भारतीय इतिहासात मौर्य साम्राज्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. मौर्य वंशातील सम्राट चंद्रगुप्तापासून ते सम्राट अशोकापर्यंत प्रत्येक राजाने राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रांत आपला ठसा उमटवला आहे. या राजांच्या परंपरेतील सम्राट अशोकाची इतिहासातील भूमिका अनेकार्थाने महत्त्वाची ठरली आहे. भारताच्या मोठ्या भूभागावर राज्य करणाऱ्या या राजाने बौद्ध धर्माच्या माध्यमातून भारताबाहेरही भारतीय संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार केला. याची साक्ष त्याने कोरून घेतलेल्या शिलालेखांमधून मिळते. अशोकाने त्याच्या हयातीत ८४ हजार स्तूप उभारल्याचे मानले जाते. ही काहीशी अतिशयोक्ती असली, तरी भारतात बऱ्याच ठिकाणी सम्राट अशोकाच्या कालखंडात स्तूप उभारले गेले होते, हे ऐतिहासिक सत्य आहे. त्याच्या या कार्याचा पुरावा ९० च्या दशकात सन्नती या पुरातत्त्वीय स्थळाच्या रूपाने समोर आला. याच स्थळाच्या पुनरुज्जीवनाचे काम सध्या हाती घेण्यात आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर या स्थळाविषयी जाणून घेणे महत्त्वाचे ठरावे.

अधिक वाचा: भारतीय स्थापत्य रचनेतील स्तूपाची परंपरा नेमकी काय आहे?

Martand Sun Temple, Kashmir
विश्लेषण: काश्मीरमधील १६०० वर्षे जुने मार्तंड सूर्यमंदिर उद्ध्वस्त करणारा ‘तो’ परकीय आक्रमक कोण?
Bene Israel Alibaug
विश्लेषण: अलिबागमधील ‘अली’ कोण होता? मुस्लीम की बेने इस्रायली?
“आम्ही तुमची माफी स्वीकारणार नाही, कारवाईला सामोरे जा”; बाबा रामदेव यांचा माफीनामा सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला
raj thackray mns latest news
“राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम”, मनसेला गळती; सात शिलेदारांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’

सन्नती या बौद्ध स्थळाचा शोध

सन्नती हे पुरातत्त्वीय स्थळ कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यात भीमा नदीच्या काठावर वसलेले आहे. पूर्वी हे स्थळ चंद्रलांबा मंदिर संकुलामुळे ओळखले जात होते. १९८६ साली आलेल्या एका नैसर्गिक आपदेत चंद्रलांबा मंदिर आणि मंदिरातील कालिका देवीच्या मूर्तीला क्षती पोहचली. त्यामुळे ग्रामस्थांनी जुन्या मूर्तीच्या जागी नव्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेची तयारी केली असता जुन्या मूर्तीच्या पायावर काही शब्द कोरल्याचे आढळले. त्यामुळेच ग्रामस्थांनी अभ्यासकांशी संपर्क साधला. त्यावेळी ही अक्षर साधी सुधी नसून ब्राम्ही लिपीतील असल्याचे लक्षात आले. इतकेच नाही तर हा शिलालेख २००० वर्षांपूर्वीची सम्राट अशोकाची राजाज्ञा असल्याचे उघड झाले. अशोकाने कोरवून घेतलेल्या १४ राजाज्ञांपैकी काही शिलालेखांच्या प्राप्तीनंतर या स्थळाचे महत्त्व वाढले. या शिलालेखांच्या माध्यमातून चंद्रलांबा मंदिरापासून सुमारे ३ किमी अंतरावर असलेल्या भीमा नदीच्या काठावरील कनगनहल्ली गावातील एका पडक्या विहिरीचा शोध लागला.

उत्खननाचा इतिहास

भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने (ASI) १९९४ साली सखोल संशोधनाच्या दृष्टीने या स्थळावर उत्खननास सुरुवात केली. हे उत्खनन जवळपास चार वर्ष चालले. या उत्खननातून एक महत्त्वाची गोष्ट समोर आली. ती म्हणजे ही विहीर प्राचीन महाचैत्याची जागा होती. या महाचैत्याचा उल्लेख अशोकाच्या शिलालेखात होता. हे महाचैत्य अशोकाच्या कालखंडात बांधले गेले असून त्याचा व्यास सुमारे २२ मीटर तर उंची १७ मीटर आहे. येथील महास्तूपाचे बांधकाम मौर्य, पूर्व सातवाहन आणि उत्तर सातवाहन अशा तीन टप्प्यात झाले. आयगपट्ट, स्तूपावरील विस्तृत अलंकरण, भव्य प्रदक्षिणा पथ ही या स्तूपाची वैशिष्ट्ये आहेत.

