Rising divorce rates India मराठी शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांचा घटस्फोट झाला, ही बातमी त्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करून दिली. राहुल व त्यांची पत्नी नेहा १७ वर्षांच्या वैवाहिक आयुष्यानंतर वेगळे झाले. ‘शरारत’ व ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम अभिनेत्री सिंपल कौलनेदेखील घटस्फोट झाल्याची माहिती दिली. तिने लग्नाच्या १५ वर्षांनी घटस्फोट घेतला. तसेच ‘संगीत देवभाबळी’ या सुप्रसिद्ध नाटकात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री शुभांगी सदावर्तेनेदेखील घटस्फोट झाल्याची माहिती सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली. गेल्या काही वर्षांत घटस्फोटाचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे.
भारतीय संस्कृतीत लग्नाचे महत्त्व अधिक आहे. लग्नाला अगदी जन्मोजन्मीचे नाते मानले जाते. सात जन्म एकत्र राहाण्याचं वचन पती-पत्नी एकमेकांना देतात. परंतु, गेल्या काही वर्षांत, नातेसंबंधाकडे विशेषतः लग्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. पूर्वी, कोणत्याही कारणामुळे (घरगुती हिंसा, मानसिक आणि भावनिक छळ किंवा विश्वासघात) घटस्फोट घेऊ इच्छिणाऱ्या लोकांना कमी लेखले जायचे. लग्न न करणे हेदेखील एक मोठे पाप मानले जायचे. पण आता परिस्थिती बदलत आहे. लोक आता एका विशिष्ट मर्यादेपलीकडे जाऊन तडजोड करण्यास तयार नाहीत. हे आकडेवारीतून सिद्ध झाले आहे. घटस्फोटाचे प्रमाण वाढण्याचे कारण काय? आकडेवारी काय सांगते? लग्नाची संकल्पना कशी बदलत आहे? याचा समाजावर काय परिणाम होणार? त्याविषयी सविस्तर समजून घेऊयात…
भारतातील घटस्फोटाची आकडेवारी काय सांगते?
- युएन वुमन (UN Women) ने केलेल्या एका अलीकडील अभ्यासानुसार, भारतात घटस्फोटाचे प्रमाण वाढत आहे. बऱ्याच काळापासून, भारत हा जगातील सर्वात कमी घटस्फोट दर असलेल्या देशांपैकी एक होता.
- भारतात घटस्फोटाचे प्रमाण केवळ १ टक्का होते. परंतु, ही अभिमानास्पद बाब नव्हती, कारण अनेक जोडपी प्रेम आणि आदराऐवजी सक्तीमुळे वाईट नात्यात गुंतली होती.
- परंतु, पिरियॉडिक लेबर फोर्स सर्वे (Periodic Labour Force Survey) च्या आकडेवारीनुसार, आता भारतीयांचे घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, ग्रामीण भागातील घटस्फोटित किंवा विभक्त झालेल्या महिलांचे प्रमाणही वाढत आहे. डेटिंग ॲप बम्बल (Bumble) च्या आणखी एका अभ्यासानुसार, सुमारे ८१ टक्के भारतीय महिलांना एकटं राहणं पसंत आहे. तर, इन्वेस्टोपीडिया (Investopedia) च्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, सुमारे ६५ टक्के नवीन विवाहित भारतीय जोडप्यांना मूल नको आहे.
विवाहाची जुनी संकल्पना बदलत आहे?
विवाह ही संस्था मोठ्या प्रमाणात बदलत आहे. पण, लहानपणापासून भारतीयांमध्ये रुजलेल्या या जुन्या पारंपरिक मूल्यांमध्ये बदल का होत आहे? हा एक मोठा प्रश्न आहे. अभ्यास सांगतो की, बदललेली मूल्ये, वाढलेला व्यक्तिवाद आणि आर्थिक घटक आदींमुळे भारतीयांच्या नातेसंबंधाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत आहेत. या बदलांमध्ये सेलिब्रिटी आघाडीवर आहेत. गेल्या काही वर्षांत, ए.आर. रहमान, उर्मिला मातोंडकर, ईशा देओल, आमिर खान, प्रभू देवा, हार्दिक पांड्या, शिखर धवन, समंथा रुथ प्रभू यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या जोडीदारापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. यातील सर्वात नवीन उदाहरणे म्हणजे क्रिकेटपटू युझवेंद्र चहल आणि कोरिओग्राफर धनश्री वर्मा आणि मराठी शास्त्रीय गायक राहुल देशपांडे आहेत.

