केंद्र सरकारने ‘राष्ट्रीय हरित हायड्रोजन मोहिमे’अंतर्गत हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या वाहनांना प्राधान्य देण्यास सुरुवात केली आहे. लेह, दिल्ली, बडोदा, हैदराबाद यासांरख्या शहरांनंतर पुणे शहराला यात प्राधान्य देण्यात आले आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपीएमएल) हायड्रोजन बसची चाचणीही नुकतीच सुरू झाली. या मोहिमेने नेमके काय साध्य होणार?

हायड्रोजन बस कशी आहे?

हायड्रोजन बस ही एक प्रकारची इलेक्ट्रिक बस आहे. हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या रासायनिक अभिक्रियेद्वारे तयार होणारी वीज यात वापरली जाते. या प्रक्रियेत फक्त पाणी आणि उष्णता उत्सर्जित होत असल्याने प्रदूषण शून्य टक्के आहे. पारंपरिक डिझेल किंवा सीएनजी बसच्या तुलनेत ही बस पर्यावरणस्नेही आहे. बसच्या छतावर हायड्रोजन टाक्या आहेत. साधारण ७० किलो हायड्रोजनमध्ये सुमारे ३०० किलोमीटर अंतर ही बस पार करते. भारतात स्वदेशी बनावटीची पहिली हायड्रोजन बस २०२२ मध्ये पुण्यातच तयार करण्यात आली होती.

या बसच्या मर्यादा आणि क्षमता काय?

हायड्रोजन बस एक किलो हायड्रोजन इंधनात कमाल १२ ते १३ किलोमीटर अंतर पार करते. बसच्या वरच्या बाजूस असलेल्या टाक्यांची हायड्रोजन साठवण क्षमता ७० किलो आहे. ताशी ६० ते ८० किलोमीटर इतक्या वेगाने ती धावू शकते. शहरांतर्गत प्रवासासाठी या बसचा मोठ्या प्रमाणात फायदा असून, सुरुवातीला जादा इंधन पुरवठा स्थानके निर्माण करण्याची आवश्यकता भासणार नाही. भारतीय सैन्यासाठी लेहमध्ये, तसेच दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावरून नजीकच्या हाॅटेल, तसेच कंपन्यांपर्यंत हायड्रोजन बसचा अवलंब सुरू झाला आहे. या बसची किंमत २.५० ते ३ कोटी रुपयांपर्यंत असून, केंद्र सरकारकडून ३० टक्के अनुदान देण्यात येत आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या तुलनेत ही बस किफायतशीर आहे.

पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी निधीची गरज?

हायड्रोजन बस पूर्णत: पर्यायवरणपूरक असली, तरी यात हायड्रोजन उत्पादन संयंत्र, साठवणूक क्षमता, पुनर्भरण स्थानके, त्यासाठी पुन्हा उच्च दाबाचा वीजपुरवठा, जमिनीअंतर्गत इंधनाच्या वाहिन्या, मुबलक पाणीपुरवठा, तंत्रज्ञान आधारित प्रयोगशाळा आदी पायाभूत सुविधा प्रथम निर्माण करणे आवश्यक आहे. हायड्रोजन इंधन तयार करण्यासाठी प्रचंड वित्त आणि वीजपुरवठा अपेक्षित आहे. पायाभूत सुविधांसाठी प्रचंड गुंतवणूक करावी लागणार आहे.

फायदेशीर, तरी…?

वाहतूक कोंडीत पुणे शहर जागतिक पातळीवर चौथ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे प्रदूषण, आरोग्याच्या दृष्टीने पुण्यातील नागरिकांना सजग राहण्याची गरज आहे. सर्वांत जास्त प्रदूषण डिझेल आणि सीएनजी वाहनांमुळे होत आहे. त्याला पर्याय असलेल्या हायड्रोजन बस शून्य उत्सर्जन करतात. त्यामुळे हवेची गुणवत्ता सुधारू शकेल, तसेच आरोग्य समस्या कमी होतील. मात्र, वाहतूक कोंडीचे काय, हा प्रश्न कायमच आहे. पीएमपीने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत हायड्रोजन इंधनावरील बसचा अवलंब करण्यासाठी प्रामुख्याने पुढाकार घेतला असला, तरी रस्ते व्यवस्थापन, गर्दीवरील नियंत्रण अशा दीर्घकालीन समस्यांवर मात करण्यासाठी पावले उचलणे आवश्यक आहे.

तज्ज्ञांचे मत काय?

‘शहरांमध्ये सर्वाधिक प्रदूषण वाहतुकीमुळे होते, असे पर्यावरण विभागाच्या अहवालातूनच स्पष्ट करण्यात आले आहे. हायड्रोजन बसमुळे वाहतूक कोंडीमुळे वाहनांमधून उर्त्सजित होणाऱ्या कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण शून्यावर येईल. खासगी कंपन्या, शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक संस्थांमध्ये प्रामुख्याने या बसचा अवलंब करण्यासाठी धोरणे आखण्याची गरज आहे,’ असे वाहतूकतज्ज्ञ आणि परिसर संस्थेचे अध्यक्ष रणजित गाडगीळ सांगतात. तसेच, ‘सीएनजी इंधनावरील वाहनांसाठी मर्यादित पुरवठा स्थानकांमुळे लांबपर्यंत लागणाऱ्या रांगा पाहिल्या, तर हायड्रोजन गाड्यांसाठी पुरवठा स्थानकांची गरज किती आहे आणि त्यामुळे पायाभूत सुविधा आधी वाढविणे किती गरजेचे आहे, हे अधोरेखित होईल,’ असेही गाडगीळ स्पष्ट करतात.

vinay.puranik@expressindia.com