Ravindra Jadeja Best All-Rounder : वेगवान गोलंदाजी व तितक्याच आक्रमकपणे फलंदाजी करणाऱ्या खेळाडूंना अष्टपैलू म्हणून संबोधलं जातं. कपिल देव, इम्रान खान, रिचर्ड हॅडली आणि इयान बोथम या महान खेळाडूंचं नाव अष्टपैलूंच्या यादीत शीर्षस्थानी आहे. १९८० च्या दशकात कपिल व इम्रान खान यांनी मैदानं गाजवत आपापल्या देशात क्रिकेटची पाळमुळं रोवण्यात मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या कर्तृत्वाची छाया खेळपट्टीच्या पलीकडेही पसरली होती. रवींद्र जडेजाला मात्र महान खेळाडूंच्या दुर्मीळ यादीत अद्याप स्थान मिळालेलं नाही; पण आता त्याला आधुनिक क्रिकेटमधील सर्वोत्तम अष्टपैलूंपैकी एक म्हणून ओळख मिळत आहे. केवळ आकडेवारीतूनच नव्हे तर मैदानावरील जिद्द, आत्मविश्वास आणि आकर्षक शैलीमुळेही जडेजा अधिकच लक्षवेधी ठरतो आहे.
सध्याच्या काळात रवींद्र जडेजासारखा दुसरा अष्टपैलू खेळाडू क्वचितच सापडेल. जडेजाला जेव्हा टीम इंडियात स्थान मिळालं, तेव्हा त्याच्याकडे एक डावखुरा फिरकीपटू व मोक्याच्या क्षणी मोठमोठे फटके मारणारा खेळाडू म्हणून पाहिलं गेलं. सुरुवातीला त्याच्या आत्मविश्वासात काहीसा उद्धटपणाही दिसून येत होता. मात्र, लवकरच एक लढवय्या खेळाडू व उत्तम क्षेत्ररक्षक म्हणून त्याला नवीन ओळख मिळाली आणि त्याने सुरुवातीच्या थोड्याशा गोंधळलेल्या वर्तनाला मागे टाकलं. कसोटी असो वा मर्यादित षटकांचा खेळ, आजही भारतातील अनेक मैदानांवर फिरकीची जादू चालते, त्यामुळे अनेक विदेशी खेळाडू या परीक्षेला सामोरे जाण्यासाठी कचरतात. या दरम्यान, जडेजाने अनेक खेळाडूंना फिरकीच्या जाळ्यात फसवून टीम इंडियातील आपलं स्थान पक्कं केलं.
जडेजाला सर्वोत्तम अष्टपैलू का मानलं जातं?
- गेल्या सहा वर्षांत जडेजाने गोलंदाजी व फलंदाजीच्या बळावर टीम इंडियाला अनेक सामने जिंकून दिले आहेत.
- भारताच्या आघाडीच्या सहा फलंदाजांमध्ये रवींद्र जडेजाचं नाव आवर्जून घेतलं जातं.
- रवींद्र जडेजाने जानेवारी २०१८ पासून आतापर्यंत ४८ कसोटी सामने खेळले आहेत.
- जडेजाने ४२ च्या सरासरीने २,५२१ धावा केल्या आहेत आणि २६.१६ च्या सरासरीने १६१ बळी मिळवले आहेत.
- जडेजाची ही आकडेवारी आताच्या क्रिकेटमध्ये प्रभावी कामगिरी करणाऱ्या अष्टपैलू खेळाडूंपेक्षा खूपच चांगली आहे.
- बांगलादेशच्या शाकिब अल हसनची याच काळातील फलंदाजीची सरासरी ३०.७५ असून, गोलंदाजीची सरासरी २९.६२ आहे.
- इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सची फलंदाजी सरासरी ३४.८५ आणि गोलंदाजी सरासरी ३०.६१ इतकी आहे.
- पारंपरिक निकषांनुसार, फलंदाजीच्या सरासरीतून गोलंदाजीची सरासरी वजा केल्यास जडेजाची कामगिरी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम अष्टपैलूंशी तुलनायोग्य ठरते.