सम्राट अशोकाचे शिल्प

उत्खननात मौर्य सम्राट अशोकाचे चित्रण असणारे दगडी शिल्पदेखील सापडले आहे. या दुर्मिळ शिल्पात सम्राट त्याच्या राण्या आणि महिला सेविका यांचे अंकन करण्यात आले आहे. या शिल्पावर ब्राह्मी लिपीत “राया असोको” असे शब्द कोरलेले असल्याने शिल्पातील व्यक्ती अशोकच असल्याचे सिद्ध झाले. स्तूप हा त्या वेळी बांधलेल्या सर्वात मोठ्या स्तूपांपैकी एक असल्याचे मानले जाते.

अधिक वाचा: भारतात सर्वाधिक बौद्ध लेणी का आढळतात?

जातक कथांचे कोरीव काम

उत्खननात स्तूपाच्या जातक कथा कोरलेले घुमटाचे भाग सापडले. जातक कथांशिवाय गौतम बुद्धांच्या आयुष्याशी संबंधित प्रसंग, सातवाहन सम्राटांची चित्रं, अशोकाच्या धर्मप्रसाराचे वर्णन करणारे प्रसंगही कोरण्यात आलेले आहेत. विविध प्रकारची धर्म-चक्र, स्तूप, पहिला उपदेश, बोधिवृक्ष, नाग मुचुलिंद आणि विहार संकुल इत्यादी शिल्पही आढळतात. तसेच गौतम बुद्धांची १० हून अधिक कोरीव शिल्पे, डझनभर बुद्ध-पदचिन्ह, आयक स्तंभांचे तुकडे, छत्रावलीचे दगड, यक्ष आणि सिंह यांच्या शिल्पांचे काही भाग आणि २५० ब्राह्मी शिलालेख सापडले.

नंतरची उदासीनता…

स्तूप स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या चुनखडीने बांधला गेला होता. स्तूपाचे सापडलेले अवशेष भग्न अवस्थेत होते, त्यामुळे त्याचे संवर्धन होणे गरजेचे होते. परंतु नंतरच्या कालखंडात या अवशेषांकडे दुर्लक्ष झाले.

सन्नती विकास प्राधिकरण

अनेक वर्षांपासून हे अवशेष मोकळ्या जागेत विखुरलेल्या अवस्थेत होते. म्हणूनच वर्षांनुवर्षे ऊन, पावसाच्या संपर्कात येऊन त्या महास्तूपाचे पडक्या विहिरीत रूपांतर झाले. किंबहुना अशोकाचे शिल्पही एका छोट्याशा खुल्या शेडमध्ये ठेवण्यात आले होते. २०२१ साली या शिल्पाला संरक्षण प्रदान करण्यात आले. कर्नाटक सरकारने उत्खननात सापडलेल्या पुरातन अवशेषांचे संवर्धन करण्यासाठी आणि या भागांना प्रमुख पर्यटन आणि तीर्थक्षेत्र म्हणून विकसित करण्यासाठी सन्नती विकास प्राधिकरणाची स्थापना केली. कर्नाटक गृहनिर्माण मंडळाने २००९ साली उत्खनन केलेल्या जागेजवळ ₹३.५२ कोटी रुपये खर्चून १८ एकर जागेवर संग्रहालय इमारत, वसतिगृहे आणि कर्मचारी निवासस्थान बांधले. परंतु बांधकामानंतर १५ वर्षे उलटूनही या इमारती ASI च्या ताब्यात देण्यात आलेल्या नाहीत. कोणतीही देखभाल न करता बराच काळ पडून राहिल्याने इमारतीला भेगा पडल्या असून आणि संपूर्ण परिसरात तण आणि झुडपं वाढलेली आहेत. १९९० नंतर तब्बल ३२ वर्षांनी म्हणजेच २०२२ साली इथे पुनरुज्जीवनाचे काम हाती घेण्यात आले. या कामाचा एक टप्पा पूर्ण झाला असून लोकसभा निवडणुकीनंतर दुसरा टप्पा सुरु होणार आहे.