सल्लागार मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अल्पेश पांचाल सांगतात की, सेलीब्रीटिंच्या निर्णयांचा प्रभाव सामान्य नागरिकांवर होतो. “सेलिब्रिटी हे अनेकांसाठी आदर्श असतात आणि त्यांच्यात लोकांच्या निर्णयावर प्रभाव टाकण्याची क्षमता असते. पण माझा ठाम विश्वास आहे की, जर दोन लोक लग्नात आनंदी नसतील, तर घटस्फोट घेणे चुकीचे नाही,” असे डॉ. पांचाल म्हणतात. रिलेशनशिप कोच आणि मेंटॉर लीना परान्नापेदेखील सांगतात की, सेलिब्रिटींचा प्रभाव विचारसरणी बदलण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो, पण एकूणच समाजाचे नियम आणि लग्नाबद्दलची संकल्पना बदलत आहे. त्या असेही सांगतात की, लोक लग्नाची कल्पना न समजून घेता डेटिंग करत आहेत. “काही लोकांच्या त्यांच्या जोडीदाराकडून अवास्तव अपेक्षा असतात. ते लग्नाचे नियोजन करतात, पण वैवाहिक जीवनाचे नाही. त्यांच्यामध्ये नात्यात आधीपासूनच काही त्रास, चिंता आणि विश्वासाच्या समस्या असतात,” असे परान्नापे म्हणतात.
भारतात घटस्फोट का वाढत आहेत?
लीना परान्नापे म्हणतात की, भारतात घटस्फोटाची प्रकरणे वाढण्यामागचे एक मुख्य कारण म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य. जगभरात सुमारे ७० टक्के घटस्फोटाची सुरुवात महिलाच करतात. पूर्वीच्या काळात महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी नव्हत्या, पण आता त्या लग्नात आनंदी नसल्यास लग्नातून बाहेर पडत आहेत. जवळजवळ प्रत्येक पहिला आज स्वतःच्या पायावर उभी आहे, त्यमुळे त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळत आहे. रिलेशनशिप कोच दीपिका राठोड म्हणतात, “योग्य वयात लग्न करण्याचा दबावही कमी होत आहे, कारण महिला आता त्यांच्या कुटुंबावर ओझे राहिलेल्या नाहीत. त्या स्वतंत्र आहेत आणि त्यांचे निर्णय त्या स्वतः घेतात. पालक आता त्यांच्या मुलींच्या लग्नापेक्षा त्यांच्या शिक्षणाला आणि कौशल्यांना जास्त महत्त्व देत आहेत.” मानसोपचारतज्ज्ञ खुशी गुप्ता महिलांच्या बदलत्या प्राधान्यक्रमांवर भर देतात. त्या म्हणाल्या, “लग्न आता कर्तव्य राहिले नाही.”
घटस्फोटाबद्दलची चर्चा महिलांना केंद्रस्थानी ठेवून होत असली, तरी ती दोन्ही जोडीदारांविषयी आहे. अनेक पुरुषही त्यांच्या मानसिक शांततेसाठी लग्नातून बाहेर पडू इच्छितात. “मी २१ वर्षे विवाहित होतो आणि आम्ही रोज भांडायचो. लग्नाच्या चार वर्षानंतर भांडणाची सुरुवात झाली आणि आम्हाला एक मुलगी होती. त्या परिस्थितीत राहणे खूप कठीण होते आणि त्याचा मुलीवर परिणाम होत होता. तो एक कठीण निर्णय होता, पण मी लग्नातून बाहेर पडण्याचे ठरवले,” असे अभिनव सिंग (नाव बदललेले) सांगतात. त्याचप्रमाणे, दिल्लीतील एक आर्थिक सल्लागार असलेल्या अनिकेत शर्मा यांनीही सात वर्षांनंतर लग्न मोडले.
“आपण सहसा महिलांच्या छळाबद्दल बोलतो, पण असेही अनेक प्रसंग असतात जिथे पुरुषांचा भावनिक छळ होतो. महिला लग्नात आनंदी नसतात, अशी आपली एक धारणा आहे. पण पुरुषही त्रास सहन करतात. माझ्या सात वर्षांच्या लग्नात, मी पूर्णवेळ नोकरी करत असूनही शक्य तितके योगदान दिले. माझी पत्नी कामावर आहे म्हणून मी तिला घरकामात मदत करावी, असा विचार करत होतो. परंतु, तुम्ही काहीही केले तरी, अपेक्षा कधीही पूर्ण होत नाही,” असे शर्मा म्हणतात.