- रवींद्र जडेजाची मैदानावरील चपळता आणि उत्साहीपणा नेहमीच लक्षवेधी ठरतो, विशेषत: त्याच्या क्षेत्ररक्षणाची नेहमीच चर्चा होते.
बोथम, कपिलपेक्षाही जडेजाची चमकदार कामगिरी
आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात आजवर फक्त ११ अष्टपैलू खेळाडूंनी ३,००० हून अधिक धावा आणि ३०० बळींचा दुर्मीळ पराक्रम गाठलेला आहे. ही यादी अंतिम मानता येणार नाही, कारण यामध्ये जॅक कॉलिस (ज्यांना ३०० बळींपासून फक्त ८ बळींचे अंतर राहिले होते), गारफिल्ड सोबर्स (२३५ बळी) व कीथ मिलर यांसारखे दिग्गज खेळाडू नाहीत. या यादीतील काही खेळाडूंची कारकीर्द दीर्घकाळ चालल्याने त्यांना या विक्रमाला गवसणी घालता आली आहे. त्यांची फलंदाजी ही कौशल्यावर नव्हे तर खालच्या फळीतील चतुराईवर आधारित होती. ऑस्ट्रेलियाचा महान खेळाडू शेन वॉर्न आणि श्रीलंकेचा चमिंडा वास यांचे उदाहरण यासाठी योग्य आहे; पण रवींद्र जडेजा हा त्यांच्यापासून वेगळा आहे. कारण त्याने अष्टपैलूपणाच्या खऱ्या निकषांनुसार सातत्याने आपली छाप पाडली आहे.
आणखी वाचा : पाकिस्तानमध्ये कुणाची दहशत? सीमेवरील जवान थेट राज्यांमध्ये तैनात; कारण काय?
अष्टपैलू खेळाडूंच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या यादीत रवींद्र जडेजा आज अभिमानाने उभा राहू शकतो. त्याच्या फलंदाजी व गोलंदाजीतील सरासरीतील फरक १२.०३ इतका आहे. या यादीत फक्त इम्रान खान यांची सरासरी (१४.८८) जडेजापेक्षा चांगली आहे. इयान बोथम यांच्या फलंदाजी व गोलंदाजीतील सरासरी फरक ५.१३, कपिल देव यांचा १.८३ तर रिचर्ड हॅडली यांचा ४.८६ आहे. जॅक कॅलिसचा सरासरी फरक २२.७२ असून तो एक अपवादात्मक खेळाडू मानला जातो.
रवींद्र जडेजा : कपिलनंतरचा सर्वोत्तम अष्टपैलू
जडेजाची आकडेवारी चांगली असली तरी कपिल देव यांनी भारतीय क्रिकेटवर मोठी छाप टाकली होती. त्यांच्या निवृत्तीनंतर भारताला खऱ्या अर्थाने सातत्याने कामगिरी करणारा अष्टपैलू सापडलेला नाही. काही खेळाडूंनी सुरुवातीला चांगलं प्रदर्शन केलं, पण नंतर ते मागे पडले. काहींनी फक्त पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटला प्राधान्य दिलं, तर काहींचं शरीर किंवा मानसिक बळ फार काळ टिकाव धरू शकलं नाही. वेगवान गोलंदाजाला अष्टपैलूंच्या यादीत अधिक प्रबळ स्थान मिळत असलं तरी फिरकी गोलंदाजही या यादीत मागे नाही. जडेजाने त्याच्या ३२६ कसोटी बळींपैकी २३८ बळी घरच्या मैदानावर घेतले आहेत. परदेशातही त्याची कामगिरी समाधानकारक राहिलेली असून गोलंदाजी सरासरी ३६.३६ इतकी आहे. ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेतील त्याची सरासरी ३० च्या खाली आहे. २०१९-२० मध्ये न्यूझीलंड येथे झालेल्या कसोटी मालिकेत जडेजा फारसा प्रभावी ठरला नाही; पण इंग्लंडमधील मालिकेत त्याने चांगली कामगिरी केली आहे.
