कर्नाटकची विधानसभा निवडणूक बहुमतात जिंकल्यानंतर आता काँग्रेस पक्षाचा आत्मविश्वास वाढला आहे. मध्य प्रदेशमध्ये विधानसभेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. या राज्यातही विजयी कामगिरी करण्यासाठी काँग्रेसने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी मध्य प्रदेशमध्ये सभेच्या माध्यमातून प्रचाराला सुरुवात केली आहे. काँग्रेस मध्य प्रदेशमधील जनतेला काय आश्वासने देत आहे? मध्य प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री तथा भाजपाचे नेते शिवराजसिंह चौहान यांचे आव्हान रोखण्यासाठी काँग्रेसची काय रणनीती आहे? हे जाणून घेऊ या…

शिवराजसिंह चौहान सरकारमध्ये फक्त घोटाळे- प्रियांका गांधी

प्रियांका गांधी यांनी १२ जून रोजी नर्मदा नदीच्या काठावर आरती करून मध्य प्रदेशाच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा श्रीगणेशा केला आहे. त्यांनी या वेळी जबलपूर येथे एका जाहीर सभेलाही संबोधित केले. या सभेतील भाषणादरम्यान त्यांनी भाजपा, मोदी सरकार तसेच मध्य प्रदेशमधील शिवराजसिंह चौहान सरकारवर सडकून टीका केली. “शिवराजसिंह चौहान यांचे ‘रिश्वत राज’ (भ्रष्टाचारी) सरकार आहे. मध्य प्रदेशमध्ये एकापाठोपाठ एक घोटाळे समोर येत आहेत. या राज्यात रेशन घोटाळा, शिष्यवृत्ती घोटाळा, व्यापम घोटाळा, पोलीस भरती घोटाळा, ऊर्जा विभागातील घोटाळा, करोना महासाथीच्या काळातला घोटाळा, ई-टेंडरमध्ये घोटाळा असे अनेक प्रकारचे घोटाळे समोर आले आहेत,” असा गंभीर आरोप प्रियांका गांधी यांनी केला.

हेही वाचा >> विश्लेषण : फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीला मुंबईत विरोध का?

आम्ही पाच आश्वासने पूर्ण करू- प्रियांका गांधी

त्यांनी या वेळी काँग्रेसच्या आश्वासनांचाही उल्लेख केला. मध्य प्रदेशमध्ये आमचे सरकार आल्यास आम्ही आमची पाच आश्वासने पूर्ण करू, असे प्रियांका गांधी यांनी सभेला संबोधित करताना सांगितले. कर्नाटक निवडणुकीतील विजय लक्षात घेऊन काँग्रेसने ही पाच आश्वासने दिली आहेत. याच आश्वासनांच्या मदतीने काँग्रेसने कर्नाटकमध्ये एकहाती सत्ता मिळवलेली आहे.

काँग्रेस मध्य प्रदेशच्या जनतेला कोणती पाच आश्वासने देत आहे?

मध्य प्रदेशच्या जनतेला आकर्षित करण्यासाठी काँग्रेसने एकूण पाच आश्वासने दिली आहेत. महिलांना प्रतिमहिना १५०० रुपये भत्ता, ५०० रुपयांना गॅस सिलिंडर, १०० रुपयांपर्यंत मोफत गॅस सिलिंडर तसेच २०० युनिटपर्यंत निम्मे वीज बिल आकारणे, जुनी पेन्शन योजना लागू करणे, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणे या आश्वासनांचा यामध्ये समावेश आहे.

हेही वाचा >> विश्लेषण: Cultural Genocide – एखाद्या संस्कृतीच्या इतिहासातील पाऊलखुणा पुसून टाकणं शक्य असतं का?  

शिवराजसिंह चौहान हे घोषणावीर- प्रियांका गांधी

काँग्रेसने मध्य प्रदेशच्या जनतेला वरील आश्वासने दिली आहेत. या आश्वासनांचा उल्लेख करीत प्रियांका गांधी यांनी भाजपाने केलेल्या आश्वासनांचा उल्लेख करीत शिवराजसिंह चौहान सरकारवर टीका केली. २०१८ ते २०२२ या काँग्रेस सरकारच्या काळात अनेक विकासकामे केली गेली. भाजपाने मात्र त्यांची आश्वासने पूर्ण केली नाहीत. भाजपाकडून खोटी आश्वासने दिली जात आहेत. शिवराजसिंह चौहान हे घोषणावीर आहेत. त्यांनी आतापर्यंत एकूण २२ हजार वेगवेगळ्या घोषणा केल्या आहेत. मात्र त्यांनी या घोषणाएवढे रोजगार जरी दिले असते तरी भाजपाला त्याचा फायदा झाला असता. एकूण आश्वासनांपैकी त्यांनी फक्त एक टक्काच आश्वासने पूर्ण केली आहेत, असे प्रियांका गांधी म्हणाल्या.

काँग्रेसच्या कर्नाटकमधील योजनांचा प्रियांका गांधी यांच्याकडून उल्लेख

कर्नाटकमधील नव्याने स्थापन झालेल्या अनेक कल्याणकारी योजना लागू करण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता म्हणून या योजनांकडे पाहिले जात आहे. याच योजनांचा आणि कर्नाटकमधील काँग्रेस सरकारच्या कामगिरीचा उल्लेख प्रियांका गांधी यांनी आपल्या भाषणात केला आहे. कर्नाटकमधील सरकारने आपल्या आश्वासनांची पूर्तता करण्यास सुरुवात केली आहे, असे प्रियांका गांधी भाषणात म्हणाल्या. दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी रविवारी (११ जून) ‘शक्ती योजने’ची घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत लक्झरी आणि वातानुकूलित बसेस वगळता महिला आणि तृतीयपंथीय सर्व बसेसमधून मोफत प्रवास करू शकतात. याआधी कर्नाटक सरकारने ‘गृहज्योती योजने’ची घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक घराला २०० युनिटपर्यंत मोफत वीज देण्यात येणार आहे. या योजनेला येत्या १ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. काँग्रेसने ‘गृहलक्ष्मी योजने’चीही घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक घरातील एका महिलेला प्रतिमहा २००० रुपये भत्ता देण्यात येणार आहे. ही योजना येत्या १७-१८ ऑगस्टपासून सुरू होणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा >> Cowin पोर्टलवरील डेटा टेलिग्रामवर खरंच लीक झाला? सरकारची भूमिका काय? जाणून घ्या…

आगामी काळात कर्नाटकमध्ये काँग्रेस लागू करणार अनेक योजना

कर्नाटक सरकारने शक्ती, गृहज्योती, गृहलक्षी या योजनांसह अशा अनेक योजनांचा आराखडा तयार केला आहे. अन्नभाग्य योजनेंतर्गत दारिद्र्यरेषेखाली असलेल्या तसेच अंत्योदय कार्ड असणाऱ्या घरातील प्रत्येकाच्या नावाने १० किलो धान्य देण्यात येणार आहे. युवानिधी योजनेंतर्गत प्रत्येक बेरोजगार पदवीधर युवकाला बेरोजगार भत्ता म्हणून ३ हजार रुपये देण्यात येणार आहेत. २०२२-२०२३ साली पदवी मिळवलेल्या तरुणांसाठी ही योजना असेल. याच सालात पदविका मिळवलेल्या बेरोजगार तरुणांना २४ महिन्यांसाठी प्रतिमहा १५०० रुपये दिले जातील.