Rat Hunting Bats Pandemic Fears : रात्रीच्या अंधारात उडणाऱ्या वटवाघळांची चक्क उंदरांकडून शिकार केली जात असल्याचा दुर्मीळ शोध वैज्ञानिकांनी लावला आहे. उंदरांच्या या नवीन शिकारीच्या सवयीमुळे रोगराई पसरत असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. ‘ग्लोबल इकॉलॉजी अँड कन्झर्वेशन’ या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनात या धक्कादायक घटनेचा उल्लेख करण्यात आला आहे. वटवाघूळ आणि उंदीर या दोघांनाही विषाणूचे वाहक म्हणून ओळखले जाते. या दोन प्राण्यांमध्ये थेट संपर्क येत असल्याने आगामी काळात महामारीचा धोका वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, उंदरांकडून वटवाघळांची कशी शिकार केली जात आहे? तज्ज्ञांचा दावा काय? त्याविषयीचा हा आढावा…

उंदरांकडून वटवाघळांची शिकार केली जात असल्याच्या दुर्मीळ घटना काही वर्षांपूर्वी जर्मनीतील वैज्ञानिकांच्या कानी पडल्या होत्या. सुरुवातीला त्यांना या गोष्टीवर विश्वासच बसला नाही; परंतु सातत्याने त्या संदर्भातील तक्रारी येत असल्याने वैज्ञानिकांनी त्यावर संशोधन करण्याचे ठरवले. उत्तर जर्मनीतील सेगेबर्ग आणि ल्युनबुर्ग या दोन प्रमुख शहरांमध्ये रात्रीच्या वेळी वटवाघळांचे प्रमाण सर्वाधिक असते, त्यामुळे संशोधकांनी तेथील शीतगृहांमध्ये कॅमेरे बसवले. यावेळी तपकिरी रंगाच्या उंदराने हवेत उडणाऱ्या एका वटवाघळाची शिकार केल्याचा धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला.

संशोधकांना काय आढळून आले?

२०२० ते २०२४ या कालावधीत संशोधकांनी सेगेबर्ग आणि ल्युनबुर्ग या दोन शहरांतील वटवाघळांच्या स्थळांवर सातत्याने निरीक्षण ठेवले. यादरम्यान उंदरांनी अनेक वटवाघळांची शिकार करून त्यांना फस्त केल्याचे दिसून आले. या दुर्मीळ घटनेचा उल्लेख करताना अभ्यासाचे प्रमुख लेखक आणि बर्लिनमधील म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी येथील जीवशास्त्रज्ञ फ्लोरियन ग्लोझा-रॉश म्हणाले, “शहरी परिसंस्थांमध्ये अन्नस्रोत शोधण्यासाठी उंदरांकडून अत्यंत चालाखीने वटवाघळांची शिकार केली जात आहे. मात्र, त्यांच्या वर्तनामुळे मानवी आरोग्यालाही मोठा धोका निर्माण होत आहे. आमच्या माहितीनुसार उंदरांच्या अशा प्रकारच्या वर्तनाची वैज्ञानिक नोंद यापूर्वी झालेली नव्हती.”

आणखी वाचा : Pakistan Army Sale : पाकिस्तान दिवाळखोरीच्या खाईत; असीम मुनीर यांनी सैन्य काढलं विक्रीला? आरोप काय?

उंदरांकडून शिकारीच्या दोन वेगवेगळ्या पद्धती

संशोधकांनी केलेल्या अभ्यासात उंदरांच्या दोन वेगळ्या शिकारी पद्धती समोर आल्या आहेत. काही उंदीर आपल्या शेपटीचा आधार घेत सरळ उभे राहून हवेतून उडणाऱ्या वटवाघळांना अचूक पकडताना दिसले; तर काहींनी वटवाघळे जमिनीवर उतरलेली असताना त्यांच्यावर अचानकपणे हल्ला केला. उंदरांनी वटवाघळांवर केलेल्या हल्ल्यांचे संशोधकांनी ३० हून अधिक वेळा निरीक्षण आणि चित्रण केले आहे. बॅड सेगेबर्ग येथील एका गुहेत ३०,००० हून अधिक वटवाघळे हिवाळी मुक्कामासाठी येतात. केवळ पाच आठवड्यांच्या कालावधीतच उंदरांनी वटवाघळांची १३ वेळा शिकार केल्याची नोंद झाली आहे.