जडेजाची विदेशातील तुलनात्मक कामगिरी
हरभजन सिंगची परदेशातील गोलंदाजी सरासरी ३८.०७ होती, तरीही त्याने न्यूझीलंड व दक्षिण आफ्रिकेत भारताला सामने जिंकून दिलेले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये २०० हून अधिक बळी घेतलेल्या भारतीय गोलंदाजांमध्ये फक्त जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी व रविचंद्रन अश्विनने जडेजापेक्षा अधिक जलद बळी घेतले आहेत (सरासरी दर ५८ चेंडूंना एक बळी). पण, त्यांच्यापैकी कुणीही जडेजासारखं फलंदाजीत योगदान दिलेलं नाही. कपिल देव यांनी मजबूत तांत्रिक कौशल्याबरोबरच धाडसी फलंदाजी केली. त्यांनी ५,००० हून अधिक कसोटी धावा केल्या आणि पाच शतकं ठोकली. रविचंद्रन अश्विनने कसोटीत जडेजापेक्षा जास्त शतकं झळकवली असली तरी त्याची फलंदाजीची सरासरी फक्त २५ आहे. त्यामुळे सातत्याच्या बाबतीत तो जडेजापेक्षा मागेच आहे.

संघातील सर्वाधिक विश्वासार्ह बचावात्मक फलंदाज
सौराष्ट्रमधील संथ आणि कमी उसळी असलेल्या खेळपट्ट्यांवर तयार झालेली रवींद्र जडेजाची बचावात्मक फलंदाजीची शैली अनेक भारतीय फलंदाजांपेक्षा अधिक कणखर ठरली आहे. त्याचा फ्रंट-फूट स्ट्राईड लांब आणि ठाम असतो; दोन्ही पायांवर वजन हलवण्याची त्याची पद्धत अत्यंत संतुलित आहे. तो चेंडू अचूकपणे सोडतो आणि क्वचितच तिरका फटका मारतो. सध्या भारतीय संघात असलेल्या फलंदाजांपैकी जडेजा सर्वाधिक तांत्रिकदृष्ट्या शिस्तबद्ध फलंदाज असल्याचं दिसून येतं. जडेजाची कारकीर्द जसजशी पुढे गेली, तसतशी त्याच्या फलंदाजीत अधिकच सुधारणा झाली. यामुळेच मागील पाच ते सहा वर्षांपासून त्याला टीम इंडियातील सर्वात विश्वासार्ह फलंदाजाच्या यादीत स्थान मिळालं आहे.
हेही वाचा : कॅनडातील हिंदू मंदिरे आणि धार्मिक उत्सव धोक्यात? गेल्या दोन वर्षांत किती हल्ले झाले?
इंग्लंड व ऑस्ट्रेलियात चमकला जडेजा
इंग्लंडमधील मैदानं जणू जडेजाची होम ग्राउंडच झाली आहेत. तिथे २९ कसोटी डावात त्याच्या फलंदाजीची सरासरी ३८.७६ इतकी आहे. विशेष बाब म्हणजे- भारतातील सरासरीपेक्षा जडेजाची इंग्लंडमधील फलंदाजीची सरासरी अधिकच चांगली आहे. ऑस्ट्रेलियामध्येही जडेजाने प्रभावी कामगिरी केल्याचं दिसून आलं आहे. त्याची सातत्यपूर्ण कामगिरी विराट कोहली (विदेशातील फलंदाजी सरासरी ३५.७९) आणि रोहित शर्मा (४०.७९) यांच्यापेक्षा अधिक ठळक होती.
कपिल देव यांच्यानंतरचा प्रभावशाली अष्टपैलू
जडेजाने टीम इंडियात विविध भूमिका पार पाडल्या. कधी आक्रमक फलंदाजी करून त्याने टीम इंडियाला संकटातून बाहेर काढलं, तर कधी चांगली भागीदारी करून विदेशी संघांवर दडपणही टाकलं. रवींद्र जडेजाकडे कदाचित कपिल देव, इम्रान खान किंवा इयन बोथम यांच्यासारखा प्रभावशाली करिष्मा नाही किंवा जॅक्स कॅलिससारखी डोळे दिपवणारी आकडेवारीही नाही. मात्र, सध्याच्या काळातील तो सर्वोत्तम अष्टपैलूंमध्ये नक्कीच गणला जातो. भारतासाठी कपिलनंतरचा सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून जडेजा उदयास आला आहे.