डॉ. पांचाल सांगतात की, कोविड-१९ महामारीच्या काळात लोकांना मृत्यूची जाणीव झाली, त्यामुळेही घटस्फोटाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. आपण ‘YOLO – You Only Live Once)’ या विचारसरणीकडे आकर्षित झालो. “लोकांना कळले की हे एकच आयुष्य आहे आणि त्यांना ते त्यांच्या पद्धतीने जगायचे आहे. त्यांना दुसरी संधी मिळणार नाही. लोकांनी कठोर निर्णय घेतले आणि अनेक वर्षांपासून असह्य असलेल्या लग्नातून बाहेर पडले. अनेक लोकांनी करिअर बदलले आणि त्यांच्या स्वप्नांचा पाठलाग सुरू केला,” असे डॉ. पांचाल म्हणतात.
भारतातील वाढते घटस्फोट दर हे एका बदलत्या समाजाचे प्रतिबिंब आहेत. नवीन पिढीला ‘लोक काय म्हणतील’ या जुन्या मानसिकतेच्या बंधनातून बाहेर पडायचे आहे. पूर्वी वैयक्तिक आनंद आणि कल्याणापेक्षा लोकांच्या मताला जास्त महत्त्व दिले जायचे, असे त्यांचे सांगणे आहे. या व्यतिरिक्त, बदललेली सामाजिक वृत्तीदेखील महत्त्वाची भूमिका बजावत आहे. ‘Adjustment’ या कल्पनेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पण मानसशास्त्रज्ञ म्हणतात की, सोशल मीडियावर तुम्ही जे पाहता, त्यापासून प्रभावित होऊ नका. “जर लोक आनंदी फोटो पोस्ट करत असतील, तर याचा अर्थ ते आनंदी आहेत असे नाही. सोशल मीडिया फसवे आहे. त्यामुळे अनेकदा नातेसंबंधात अवास्तव अपेक्षा निर्माण होतात,”” असे परान्नापे म्हणतात.
विभक्त कुटुंब आणि नात्यांवरील प्रभाव
पूर्वी, एकत्र कुटुंबातील सदस्य भावनिक आधार आणि सल्ला देऊन समस्यांचे निराकरण करत होते. आज, अधिक जोडपी त्यांच्या कामामुळे स्वतंत्रपणे राहत आहेत आणि त्यामुळे मध्यस्थ म्हणून कोणीही नसल्यामुळे संवादात अडथळा निर्माण होतो. “महिलांचे असे सांगणे आहे की, त्यांच्या आई-आजींनी केले म्हणून त्यांना आयुष्यभर असमाधान सहन करण्याची गरज नाही,” असे राधिका पंडित म्हणतात.
समाजावर याचे काय परिणाम होतील?
मानसोपचारतज्ज्ञ खुशी गुप्ता मानतात की, जास्त डेटिंग ॲप्स आणि ‘सिच्युएशनशिप्स’ (नातेसंबंधाचे एक अनिश्चित स्वरूप) वाढल्यामुळे प्रेमसंबंधाची व्याख्या बदलत आहे. “लोक खोलवर नातेसंबंध निर्माण करण्याऐवजी समाधान शोधत आहेत. याचा शहरी लोकांवर जास्त परिणाम होतोय, पण याचा देशाच्या मोठ्या भागावर फार परिणाम होणार नाही,” असा दावा आहे.
समाजसेविका आणि सेंटर फॉर सोशल रिसर्च (Centre for Social Research) च्या संचालिका रंजना कुमारी म्हणतात की, भविष्यात लोकांना एकटेपणा जाणवू शकतो. “जर लोकांची एकटे राहण्याची तयारी असेल आणि लोकांना त्याचे फायदे आणि तोटे माहित असतील, तर हा पूर्णपणे वैयक्तिक निर्णय आहे. परंतु वयानुसार, एकटेपणा वाढू शकतो. त्यामुळे विभक्त कुटुंब ही संकल्पना अधिक जास्त सामान्य होईल आणि समाजात एकल पालकत्व (single parenthood) जास्त स्वीकारार्ह होईल,” असे त्या म्हणतात.