rat hunting bats sparked new pandemic fears Scientists warning
उंदराने हवेत उडणाऱ्या वटवाघुळाची शिकार केल्याचा धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला. (छायाचित्र सोशल मीडिया)

उंदीर वटवाघळांची शिकार कशी करतात?

संशोधकांना ५२ वटवाघळांचे अवशेषदेखील सापडले आहे, त्यापैकी काहींना उंदरांनी पूर्णपणे खाल्लेले नव्हते. “उंदीर गुहेच्या प्रवेशद्वारावर वारंवार गस्त घालताना दिसले. ते मागील पायांवर सरळ उभे राहून शेपटीने तोल सांभाळत होते. तसेच पुढचे पाय उंचावून उडणाऱ्या वटवाघळांना अडवत होते. काही उंदीर हवेतच वटवाघळांना पकडून त्वरित चावा घेऊन ठार करत होते आणि त्यांना ओढत नेत होते,” असे संशोधकांनी आपल्या अहवालात नमूद केले आहे. उंदरांची रात्रीची दृष्टी थोडीफार कमी असते, तरीदेखील त्यांनी वटवाघळांची अचूकपणे शिकार केल्याने संशोधकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

उंदरांमुळे वटवाघळांच्या अस्तित्वावर परिणाम

या अभ्यासाचे प्रमुख लेखक फ्लोरियन ग्लोझा-रॉश यांनी सांगितले की, उंदरांच्या शिकारीच्या या पद्धतीमुळे वटवाघळांच्या संवर्धनासाठी गंभीर समस्या निर्माण होत आहे. फक्त एका हिवाळ्यात उंदरांची एक छोटी वसाहतही सुमारे ३०,००० वटवाघळांपैकी ७ टक्क्यांपर्यंत वटवाघळांना ठार करू शकते. आधीपासूनच जगभरातील बेटांवरील आक्रमक उंदरांमुळे स्थानिक प्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर नष्ट झाली आहे. शहरी भागांमध्येही उंदीर अशाच प्रकारे जैवविविधतेला धोका पोहोचवू शकतात असे या अभ्यासातून समोर आले आहे. प्रदूषणामुळे आधीच वटवाघळांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे, त्यातच शिकारी उंदरांमुळे त्यांच्यासमोर आणखी एक मोठे संकट निर्माण झाले आहे.

हेही वाचा : झोहरान ममदानींचा ऐतिहासिक विजय नेमका कुणामुळे? कोण आहेत माया हांडा? त्यांची का होतेय चर्चा?

उंदीर-वटवाघूळ संघर्षामुळे पुन्हा महामारीची भीती?

वटवाघळांची शिकार करणारे उंदीर मानवांसाठीही धोकादायक ठरू शकतात, असा इशारा वैज्ञानिकांनी दिला आहे. या अभ्यासात रोगांचा प्रसार थेट तपासलेला नसला तरी संशोधकांनी उंदीर आणि वटवाघळे दोन्ही विविध प्रकारच्या रोगजंतूंचे वाहक असल्याचे म्हटले आहे. “या दोन प्रजातींमधील संघर्षामुळे वटवाघळांशी संबंधित रोगजंतू उंदरांमध्ये संक्रमित होऊन रोगराईचा धोका वाढू शकतो. उंदीर हे मानवी वस्त्यांमध्येही येत असल्याने एखादी मोठी महामारी येण्याची शक्यता नाकारता येत नाही,” असा इशाराही वैज्ञानिकांनी दिला आहे. आपल्या घरात तसेच आजूबाजूच्या परिसरात उंदरांचा वावर वाढू नये यासाठी प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.