाहिजे, कारण कर्करोग उपचार खूप वेगाने विकसित होत आहे, असेही ते म्हणाले.
हा अभ्यास कशावर आधारित आहे?
देशातील ४३ कर्करोग नोंदीच्या (cancer registries) आकडेवारीवर आधारित अंदाजानुसार, भारतात २०२४ मध्ये १५.६ लाख कर्करोगाचे रुग्ण आणि ८.७४ लाख मृत्यू नोंदवले गेले. जागतिक आरोग्य संघटनेच्या ग्लोबल कॅन्सर ऑब्झर्व्हेटरीच्या अंदाजानुसार, २०२२ मध्ये अंदाजित १४.१ लाख रुग्ण आणि ९.१६ लाख मृत्यूंची नोंद करण्यात आली होती. हे दोन्ही अभ्यास, तसेच सध्याचे ‘ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज’ चे अंदाज आयसीएमआर समन्वयित कर्करोग नोंदीच्या आकडेवारीवर अवलंबून आहेत.
कर्करोगास कारणीभूत ठरणारे घटक
या अभ्यासानुसार, कर्करोगामुळे होणारे सुमारे ४२ टक्के मृत्यू सुधारणा करण्यायोग्य धोक्याच्या घटकांमुळे झाल्याचे नोंदवण्यात आले आहे. यात तंबाखू, दारूचे सेवन, अयोग्य आहार, उच्च रक्तदाब आणि मधुमेहावर नियंत्रण नसणे या कारणांचा समावेश आहे. याचा अर्थ, वर्तनाच्या बदलातून कर्करोगाचे प्रमाण कमी केले जाऊ शकते आणि मृत्युदरही कमी होऊ शकतो. भारतासाठी ही संधी अधिक मोठी आहे. डॉ. शंकर म्हणतात की, भारतातील कर्करोगाच्या ७० टक्के प्रकरणांसाठी याच गोष्टी कारणीभूत असू शकतात.
“भारतात लठ्ठपणा आणि मधुमेह असणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे, तसेच भारतात तंबाखू खाणाऱ्यांचीही मोठी संख्या आहे. एचपीव्ही, हिपॅटायटीस बी आणि एच पायलोरी यांसारख्या कर्करोगाशी संबंधित संसर्गाचे प्रमाण आपल्याकडे अधिक आहे. उच्च प्रदूषण पातळी हा भारतीयांसाठी आणखी एक अतिरिक्त धोक्याचा घटक आहे,” असे त्यांनी सांगितले. हवेची गुणवत्ता सुधारणे, संसर्ग टाळण्यासाठी स्वच्छता राखणे, एचपीव्ही आणि हिपॅटायटीस बीसाठी लसीकरण मोहीम राबवणे, या सर्वांमुळे देशातील कर्करोगाचा भार कमी करण्यास मदत होऊ शकते.